मनोहर पंतांऐवजी सुधीर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, पण…

सुधीर जोशी. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री. शिवसेनेच्या उगवत्या काळात सेनेच्या आक्रमकतेची कमान सांभाळणाऱ्या आणि सेनेला घरोघरी पोहोचवणाऱ्यांमधलं महत्त्वाचं नाव. शिवसैनिक म्हणल्यावर एक आक्रमक चेहरा, सेनेसाठी राडा घालायची तयारी ही इमेज हमखास आपल्या डोळ्यांसमोर येतो, सुधीर जोशी मात्र या सगळ्याला अपवाद होते. आपलं लाघवी बोलणं, फार गाजावाजा न करता शांततेनं काम करणं ही जोशी यांची मुख्य ओळख. राजकारणात दुर्मिळ असणारे सरळ-साधे नेते म्हणून ते शिवसैनिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.

सुधीर जोशी यांचे मामा म्हणजे ज्येष्ठ शिवसेना नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी. या मामा-भाच्याच्या जोडीमध्ये फक्त ३ वर्षांचं अंतर होतं. त्यामुळं ही जोडी राजकारणात येण्याच्या आधीपासूनच सोबत काम करायची. या दोघांचा मोटारी भाड्यानं द्यायचा व्यवसाय होता. या व्यवसायामुळेच या दोघांची ओळख झाली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी.

तेव्हा बाळासाहेबांकडे स्वतःची गाडी नव्हती, मनोहरपंत आणि सुधीर जोशी या दोघांनीही अनेकदा बाळासाहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याचं काम केलं. सुधीर जोशी यांच्या गाडी चालवण्यावर स्वतः बाळासाहेबही खुश असायचे. पुढे आपल्या मामाच्या पावलावर पाऊल ठेवत, सुधीर जोशीही सेनेत आले.

१९६७ मध्ये ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूका लागल्या होत्या, अर्थातच जोरदार प्रचार सुरू होता. भाषणाची अजिबात सवय नसलेल्या जोशींनी प्रचार मोहिमेत दोन-तीन भाषणं ठोकली आणि ती लोकांना आवडलीही. १९६८ मध्ये त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये संधी मिळाली आणि वयाच्या २७ व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी संधीचं सोनं केलं.

लॉ कॉलेजमध्ये वर्षभर केलेला अभ्यास, जबरदस्त हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी याच्या जोरावर सुधीर जोशींनी सभागृह दणाणून सोडलं. त्यांची कार्यपद्धतीही चांगलीच गाजली. पुढच्या निवडणुकीत जोशी पुन्हा निवडून आले. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्यानंतर पुन्हा एकदा महापौरपदी शिवसैनिक बसणार हे नक्की होतं. त्यावेळी मनोहर जोशी आणि वामराव महाडिक या दोन्हीपैकी एका नेत्याची महापौरपदी वर्णी लागणार, हे जवळपास पक्कं मानलं जात होतं. पण बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण, संयमी आणि कार्यकुशल सुधीर जोशींना पसंती दिली. अवघ्या ३२ वर्षांचा तरुण मुंबईचा महापौर झाला. भले कारकीर्द वर्षभरासाठीच असली तरी जोशींनी आपल्या कामाचा अमीट ठसा सामान्य मुंबईकरांवर आणि कडवट शिवसैनिकांवर उमटवला. पुढे १९७८ पर्यंत जोशी यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं.

सेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांतच बाळासाहेबांनी हटाओ लुंगी, बजाओ पुंगी असा नारा दिला होता. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालंच पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका होती. हे काम प्रत्यक्षात उतरवण्याची मोहीम पार पाडली, ती स्थानीय लोकाधिकार समित्यांच्या माध्यमातून. 

या समित्यांचं नेतृत्व करत सुधीर जोशींनी  मराठी मुला-मुलींना हॉटेल, एअरलाईन्स अशा ठिकाणी चांगल्या पदांवर नोकरी मिळवून दिली. रिझर्व्ह बँक, ऑईल कंपन्या यांच्यामध्येही मराठी मुलांना स्थान मिळालं. या समितीच्या कार्यकर्त्यांनी १९९० च्या निवडणुकांमध्ये सेनेच्या प्रचारातही मोलाची भूमिका बजावली. त्यांनी तेव्हा आखलेल्या रणनीतीचा फायदा सेनेला १९९५ मध्ये विधानभवनावर भगवा फडकावतानाही झाला.

मामा की भाचा? आणि बाळासाहेबांचा निर्णय…

मुंबईच्या महापौरपदी संधी देताना बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या ज्येष्ठतेऐवजी सुधीर जोशींना प्राधान्य दिलं होतं. दोघांमधून एक निवडायचा प्रसंग बाळासाहेबांपुढं आणखी एकदा आला. त्याआधी १९९० मध्ये जे घडलं ते सांगायलाच हवं. विधानसभा निवडणुकांच्या वेळी सेनेसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या दादर मतदार संघातून मनोहर जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे शिवसैनिक चांगलेच हिरमुसले. त्यांनी थेट सेनाभवनाच्या भिंतीवरच पत्रकं लावली, ‘मामा नको भाचा हवा.’

पुढं पाच वर्षांनी परिस्थिती आणखी बदलली. भाजप-सेनेच्या युतीचं अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन होत होतं. मुख्यमंत्री सेनेचा होणार होता. बाळासाहेब आपल्या हातात रिमोट कंट्रोल ठेवणार हे नक्की असल्यानं, मुख्यमंत्रीपदासाठी दोनच नावं चर्चेत होती, मामा मनोहर जोशी आणि भाचे सुधीर जोशी…

शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा होती, की त्यांचे लाडके सुधीरभाऊच मुख्यमंत्री होणार. बाळासाहेब सुधीरभाऊंचं नाव जाहीर करणार अशा बातम्या पेपरमध्ये छापूनही आल्या होत्या. सेना कार्यकर्त्यांवरची पकड आणि संघटन कौशल्य यात सुधीर जोशी वस्ताद होते. त्यामुळं त्यांच्याच नावावर मोहोर उमटणं नक्की मानलं जात होतं, पण रात्रीतून चित्र पालटलं. सेनाभवनात झालेल्या बैठकीत बाळासाहेबांनी मुत्सद्दी मनोहरपंतांच्या कपाळी गुलाल लावला आणि साध्यासुध्या सुधीरभाऊंची संधी हुकली.

त्यांना मंत्रीमंडळात गृह खातं मिळण्याच्या शक्यता होत्या, मात्र त्यांनी विधायक कामं करण्यास प्रोत्साहन मिळेल असं महसूल खातं घेतलं. पुढची राजकीय वाटचाल आखण्याआधीच त्यांना एका अपघाताला सामोरं जावं लागलं. ते त्यातून बचावले पण परत आल्यावर त्यांच्याकडे शिक्षण खातं देण्यात आलं. पुढे लोकाधिकार समिती महासंघाचं अध्यक्षपदही सुधीर जोशी यांच्याकडून काढून घेण्यात आलं. आपली विधानपरिषदेमधली टर्म संपल्यावर त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे सक्रिय राजकारणातून विश्रांती घेतली.

यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांना कोरोना झाला होता, मात्र त्यातून बरं होत ते घरी परतले. काही दिवसांनी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, १७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि शिवसेनेच्या अजातशत्रू नेत्यानं जगाचा निरोप घेतला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.