आपल्या कामामुळं भारतात चार पत्रकारांना जीव गमवावा लागलाय
जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी कुठलीही घटना आपल्याला इतम्भूत समजते, याचं श्रेय जातं पत्रकारांना. आता तुम्ही म्हणाल कुणाचं लग्न झालं? कुठल्या अभिनेत्रीनं कसे कपडे घातले? याची माहिती घेऊन काय करावं आम्ही? पण त्याची माहिती उपलब्ध होते, कारण लई लोकं हा असला कंटेंट चवीनं वाचतात.
दुसऱ्या बाजूला, आपला जीव धोक्यात घालून गंभीर घटनांचं वार्तांकन करणारे, प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन वार्तांकन करणारे अनेक पत्रकार भारतासकट संपूर्ण जगात आहेत.
पत्रकारांना धमक्या देण्यात आल्याच्या, त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या, ऑफिसची तोडफोड झाल्याच्या बातम्या आपण सातत्यानं वाचत असतो. युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या किंवा दहशतवादी भागात जाऊन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा जीवही धोक्यात असतो.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या आणि त्याच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या अमेरिकास्थित कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट (सीपीजे) या स्वयंसेवी संस्थेनं पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालानुसार यावर्षी १ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात चार पत्रकारांची त्यांनी केलेल्या कामाचा बदला म्हणून हत्त्या करण्यात आली आहे. तर सात पत्रकार तुरुंगात आहेत.
संबंध जगाचा विचार करायचा झाला, तर या अहवालानुसार सुरू असलेल्या या वर्षात जवळपास २४ पत्रकारांना काम करताना जीव गमवावा लागला. यातल्या १९ जणांची हत्या केली गेली, तर उरलेल्या पाच जणांना भयानक परिस्थितीत काम करताना जीवाला मुकावं लागलं. या पाच जणांमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून मारले गेलेले भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा समावेश आहे.
भारतात काय परिस्थिती आहे-
या अहवालानुसार भारतात चार पत्रकारांची हत्या करण्यात आली. जूनमध्ये मृत्यू झालेले एबीपी न्यूजचे सुलभ श्रीवास्तव, ऑगस्टमध्ये जीव गमवावा लागलेले ईव्ही फाईव्हचे चेन्नाकेसवालु आणि सुदर्शन टीव्हीचे मनीष सिंह आणि नोव्हेंबरमध्ये बीएनएन न्यूजच्या अविनाश झा यांचा मृत्यू झाला. देशात जवळपास वर्षभर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला लखीमपूर खिरीमध्ये हिंसक वळण लागलं. या घटनाक्रमाचं वार्तांकन करायला गेलेल्या, साधना टीव्ही प्लसच्या रमन कश्यप यांना या हिंसेमध्येच आपला जीव गमवावा लागला.
किती पत्रकार अटकेत-
सीपीजेच्या अहवालानुसार भारतात सात पत्रकार अटकेत आहेत. यात भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचा समावेश आहे. हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या बाबतीत बातम्या गोळ्या करणाऱ्या सिद्दीकी कप्पन यांना भर रस्त्यातून अटक करण्यात आली होती. तनवीर वारसी नावाच्या पत्रकाराला इतर आरोपांसोबतच चुकीच्या पद्धतीनं वर्तमानपत्र चालवण्याबद्दल अटक करण्यात आली होती.
राजीव शर्मा यांना आधी हेरगिरीच्या संशयावरुन अटक करण्यात आली आणि नंतर सुटकाही झाली. सुटका झाल्यावर मात्र जुलै २०२१ मध्ये त्यांना मनी लॉन्ड्रींगच्या संशयित प्रकरणात पुन्हा ताब्यात घेण्यात आलं. काश्मीरमधले आसिफ सुलतान आणि फोटो जर्नालिस्ट मनन डार हे सुद्धा अटकेत आहेत.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ज्या देशांमध्ये पत्रकारांची हत्या झालीये त्या यादीत भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे. पुढच्या वर्षात तरी हि परिस्थिती बदलते का? सीपीजेच्या यादीतुन भारताचं नाव गायब होतंय का? आणि विशेष म्हणजे देशात पत्रकारांसाठी सुरक्षित वातावरण बनतंय का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
हे ही वाच भिडू:
- आता कोर्टाने सरकारी यंत्रणांना खडसावलय, पत्रकारांचा पर्सनल डेटा लिक करू नका..
- बाळासाहेबांची पत्रकार परिषद बंद पाडणाऱ्या आंदोलक महिलांना मातोश्रीवर बोलावलं अन्..
- भिवंडी दंगलीवरून पत्रकारांवर खटले टाकले, तर यशवंतरावांनी थेट मुख्यमंत्र्याना खडसावलं