फ्रेंच गव्हर्नरच्या डायरीतून दिसलेला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा मराठवाडा

मध्ययुगीन इतिहासात अनेक परकीय व्यापारी कंपन्या भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचल्या होत्या. यामध्ये इंग्रजांची जशी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आपल्याला माहीत आहे तशाच डच, फ्रेंच, पोर्तुगीजांच्या कंपन्यासुद्धा भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होत्या.

फ्रेंच लोकांच्या वसाहती प्रामुख्याने तामिळनाडूत असल्या तरीही संपूर्ण दक्षिणेत त्यांचा व्यापारउदीम चालत असे. या फ्रेंचांचा भारतातील गव्हर्नर होता ‘फ्रान्सुआ मार्टिन’.

पोंडीचेरी आणि सुरत या दोन ठिकाणी फ्रेंचांची वखार होती. आपल्या दोन्ही वखारींची व्यवस्था पाहण्यासाठी हा मार्टिन पॉंडीचेरी ते सुरत प्रवास करत असे. या परकीय लोकांची वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्वांना डायरी लिहिण्याची सवय. हेन्री ओक्झेंडन, निकोलाओ मनूची, हर्बर्ट डी यागर यांच्या लिखाणावर अनेकांगाने संशोधन सुरू आहे. मार्टिनसुद्धा रोज डायरी लिहीत असे.

इसवी सन 1681 मध्ये त्याने पॉंडीचेरी ते सुरत असा ‘खुष्कीच्या मार्गाने’ प्रवास केला. या प्रवासात अनेक गमती जमती घडल्या. पॉंडीचेरी, मद्रास, गुंटूर, नलगोंडा, हैद्राबाद, बिदर, उदगीर, अहमदपूर, गंगाखेड, चिमणा राजाची पिंपरी, औरंगाबाद, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार ते सुरत असा त्याच्या प्रवासाचा मार्ग होता. यातून तीनशे वर्षांआधी मराठवाडा आणि खानदेश भागातील समाज कसा होता, याचे रोचक वर्णन त्याने करून ठेवले आहे. त्याचे तारखेवार केलेले वर्णन आपण पाहूया.

17-18 जुलैच्या आसपास मार्टिन आपल्या लवाजम्यासह ‘अंदूर’ (अणदूर) नावाच्या गावात येऊन पोहोचला. या गावात त्याला राहण्यासाठी अतिशय उत्तम जागा मिळाली. त्याच्यासोबत ‘आर्मेनिया’ देशातून आलेल्या व्यापाऱ्यांची टोळीसुद्धा मुक्कामी होती. या गावातील मेंढ्या लहान असल्या तरीही या मेंढ्यांचे मांस अतिशय चांगले असल्याचे लिहीतो.

मार्टिनला या मुक्कामी असताना त्याच्या हेराकडून एक पत्र मिळाले ज्यात लिहिले होते,
‘संभाजीराजाचा मेहुणा हरजीराजा जिंजीच्या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी निघाला आहे.’

मार्टिन फ्रेंच गव्हर्नर होता. त्याच्याकडे अशी माहिती येणे स्वाभाविक होते.

19 जुलै रोजी तो उदगीरला पोहोचला. तो म्हणतो,

‘गावाभोवती तटबंदी नीट बांधलेली नाही. गावाच्या उत्तरेस असलेला किल्ला सुद्धा पडायला आला आहे. किल्ल्यापेक्षा गावच्या प्रशासकाचा वाडा चांगला मजबूत वाटतो. पण तोही पडायला आलाय.’

20 जुलै रोजी अहमदपूरला पोहोचलेल्या मार्टिनला गावाभोवती माती-चुन्याने तयार केलेली तटबंदी दिसली. किल्लासुद्धा मोडकळीस आल्याचे तो सांगतो.

