६ फूट ७ इंचाच्या कॅमेरॉन कफीला बघायला, पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर गर्दी झाली होती…

हेराफेरी पिक्चर आठवतो का? तुम्ही म्हणाल काय प्रश्न विचारताय? हेराफेरीला कोण कसं विसरू शकतंय? बाबुराव आपटे, शाम, राजू ही आपली लाईफटाईम फेव्हरेट कॅरॅक्टर्स आहेत. त्यांचे चेहरे आपण गाढ झोपेत पण ओळखू शकतोय. हेराफेरीमधलं आणखी एक कॅरॅक्टर आपण आयुष्यात विसरु शकत नसतोय, तो म्हणजे काळ्या कपड्यातला, खालच्या मजल्यावर पाय आणि वरच्या मजल्यावर तोंड असणारा लंबू… त्याचा चेहरा आपल्याला दिसला नाही, तरी शरीरयष्टी लक्षात राहण्यासारखीच आहे हे नक्की.

त्या लंबूची आठवण येण्याचं कारण म्हणजे… कॅमेरॉन कफी. आपल्यापैकी काही जणांना याची बॉलिंग, याची उंची याबद्दल माहीत असेल, तर काही जण पहिल्यांदा त्याचं नाव ऐकत असतील. तर कफी खेळायचा वेस्ट इंडिजकडून. विंडीजला उंचपुऱ्या आणि धिप्पाड खेळाडूंची सवय फार आधीपासून. त्यांचा फास्ट बॉलर जोएल गार्नर एवढा उंच होता की त्याचा बॉल अकरा फुटावरून खाली यायचा.

उंचीच्या बाबतीत कफी फार नशीबवान ठरला होता, कारण विंडीजचा पेस बॉलर आणि त्यात सहा फूट सात इंच उंची म्हणल्यावर, समोरच्याच्या छातीत आधीच कळ येऊन जायची.

जितकी चांगली उंची कफीला मिळाली होती, तितकीच भारी त्याची बॉलिंगही होती. लयदार ऍक्शन आणि जबरदस्त स्पीड. सुरुवातीला त्याचा खेळ बघून लोकांना उंचपुऱ्या पॅट्रिक पॅटरसनची आठवण येऊ लागली. त्याच्या रुपानं विंडीजला नवी तोफ मिळाली अशी चर्चाही सुरू झाली.

पण बऱ्याचदा असं होतं, की काही माणसं चुकीच्या काळात जन्म घेतात. कफीच्या बाबतीतही तसंच झालं… कर्टनी वॉल्श आणि कर्टली अँब्रोजच्या काळात ऐन भरात असलेल्या कफीला संधी साठी बरीच वाट पाहावी लागली. वॉल्श आणि अँब्रोजला संधी मिळत गेल्या आणि तिकडं संधी न मिळालेल्या कफीचा फॉर्म हरवत गेला.

टेस्ट क्रिकेटमध्ये कफीला सातत्यानं आपण स्थान टिकवून ठेवणं जमलं नाही, मात्र वनडे क्रिकेटमध्ये तो बादशहा ठरला. वनडेमध्ये भावाची बॉलिंग असली भारी होती, की एका मॅचमध्ये त्याला एकही रन न करता आणि एकही विकेट न घेता मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. २००१ मध्ये विंडीज विरुद्ध झिम्बाब्वे मॅच रंगली होती. विंडीजला फक्त २६६ रन्स करता आले, झिम्बाब्वेला ते आव्हान गाठू न देण्यात सगळ्यात मोठा वाटा होता कफीचा… त्यानं पूर्ण १० ओव्हर्स टाकल्या आणि फक्त २० रन्स दिले. वर एक रनआऊटही केला. त्यादिवशी भावाची बॉलिंग काय झिम्बाब्वेच्या बॅटर्सना झेपलीच नाय आणि त्यांचा बाजार उठला.

पुढं १९९६ चा वर्ल्डकप झाला भारतीय उपखंडात, तेव्हा पुण्याच्या नेहरु स्टेडियमवर केनिया विरुद्ध वेस्ट इंडिज अशी मॅच होती. लारा, चंद्रपॉल, अँब्रोज असले भिडू विंडीजकडे होते. पण लोकं उत्सुक होती ती कफीला पाहायला. त्यासाठी नेहरु स्टेडियमचं पॅव्हेलियन, खुर्च्या आणि स्वारगेटच्या एरीयात फुल्ल गर्दी झाली. ताड माड उंची, डोक्यावर हॅट अशा अवतारातला कफी नजरेत भरणं कठीण होतं. त्याचा रंग इतका अस्सल होता की, पॅव्हेलियनच्या सावलीत तो थांबा की, त्याचे फक्त दात आणि ओठ चमकायचे. ती मॅच जिंकत केनियानं विंडीजला धक्का दिला. विंडीजचा ९३ रन्सवर ऑलआऊट झालेला पाहून, पुणेरी चाहते जरा नाराज झाले.

पण कॅमेरॉन कफीची झलक मिळाली आणि पुणेकरांच्या दुपारच्या झोपेची वेळ तेवढी वसूल झाली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.