इमिग्रेशन प्रक्रियेतून दहशतवादी सुटू शकत नाहीत, यामागचं कारण हा मराठी माणूस आहे
आपण लय वेळा सीआयडीमध्ये पाहिलंय, की एक झोलर कार्यकर्ता असतो, त्याला देश सोडून कल्टी मारायची असते. मग तो नकली पासपोर्ट बनवून घेतो, दाढी मिशा लावतो, डोक्यावर टोपी घालतो, बुरघा घालतो. मग एअरपोर्टवर असताना तो नाव बिव सांगतो. त्याचं स्कॅनिंग होतं. त्यात कायतर गंडलंय असं जाणवतं.
तेवढ्यात एसीपी प्रद्युमन, अभिजित आणि दया तिकडं पोहोचतात. दयाला तोडायला दरवाजा नसतो, म्हणून तो त्या झोलरला फाईट देतो आणि मग प्रद्युमन त्याला विचारतो, ‘देश छोडके भाग रहे थे? सिस्टीम में सब रेकॉर्ड रेहता है.’
आता ही सिस्टीम कुठली, तर इमिग्रेशन करणाऱ्या लोकांचा डेटा. कोण माणूस ए, कुठलाय, याआधी कुठल्या देशात गेला होता, त्याच्यामागं काय मोठ्या लडतरी आहेत काय? ही सगळी कुंडली या सिस्टीममुळं एका क्लिकवर मिळत असते. अभिमानाची गोष्ट म्हणजे ही सिस्टीम कॉम्प्युटरवर आणण्याचं काम केलंय एका मराठी माणसानं.
त्यांचं नाव विद्याधर गोविंद वैद्य
विद्याधर वैद्यांचा जन्म झाला मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर येथे. बालपणीच आई-वडील निर्वतल्यानं ते आपल्या मोठ्या भावाजवळ वाढले. भावाची नोकरी फिरतीची असल्यानं त्यांचं शिक्षण नागपूर, रायपूर आणि जबलपूर इथं झालं. अभ्यासात हुशार असणाऱ्या वैद्य यांनी गणितात एमएससी करत सुवर्णपदकही मिळवलं.
पदवी मिळाल्यावर त्यांनी नागपूरच्या सायन्स महाविद्यालयात दोन वर्ष लेक्चरर म्हणून काम केलं. काम करतानाच ते युपीएससीचा अभ्यास करत होते. वैद्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांची भारतीय पोलिस सेवेत निवड झाली. त्यानंतर पुढची जवळपास तीन-चार वर्षं त्यांनी सुरत, पुणे आणि कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं.
तिथून मग वैद्य यांची केंद्र शासनाच्या गुप्तहेर खात्यात (IB) नियुक्ती झाली आणि ते तिथूनच संचालक म्हणून निवृत्त झाले.
गुप्तहेर खात्यात आपण काय काम केलं, हे कधीच जगासमोर आलं नाही, तरच ते गुप्तहेराचं यश मानलं जातं. याबाबतीत वैद्य यशस्वी ठरलेत असं म्हणावं लागेल. त्यांनी गुप्तहेर म्हणून इतर देशांमध्ये केलेलं काम उजेडात आलं नाही. मात्र देशांतर्गत कामं मात्र चांगलीच लक्षात राहिली. त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे, इमिग्रेशन प्रक्रियेचं संगणकीकरण करणं.
या प्रक्रियेमुळं देशातल्या विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सगळी माहिती स्थानिक कार्यालयात नोंदवली जाते. यामुळं फसवणूक करून कल्टी हाणणाऱ्या, डेंजर असणाऱ्या माणसांची माहिती अधिकाऱ्यांना मिळते आणि मग ती लोकं उडून जायच्या आत खरेखुरे प्रद्युमन आणि दया येऊन त्यांना अटक करू शकतात.
गुप्तहेर विभागाचे संचालक असताना वैद्य यांनी सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय संमेलनं आणि परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. टोकियोमध्ये जून १९८७ ला झालेली इंटरपोल परिषद आणि युगांडातल्या कंपालामध्ये जून १९९३ ला झालेली राष्ट्रकूल देशांची सुरक्षा परिषद या महत्त्वाच्या ठरल्या. त्वरित पोलीस चौकशी आणि त्यानंतर जलद न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या एका अभ्यास गटानं तयार केलेल्या अहवालाचे ते सहलेखक होते. त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
वैद्य यांना भारतीय पोलिस सेवा पदक, खास कामगिरीसाठी राष्ट्रपतींचं उत्कृष्ट सेवा पोलिस पदक आणि विशेष पोलिस पदक असे पुरस्कार मिळाले आहेत.
आता वैद्य यांची एवढी भारी कारकीर्द बघता, प्रत्येक भारतीयाला वाटत असेल की अक्षय कुमार किंवा सुबोध भावेनं त्यांच्यावर एखादा कडक बायोपिक बनवावा.
हे ही वाच भिडू:
- या सावित्री देवी हिटलरला देव मानायच्या, प्रेमापोटी नाझी जर्मनीसाठी गुप्तहेर देखील बनल्या
- शिवरायांनी लढलेल्या उंबरखिंडीच्या लढाईतून कळतं, गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे
- १० वर्षे लागली पण मोसादच्या गुप्तहेरांनी ६० लाख ज्यु धर्मीयांच्या मारेकऱ्याला शोधून काढलं..