काश्मिरचा अतिरेकी ते कोक स्टुडियोचा गायक…

“संगीत दिलोंको जोडने के लिये होता है तोडने के लिये नही.”


अल्ताफ मीर, वय बावीस. गाव अनंतनाग काश्मीर. साल होत एकोणीसशे नव्वद.


तो एक सर्वसामान्य काश्मिरी होता. दिवसभर कंडक्टरची नोकरी करायचा आणि रात्री  काश्मिरी कलाकुसर हस्तकला  करून घरच्या फाटलेल्या संसाराला हातभार लावायचा. लहानपणापासून त्याला गाणी म्हणायची आवड होती. फावल्या वेळेत डफली वाजवत स्वतःशीच गुणगुणारा आपण भलं आपल काम भलं असा हा अल्ताफ.  


तो काळ काश्मीरच्या इतिहासातला काळा काळ म्हणता येईल. पर्यटकांच स्वागत करणारं सुखी शांत काश्मीर दहशतवादाच्या विळख्यात सापडलं. 


सीमापारहून पद्द्तशीर प्रयत्नाने काश्मीरच्या तरूणांची माथी भडकवण्याच काम चालू होत. पाकव्याप्त काश्मीर मध्ये दहशतवादी बनवण्याचं ट्रेनिंग सुरु होत. अनंतनाग वरून अनेक युवक काश्मीरला आझाद करायसाठी प्ररित होऊन बॉर्डर क्रॉस करू लागले.  यामध्ये अल्ताफचे भरपूर मित्रसुद्धा होते. अल्ताफ सुद्धा याचा विचार करायचा. आपण आपल्या मातीसाठी काही करत नाही असे विचार रोज त्याला छळत होते. 


अतिरेक्यांचे म्होरके त्याच्यावर लक्ष ठेवून होतेच. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. अल्ताफ मीरसुद्धा त्यांच्या कचाट्यात सापडला. मित्रांप्रमाणे तोही सीमेपार ट्रेनिंग घेण्यासाठी निघून गेला. त्याच्या घरच्यांना कळाले अल्ताफ पाकिस्तानला गेला आहे पण जिवंत आहे मेला आहे काहीच कल्पना नव्हती. त्याच्या आठवणीने रडून रडून त्याच्या आईचे वाईट हाल झाले होते.


सुई धाग्यामध्ये रमणारे , बसचे तिकीट फाडणारे अल्ताफचे हात बंदुका चालवण्याचे ,बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेऊ लागले.

रोज रात्री मौलाना प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना धर्माच्या गोष्टी सांगायचे. अल्ताफ सगळं गुमान ऐकायचा. एकदिवस मौलाना म्हणाले “इस्लाम में मौसिकी हराम है.”

अल्ताफ विचारात पडला.  गाणं म्हणताना आपल्याला अल्लाशी एकरूप झाल्यासारखं वाटत मग संगीत अल्लाला हराम कशी? याच विचाराने त्याला पछाडलं. अतिरेकी कट्टरतेचा फोलपणा त्याला रोज अनुभवायला मिळत होता.

काश्मीरचं भलं हे लोक तर नक्की करणार नाहीत हे अल्ताफला लक्षात आलं.  तिथून तो पळाला आणि परत आपल्या घरी अनंतनागला आला. आई वडिलांनीही त्याला परत घरी घेतलं. पण आईच्या हातची भाकरी खायचं सुख त्याला फार काळ मिळालं नाही.


 काश्मीरमध्ये तेव्हा अतिरेक्यांविरुद्ध त्यांच्याच अतिरेकी पद्धतीने लढणारी इखवान नावाची संघटना होती. इखवान अनंतनाग मध्ये खूप शक्तिशाली होती. त्यांच्या रडारवर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये राहून आलेला अल्ताफ आला. त्याच्या सुधरण्यावर इखवानच्या सदस्यांचा विश्वास नव्हता.

अखेर जीव वाचण्यासाठी अल्ताफला परत पळावं लागलं.


यावेळी तो पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद मध्ये गेला. त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहित नव्हता. तिथे एका एनजीओ मध्ये लहान मुलांना शिवणकाम शिकवू लागला. तिथच त्यानं सुफी संगिताच व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं.

एकदा त्याच्या एका मित्राचं लग्न होत. तिथे त्याला सगळ्यांनी गाण्याचा आग्रह केला. त्यानंही आग्रहाचा मान ठेवून छानपैकी एक काश्मिरी लोकगीत म्हणून दाखवलं. सगळ्यांना अल्ताफचं गाणं आवडल. लग्नातच एकजण त्याला भेटायला आला. अल्ताफला त्यानं आपल्या ऑफिसमध्ये भेटायला बोलावले. तो मुझफ्फराबाद रेडिओचा अधिकारी होता.  


तिथे अल्ताफचंं व्यवस्थित ऑडीशन झालं. त्यांनाही त्याचा आवाज आवडला. पाकिस्तानी रेडिओ वर त्याचे  रेग्युलर शो होऊ लागले. भारताहून आलेले आणखी तीनजन सारंगी वाजवणारा गुलाम मोहोम्मद दार, मंजूर अहमद खान आणि सैफुद्दीन शाह हे सुद्धा त्याला येऊन मिळाले. कश्मीरी लोकसंगीत जगापुढे आणणे हा त्यांचा समान धागा होता.

अल्ताफने सगळ्यांचा एक बँड बनवला “कसामीर”. 

Mir 1
अल्ताफ आणि त्याचा कसामीर बँड  स्त्रोत-न्यूज १८


कोक स्टुडिओ या एम टीव्हीच्या शोने गेल्या काही वर्षात भारतात क्रांती घडवली आहे. अस्सल संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना सीमेचे बंधन त्यांना अडवू शकले नाही आहे.


२०१७ साली कोक स्टुडिओने “एक्स्प्लोरर” या सेगमेंट टॅलेंट हंट सुरु केले. यात अल्ताफ मीरच्या कसामीरची निवड झाली. अहमद मजहूर या सुप्रसिद्ध काश्मिरी कवीचे “हा गुलो” हे गीत त्यांनी कोक स्टुडिओसाठी गायलं. कोक स्टुडीओच्या खास स्टाईलमध्ये रेकॉर्ड केलेला त्याचा व्हिडिओ फक्त पाकिस्तानच नाही तर भारतातही गाजला. 


अल्ताफची आई जना बेगम त्याचं गाण ऐकूनच भरून पावली आहे. रोज अनेक पत्रकार अल्ताफचे फॅन्स त्यांच्या घरी येऊन तिला भेटून जातात. अठ्ठावीस वर्षे झाली अल्ताफला जाऊन. आजही तो घरी येईल हे ती प्रत्येकाला सांगत असते. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.