भारताचा अभिमान असणारे शूटर्स स्वतःच्याच बंदुकीनं गोळी झाडून आत्महत्या करतायत

आपल्या भारतात लोकांना क्रिकेटचा कितीही नाद असला, तरी देशाची मान उंचावण्यात बाकीचे खेळ कधीच कमी पडत नाहीत. म्हणजे बघा आपण क्रिकेट वर्ल्डकप जिंकलो तेव्हा जसा आनंदोत्सव झाला, तसाच आपण ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावरही झाला. मग ते मेडल खाशाबा जाधवांचं असेल, अभिनव बिंद्राचं असेल किंवा नीरज चोप्राचं.

फक्त ऑलिम्पिक मेडलच नाही, तर इतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये मिळवलेले विजयही अत्यंत मोलाचे असतात. तुम्हाला आठवत असेल, तर विजेंदर सिंगनं बॉक्सिंगमध्ये मेडल जिंकल्यावर कित्येकांना बॉक्सर बनायचं होतं. लहान वयातच खेळाकडे करिअर म्हणून बघण्यासाठी मुलांना प्रेरणा देण्यात सगळ्याच खेळांचा सारखाच वाटा आहे.

भारतात लोकप्रिय असणारा असाच आणखी एक खेळ म्हणजे शूटिंग किंवा नेमबाजी. मग भले रायफल शूटिंग असो किंवा पिस्तूल शूटिंग, या खेळात भारताचा डंका कायमच वाजला आहे. अर्थात हा खेळ सोप्पा नाही. प्रचंड एकाग्रता, प्रदीर्घ काळ चालणारा सराव, महागडी उपकरणं आणि काही मिलीमीटरच्या हिशोबावर ठरणारं यशापयश, या सगळ्यामुळं शूटर्सवर प्रचंड दबाव असतो.

सध्या भारतीय शूटर्स चर्चेत असण्यामागचं कारण अत्यंत दुर्दैवी आहे. याच वर्षी ऑलिम्पिक पार पडलं, वर्ल्ड चॅम्पियनशिपही पार पडलं. भारताच्या शूटर्सला त्यात संमिश्र यश मिळालं. पण तेव्हा जेवढी चर्चा व्हावी तेवढी झाली नाही. भारतातला शूटिंग खेळ आणि खेळाडू चर्चेत आलेत, ते एका अस्वस्थ करणाऱ्या बातमीमुळं.

गेल्या चार महिन्यांत भारताच्या चार शूटर्सनं आत्महत्या केलीये. 

आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, शूटर्सच्या बंदुकांमधून निघणाऱ्या गोळ्या, शूटिंग रेंजमधल्या टार्गेट शीटवर बसायला हव्यात त्याच गोळ्या या उमद्या खेळाडूंची जीवनयात्रा संपवत आहेत. आत्महत्या करणाऱ्या तीन शूटर्सनं स्वतःच्याच बंदुकीनं गोळी झाडून घेतलीये, तर मेडल अडकवण्याची सवय असणाऱ्या एका गळ्यानं फास अडकवून घेतलाय.

सगळ्यात ताजी बातमी समोर आली ती, २८ वर्षांच्या कोनिका लायक या झारखंडच्या १० मीटर पिस्तूल शूटिंग स्टेट चॅम्पियननं आपल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिनं सुसाईड नोट लिहीत ‘पालकांचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही,’ हे आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.

याच वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमधून कोनिका बाद झाली होती. टार्गेट शीटसोबत छेडछाड केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तिचा खेळ थांबू नये म्हणून अभिनेता सोनू सूदनं कोनिकाला शूटिंग गिअर्स दिले होते, त्यावेळीही कोनिका चांगलीच चर्चेत आली होती. मात्र आता तिनं अशाप्रकारे आपल्या कारकिर्दीची अखेर करणं, अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया शूटिंग विश्वातून उमटत आहे.

याआधीही पंजाबमधल्या तीन शूटर्सनं आत्महत्या केल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात २८ वर्षांच्या नमनवीर सिंग ब्रारनं आपल्या राहत्या घरातच स्वतःच्या डोक्यात गोळी घातली. त्याला वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. नमनवीरनं ताणामुळं आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्याची पत्नी गरोदर असल्यानं, नमनवीरच्या आत्महत्येबाबत जास्त हळहळ व्यक्त केली गेली.

गेल्याच आठवड्यात १७ वर्षांच्या खुशसीरत कौर संधू या नॅशनल लेव्हलच्या शुटरनं स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. तिनं अगदी लहान वयात स्विमिंग आणि शूटिंग अशा दोन्ही खेळांमध्ये जबरदस्त यश मिळवलं होतं. शूटिंगमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत खुशसीरतनं स्वतःचं स्थान तयार केलं होतं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनमध्ये तिला मेडल जिंकण्यात अपयश आलं होतं, हेच तिच्या आत्महत्येमागचं कारण असल्याच्या अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अमृतसरमध्ये राहणाऱ्या हुनरदीप सिंग सोहाल या नेमबाजानं आत्महत्या केल्याचा प्रकारही ऑक्टोबरमध्ये समोर आला. दोन महिने तो मनगटाच्या दुखापतीमुळं खेळातून बाहेर होता. तो दुखापतीमधून सावरला, मात्र आपलं करिअर संपलं असं वाटल्यानं त्याला डिप्रेशन आलं आणि त्यामुळंच हुनरदीपनं आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणलं जातंय.

भारताला पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्रानं या दुर्दैवी घटनांबाबत मत व्यक्त केलं आहे. अभिनवनं नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रानिंदर राय यांना एक पत्र लिहिलंय. ‘खेळाडू ही सुद्धा माणसंच आहेत. त्यांनाही भीती, डिप्रेशन आणि तणावाचा सामना करावा लागतो. आपल्याला आणखी जीव आणि कुटुंबाचा आधार असणारे खेळाडू गमावणं आपल्याला परवडणारं नाही. मी आपला वेळ आणि शक्ती खेळाडूंचं, कोचेसचं, पालकांचं समुपदेशन करण्यासाठी उत्सुक आहे. त्याबाबत आपण परवानगी द्यावी,’ असं अभिनवनं पत्रात लिहिलं आहे.

थोडक्यात काय, तर खेळाडूंना मिळणाऱ्या अपयशाचा सामना करणं कठीण जात आहे. खेळांमधली वाढलेली स्पर्धा, महागडी उपकरणं, चांगला खेळ करुनही न मिळणारी प्रसिद्धी ही कारणंही या आत्महत्यांमागं असल्याची चर्चा आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.