पेपरमधली जाहिरात वाचून फास्ट बॉलर बनायला गेलेला कार्यकर्ता म्हणजे टिनू योहानन

केरळ, गॉड्स ओन कंट्री. हिरवळीनं नटलेला निसर्ग, शांत समुद्र, मोहात पाडणारं वातावरण अशी सगळी केरळची ओळख. केरळ आणि क्रिकेट हे सोबत उच्चारलं तर डोळ्यांसमोर तीन जण येतात, राडा किंग शांताकुमारन श्रीशांत, संघात आत-बाहेर करणारा संजू सॅमसन… तिसरं नाव आठवायला डोक्याला ताण द्यावा लागेल, तरी आठवत नसेल तर सांगतो… त्याचं नाव टिनू योहानन. भारताकडून खेळणारा पहिला केरळी क्रिकेटर.

टिनू योहाननचं नाव फार लक्षात राहिलं नाही, याचं कारण म्हणजे तो फार कमी काळ भारताकडून क्रिकेट खेळला. धिप्पाड उंची, तगडी शरीरयष्टी असलेला टिनूसारखा फास्ट बॉलर मिळणं हे भारतासाठी वरदान होतं. रणजी ट्रॉफी गाजवल्यानंतर टिनूला भारतीय टेस्ट संघात संधी मिळाली.

मोहालीचं क्रिकेट ग्राऊंड, भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच होती. पिचवर थोडंफार गवत होतं, फास्ट बॉलर्सची जन्नत. मॅचची पहिलीच ओव्हर टाकायला टिनू आला आणि त्यानं ओव्हरच्या चौथ्याच बॉलवर मार्क बुचरची विकेट मिळवली. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, अनेक बॉलर्ससाठी स्वप्न असणारी गोष्ट टिनूनं पूर्ण करुन दाखवली. मार्कस ट्रेस्कॉथिकला आऊट करत टिनूनं इंग्लंडची दुसरी विकेटही आपल्या नावावर केली. दुसऱ्या इनिंगमध्येही टिनूनंच इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्सना तंबूचा रस्ता दाखवला. पहिली टेस्ट तर त्याच्यासाठी भारी ठरली होती.

पहिल्या टेस्टनंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी, क्रिकेट एक्सपर्ट्सनं टिनू योहानन मोठ्ठा क्रिकेटर होणार असं भाकीत केलं होतं. या भाकीताला आणखी बळ दिलं, ते टिनूच्या पहिल्या वनडे मॅचनं.

भारतीय संघ वेस्ट इंडिजला गेला होता, ब्रिजटाऊनच्या मैदानावर झालेल्या वनडेमध्ये त्यानं पदार्पण केलं आणि फक्त ३३ रन्स देत ३ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे तिन्ही विकेट्स लेफ्टी बॅटर्सच्याच होत्या. साहजिकच टिनूला भारतीय संघातून दीर्घकाळ पाहायला मिळेल असा अंदाज पुन्हा एकदा वर्तवण्यात आला. त्यात पुढच्या मॅचमध्येही टिनूनं दोन विकेट्स काढल्या, पण यावेळी ख्रिस गेलनं त्याच्या बॉलिंगची पार पिसं काढली. भावाच्या ५ ओव्हर्समध्ये पन्नास रन्स निघाले.

भारत-श्रीलंका-इंग्लंड यांच्यात झालेल्या नॅटवेस्ट सिरीजमध्ये (आपण जिंकलो आणि गांगुलीनं टी-शर्ट काढला, ती सिरीज) टिनू भारताच्या संघात होता. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मॅचमध्ये त्याची पुन्हा एकदा धुलाई झाली. तीच टिनू योहाननची शेवटची वनडे मॅच ठरली. त्याच वर्षी तो न्यूझीलंड विरुद्ध आपली अखेरची टेस्ट मॅच खेळला. त्यानंतर टिनू भारतीय संघात दिसला नाही. ३ टेस्ट आणि ३ वनडे आणि प्रत्येकी ५ विकेट्स एवढीच टिनूची कारकीर्द मर्यादित राहिली. त्यानंतर तो अनेक वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला. रणजी ट्रॉफी स्पर्धेत खोऱ्यानं विकेट्स घेत त्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण आशिष नेहरा, झहीर खान असे दिग्गज बॉलर्स संघात असल्यानं टिनूला जागा मिळवता आली नाही.

त्यानं यंगस्टर्सला घडवलं, केरळच्या टीमचा कोच म्हणून कामही पाहिलं. श्रीशांतला घडवण्यातही टिनूचा मोठा वाटा होता.

पण टिनू फास्ट बॉलर कसा बनला?

त्याचे वडील टीसी योहानन हे लॉंग जंपर ऍथलिट होते. जवळपास ३० वर्ष नॅशनल रेकॉर्ड त्यांच्या नावावर होतं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत टिनू योहाननं हाय जम्पची वाट पकडली. स्टेट ज्युनिअर लेव्हलला त्यानं मेडल्सची कमाईही केली. एक दिवस त्याला पेपरात जाहिरात दिसली, एमआरएफ फाउंडेशनची. तगडी शरीरयष्टी आणि खेळाचा सराव याचा आपल्याला बॉलिंग करताना फायदा होईल, असं टिनूला वाटलं. गडी चेन्नईला ट्रायल्सला गेला आणि डेनिस लिली आणि टीए शेखरनं त्याची निवडही केली. सहा महिने टिनू घरी गेला नाही, त्यानं कॉलेजही चेन्नईमध्येच निवडलं. 

प्रचंड मेहनत करुन टिनूनं भारतीय संघात धडक मारली, तो पुढं जाऊन फार काळ खेळू शकला नाही. पण मेहनत घेतली, तर स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे त्यानं दाखवून दिलं… हेही तितकंच खरं.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.