प्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर !

केंद्र सरकारने ३२ वर्षांपूर्वी भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालीसिस विंग’मध्ये  (रॉ) अधिकारी म्हणून काम केलेल्या अरविंद सक्सेना यांची भारतीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सक्सेना हे २० जून २०१८ पासून यूपीएससीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांची नियुक्ती ७ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.

कोण आहेत अरविंद सक्सेना..?

अरविंद सक्सेना यांनी ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि आयआयटी दिल्लीमधून एम.टेक पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी १९७८ साली भारतीय डाक सेवेतील अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. डाक अधिकारी म्हणून काम करताना अलिगढ स्टँप आणि सील फॅक्टरीच्या आधुनिकीकारणाचे श्रेय त्यांनाच जाते.

१९८२ साली त्यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून दिल्लीला बोलावण्यात आले. नवव्या आशियायी स्पर्धांच्या आयोजनासंबंधीची आणि अलिप्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या डाक विभाग संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

१९८८ साली त्यांना प्रतिनियुक्तीवर भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’मध्ये पाठविण्यात आले. भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या रणनीतीविषयक अभ्यासाचे तज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघण्यात येते. ‘रॉ’ अधिकारी म्हणून त्यांनी पाकिस्तान, चीन यांसह ५ शेजारी देशात काम बघितलं. २०१५ साली त्यांची यूपीएससी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

२०१५ साली यूपीएससीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले ते पहिलेच ‘रॉ’ अधिकारी ठरले होते आणि आता युपीएससीचे अध्यक्ष बनलेले देखील ते पहिलेच ‘रॉ’ अधिकारी ठरले आहेत.

अध्यक्षपदावर आयएएस, आयपीएस, आयएफएस सेवेतील अधिकाऱ्यांचंच वर्चस्व

यूपीएससीचे यापूर्वीचे अध्यक्ष विनय मित्तल हे भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवेशी संबंधित होते. यूपीएससीच्या अध्यक्षपदावर आतातापर्यंत आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस सेवेशी संबंधित अधिकारीच मोठ्या प्रमाणात बघण्यात आलेले आहेत. १९४९ पासूनच्या युपीएससीचे  २५ पैकी १४ अधिकारी हे याच सेवांशी संबंधित राहिलेले आहेत. उरलेले ११ अध्यक्ष हे अभ्यासक आणि इतर सेवांशी संबंधित राहिले आहेत.

भारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल म्हणून काम केलेल्या सुरिंदर नाथ यांनी देखील १९९८ ते २००२ या कालावधीत युपीएससीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.

यूपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतं..?

भारतीय संविधानाच्या कलम ३१६ नुसार केंद्र शासनाच्या शिफारसीनुसार देशाचे राष्ट्रपती युपीएससीच्या अध्यक्षांची नियुक्ती करतात. युपीएससीच्या अध्यक्षांना ६ वर्षे किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे यांपैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत आपल्या पदावर राहता येतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.