21 जुलै रोजी तो अहमदपूर वरून गंगाखेडच्या दिशेने निघाला. या रस्त्यात भरपूर चोर-दरोडेखोर असल्याचे त्याला सांगण्यात आले. पण त्याची कुठेही चोरासोबत झटपट झाली नाही. उलट अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांसोबत त्याची गाठ पडली. या रस्त्यावर त्याला प्रचंड प्रमाणात मोर दिसल्याचे तो लिहीतो.

22 जुलै ला गंगाखेडवरून औरंगाबादला जाण्यासाठी त्याला गोदावरी ओलांडावी लागणार होती. मार्टिन म्हणतो,

‘नदीचा वेग प्रचंड होता. नावेशिवाय ती ओलांडणे अशक्य होते. गावात एवढे व्यापारी आले होते की आम्हाला गावाबाहेरच तंबू टाकून राहावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर प्रवासी येण्याआधीच आम्हाला नदी ओलांडायची होती. चार-पाच चांगल्या नाव बघून आम्ही लवकरात लवकर नदी ओलांडली.’

23 जुलै रोजी त्याला एक पत्र मिळाले. तो औरंगाबाद नजीक होता. औरंगाबाद शहरात त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्या पत्रात लिहिले होते. विशेष म्हणजे, मुक्काम ज्याच्या घरी पडणार होता तो गृहस्थ ‘स्वित्झर्लंड’ देशातील होता, असे मार्टिन लिहीतो. ही एका अर्थाने धक्कादायक बाब आहे. त्या स्विस व्यक्तीचे नाव होते ‘सियोर मोंताने’.. या स्विस व्यक्तीला तोफा ओतण्याचे तंत्र आत्मसात होते.

औरंगाबाद शहरात औरंगजेबाचा दुधभाऊ ‘बहादूरखान कोकलताश’ मुक्कामी होता. या बहादूरशाहच्या पदरी मोंताने काम करत असे.

रात्रीपर्यंत मार्टिन औरंगाबादला पोहोचला. काही कारणांमुळे त्याने या मोंतानेच्या घरी जाणे टाळले. औरंगाबाद शहरात ‘आर्मेनियन’ लोकांची एक अख्खी वसाहत होती.तिथे एक रुपया प्रतिदिन भाड्याने मार्टिन मुक्कामी राहिला.

याच शहरात मुक्कामी असताना मार्टिन पहिल्यांदा एका इटालियन प्रवाशाला भेटला. त्याचे नाव ‘निकोलाओ मनूची’. या भेटीचे रूपांतर पुढे घट्ट मैत्रीत झाले.

दौलताबाद किल्ल्याचे वर्णन करताना मार्टिन आश्चर्यचकित झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हा किल्ला जिंकण्यास कठीण, अजिंक्य आहे असे तो म्हणतो. नंतर मार्टिन अजिंठ्याचा घाट उतरून नंदूरबारकडे गेला. या मराठवाड्यात फिरताना त्याला प्रत्येक गावात एखादी लहानशी का असेना गढी दिसली. औरंगाबाद शहरातील सर्व जमीन अतिशय सुपीक असल्याने ती जगप्रसिद्ध होती असे मार्टिन लिहीतो.

सदाशिवराव भाऊ पेशवे यांची उदगीरच्या किल्ल्याची लढाई आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण मार्टिनला मात्र उदगीर कोणत्याही बाजूने भक्कम-सुरक्षित होते असे दिसले नाही.

नंतरच्या काळात निजामाने तो किल्ला मजबूत करून घेतला. मार्टिनच्या लिखाणात अजून एक आढळणारी गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील गावे देशोदेशीच्या व्यापारांनी भरून जात. त्याला राहण्यासाठी नेहमी एखाद्या किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गोदामात आश्रय घ्यावा लागे, असे तो म्हणतो. मराठवाडा हा व्यापाराच्या दृष्टीने सुजलाम-सुफलाम होता हेच यातून अधोरेखित होते.

अशी ही गोष्ट.. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या मराठवाड्याची.. इतिहासाच्या पानात हरवून गेलेली..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.