जगातला सर्वात डेंजर स्मगलर जो प्रेतांमधून ड्रग्ज सप्लाय करायचा…

१९६०-७०च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिका आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये युद्ध सुरु होतं. तर दुसरीकडे अमेरिकेच्या हार्लेम आणि न्यूयॉर्कमध्ये ब्ल्यू मॅजिक नावाचं ड्रग्ज लोकांना विळख्यात ओढत होतं. सरकार या दोन्ही गोष्टींमुळे वैतागलेलं होतं. जेव्हा पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली  तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे व्हिएतनाम वरून अमेरिकेमध्ये येणारे ड्रग्ज हे युद्धात मारल्या गेलेल्या प्रेतांमधून येत आहेत.

यातून नाव समोर आलं ते अमेरिकेतल्या सगळ्यात खतरनाक ड्रग्ज माफियाचं तो होता फ्रॅंक लुकास. फ्रॅंक लुकासने केलेली ड्रग्ज तस्करी बघून पोलिससुद्धा चक्रावून गेले होते कि इतक्या दिवसांपासून पोलिसांच्या नजरेत हि गोष्ट आली कशी नाही. याच ड्रग्ज किंगची आजची गोष्ट. फ्रॅंक लुकास इतका फेमस झाला होता की त्याच्यावर एक पुस्तक आणि अमेरिकन गँगस्टर नावाचा सिनेमाही येऊन गेला. 

फ्रँक लुकास हा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये जन्मलेला एक गरीब घरातला मुलगा होता. ज्या भागात तो राहायला होता तिथे तिथे टोळ्यांचे साम्राज्य होते. मोठमोठे गुंड लोकं तिथेच राहायला होते. याच लोकांनी काहीतरी कारणावरून लुकासच्या भावाचा बळी घेतला. यामुळे घर चालवण्याची जबाबदारी लुकासवर आली. इथून त्याला चोरी करण्याची सवय लागली. दारुड्या लोकांच्या खिशातले पैसे चोरणे, छोट्यामोठ्या चोऱ्या करण्याचं व्यसन त्याला लागलं.

पुढे त्याने एका दुकानात काम सुरु केलं. एक दिवस जेव्हा दुकानाचा मालक दुकानात नव्हता तेव्हा लुकासने ४०० डॉलर दुकानातून चोरले. मालकाला जेव्हा पैसे मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसांना बोलावलं. पोलिसांच्या भीतीने लुकास न्यूयॉर्कला पळून गेला आणि तिथे तो ड्रायविंग शिकला. फ्रॅंक लुकास गाडी चालवायला शिकल्यावर जॉन्सन नावाच्या माणसाकडे तो ड्रायव्हर म्हणून कामाला लागला.

जॉन्सन हा मोठा गँगस्टर होता. मोठ्या प्रमाणावर तो ड्रग्ज स्मगलींग करायचा. त्याला फ्रॅंक लुकास जास्त प्रिय होता. जॉन्सनने फ्रॅंक लुकासला गुन्हेगारी विश्वतले सगळे फंडे शिकवले आणि एका दुर्दैवी घटनेत जॉन्सनचा मृत्यू झाला. १९६८ मध्ये जॉन्सनची जागा घेतली फ्रॅंक लुकासने. त्याने अत्यंत वेगाने ड्रग्जची तस्करी करणं सुरु केलं. न्यूयॉर्कच्या गल्लीबोळात तो ड्रग्ज विकू लागला. 

यात एक अडचण होती कि ज्यांच्याकडून तो ड्रग्ज घ्यायचा ते भरपूर कमिशन वसूल करायचे. फ्रॅंकने सगळ्यात आधी मधले दलाल संपवायला सुरवात केली जेणे करून जास्तीत जास्त नफा मिळेल.. त्यामुळे अमेरिकेत ड्रग्ज आणि गँगस्टर यांच्या हत्या मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या.

यात फ्रॅंक लुकासने आपलं एक ड्रग्ज साम्राज्य अमेरिकेत उभारलं. पण हळूहळू पोलिसांनी त्याच्या माणसांना पकडायला सुरवात केली यामुळे लुकासचं नुकसान होऊ लागलं. यावर उपाय म्हणून त्याने अशी आयडिया काढली ज्याला पोलीस ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणतात. 

अमेरिका व्हिएतनाम युद्धामुळे लुकासपर्यंत ड्रग्ज पोहचणं थांबलं होतं. त्यामुळे तो थायलँडला गेला तिथून त्याने फेमस ब्ल्यू मॅजिक ड्रग्जचा अमेरिकेत आणण्याचा सौदा केला. पण अडचण हि होती कि हे ड्रग्ज अमेरिकेत न्यायचे कसे. कारण हे ड्रग्ज अमेरिकेत लोकप्रिय होते आणि ते लगोलग विकले जायचे. इथं लुकासने एक भयंकर आयडिया केली.

लुकासने युद्धाचा फायदा उचलण्याचं ठरवलं. त्याने काही लालची ऑफिसर लोकांना जाळ्यात ओढलं.

त्या ऑफीसरांच्या मदतीने व्हिएतनाम युद्धात शहिद झालेल्या जवानांच्या शवपेटीत त्याने ड्रग्ज ठेवून ते न्यूयॉर्कमध्ये पाठवणे सुरु केले.

त्याने शवपेट्या अशा पद्धतीच्या बनवून घेतल्या जेणेकरून ड्रग्ज सप्लाय केले जाताय याबद्दल कस्टमला शंका सुद्धा आली नाही.

अमेरिकेत ड्रग्ज तस्करांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आणि त्यात टॉपला नाव होतं फ्रॅंक लुकासचं. लुकासच्या घरावर छापा टाकून करोडोंचा माल जप्त करण्यात आला. १९७५ मध्ये लुकासवर खटला भरवण्यात आला. न्यायालयाने त्याला ७० वर्षांची शिक्षा सुनावली. पण फ्रॅंक लुकासने इथंसुद्धा आपलं डोकं चावलं आणि कोर्टाला सांगितलं कि मी सगळ्या ड्रग्ज तस्करांची नाव सांगिल पण माझी सुटका झाली पाहिजे.

त्याने सगळी माहिती सांगितली आणि अमेरिकेतला सगळा ड्रग्जचा बाजार बाहेर आला आणि अमेरिकेत ड्रग्जचा व्यापार कोलमडला. ७ वर्षाच्या शिक्षेनंतर फ्रॅंक लुकासला सोडून देण्यात आलं. बाहेर आल्यावर त्याने ओरिजिनल गँगस्टर नावाचं पुस्तक लिहिलं. यात त्याने तरुण मुलांना सांगितलं कि,

वाईट संगतीला लागू नका आणि शिक्षणावर लक्ष द्या.

१ जून २०१९ मध्ये फ्रॅंक लुकासच निधन झालं आणि अमेरिकेतला ड्रग्ज व्यवहार इतिहासजमा झाला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.