राजदूत, RD350 आणि बॉबी निर्माण गाड्या काढून त्यांनी एका पिढीवर उपकार केलं.

गावातल्या हिरोकडे बुलेट असायची. गावातल्या व्हिलनकडे देखील बुलेटच असायची. जे यापैकी कशातच नव्हते त्यांच्याकडे स्कुटर असायची पण गावात तिसरे लोकं पण होते. जे नेहमीच साईट एक्टर ठरले. जे या सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखे असायचे त्यांच्याकडे राजदूत होती.. 

अशाच तिसऱ्या लोकांचा अर्थात साईट एक्टरवाल्यांचा नायक राजन नंदा.

राजन नंदा याचं यश म्हणजे त्यांनी अधल्या मधल्या लोकांची नस अचूक ओळखली. जेव्हा बुलेटचा आवाज गावच्या चावडीवरुन घुमू लागला होता तेव्हा त्यांच्या वडिलांनी एका पोलीश कंपनीबरोबर भागीदारी करत राजदूतला भारताच्या रस्त्यांवर आणलं. चावडीच्या जरा पलीकडून बुलेटच्या आवाजात राजदूतचा आवाज येवू लागला. गावातला प्रत्येक साईट एक्टर राजदूत घेवून कुठेतरी छोटासा ठोका काढण्याचा प्रयत्न करु लागला. अधल्या मधल्या हिरोंसाठी १७५ CC ची ५० च्या वरती मायलेज देणारी राजदूत परफार्मन्सला देखील अधलीमधलीच होती.

social media

त्यानंतरचा काळ होता तो शहरातल्या अधल्या मधल्या लोकांचा. त्यांच्यासाठी त्यांनी यामाहाला सोबत घेतलं. भारतात यामाहा कंपनीला आणण्याच श्रेय राजन नंदा याचच. RD350 डब्बल स्ट्रोकची, दोन सायलेन्सरच्या त्या गाडीनं असा इतिहास रचला की आज या गाडीची किंमत जुन्या बाजारात देखील दोन लाखांच्या घरात आहे. RD350 ही भारतातील पहिली स्पोर्टस् बाईक होती. आजही RD350 चालवली तर समजेल आजही ती स्पोर्टस् बाईकच आहे. 

राजन नंदा यांचा “एस्कार्ट ग्रुप” अशाच लोकांसाठी धावत होता.

राजन नंदा यांच अजून एक वेगळ नातं होतं ते बॉलिवूडशी. बच्चन आणि कपूर घराण्याची नाळ जोडणारे नंदा कुटूंब. ते राज कपूरचे जावई तर अमिताभ बच्चन यांचे व्याही होते. राज कपूर यांची मुलगी ऋतूशी त्यांचा विवाह झाला होता. तर त्यांचा मुलाचा विवाह झाला ते अमिताभ बच्चनची लाडकी लेक श्वेता सोबत. मात्र राजन नंदा यांचा बॉलीवूडशी तसा संबध नव्हताच. तो संबध आला तो एकदाच जेव्हा त्यांनी मार्केटमध्ये बॉबीला उतरवलं. 

बॉबीचं खरं नाव नाव “राजदूत GTS”. आपल्या प्रेयसीला घेवून पडद्यावर धावणारा ऋषी कपूर जेव्हा पडद्यावर आला तेव्हा राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या महानायकांच्या मध्ये असणारा ऋषी कपूर जेवढा हिट झाला तेवढीच बॉबी हिट झाली. या सिनेमामुळे तिचं नाव बॉबी पडलं ते कायमचचं. ऋषी कपूर जसा डिंपलला घेवून स्वप्न पाहू लागला तसच स्वप्न बॉबीनं पेरलं. 

twitter

त्यांच्या तिन्ही गाड्यांनी अधल्या मधल्या लोकांची अधली मधली बंडखोरी बाहेर काढली. तितकीच जितकी राजदूतच्या ठोक्यामध्ये होती !!! 

पुढे काय झालं ? 

पुढे काय होणार. साईट एक्टर कधीच यशस्वी होत नसतो. राजन नंदाचं देखील असच झालं. एस्कॉर्टस ग्रुपला यश दिर्घकाळ टिकवता आलं नाही. यामाहा, कावासाकी, हिरोहोंडा सारख्या महानायकांच्या गर्दीत राजदूतच नाव मागे पडत गेलं. हळूहळू राजदूत संपली. नाही म्हणायला एस्कॉर्टस ग्रुपचे टॅक्टर बाजारात टिकून राहिले पण ते देखील तसेच. आज एस्कॉर्टस ग्रुपचे दणटक क्रेन्स कन्स्ट्रकशन साईटवर दिसतात तेव्हा असाच एखादा अधला मधला खूष होवून जातो. 

शेवटी काय झालं ? 

ऑगस्ट महिन्यात बातमी आली. राजन नंदा गेल्याची. अमिताभ बच्चनने अचानक शुट बंद केलं म्हणून नाही म्हणायला त्यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाली. पण वाईट याचं वाटतं अधल्या मधल्यांचा नायक असणाऱ्या या माणसांच्या मृत्यूची बातमी देखील एका महानायकामुळे झोतात आली त्याचं.

हे ही वाचा.