सततचा योगा गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक- डॉ.अशोक राजगोपाल
सध्या जगभरात योगा प्रॅक्टिसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे नियमितपणे योगा केल्याने तुम्ही कसे तंदुरुस्त राहू शकता, नियमितपणे योगा करण्याचे फायदे काय यासंबंधी बरीचशी माहिती तुमच्याकडेअसण्याची शक्यता आहे. कुठल्यातरी योग गुरुच्या सांगण्यावरून तुम्ही जर मोठ्या प्रमाणात योगा प्रॅक्टिस करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सततचा योगा तुमच्या गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे, योगाच्या सततच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावं लागू शकतं, असा इशारा प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.अशोक राजगोपाल यांनी दिला आहे.
योगाच्या अनेक आसनांमुळे शरीरातील सांध्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो ज्यामुळे संधिवाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. सांधेदुखी आणि अस्थीरोगाचा प्रादुर्भाव झालेले बहुतेक रुग्ण हे नियमितपणे योगा करणारे असतात, असं यासंबंधीचं आपलं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. शिवाय आपण स्वतः जगभरातील अनेक महत्वाच्या योगगुरूंवर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडल्या असल्याची माहितीही डॉ. राजगोपाल देतात.
“नियंत्रित वातावरणात आणि योग्य पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन जर योगाची प्रॅक्टिस केली तर योगा लाभदायक ठरू शकतो, पण त्याचा अतिरेक धोकादायक आहे. पुरेसं प्रशिक्षण न घेता, योगा प्रॅक्टिस करणाऱ्यांची संख्या देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. त्यामुळे अशा लोकांसाठी देखील योगा अपायकारक ठरू शकतो. १०० पेक्षा अधिक लोकांनी एकत्रिपणे योगा प्रॅक्टिस करणं देखील घातक आहे. अनेक योग गुरूंना योगाच्या अतिरेकामुळेच तसंच दीर्घकाळ वज्रासन केल्यामुळेच गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेस सामोरे जावं लागत आहे” असंही डॉ. अशोक राजगोपाल सांगतात.
योगा प्रॅक्टिस करताना शारीरिक इजा होण्याची शक्यता असली तरी, योग्य प्रशिक्षण आणि काळजी घेऊन हे टाळता येऊ शकतं. मानवी शरीर हे खूप मौल्यवान आहे आणि आपण सर्वांनीच योगा प्रॅक्टिस दरम्यान शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्या शारीरिक क्षमतांनुसार योग्य पद्धतीने योगा केल्यास शरीरास अपाय होण्याचा धोका टाळता येऊ शकतो, अशी माहिती ‘योगालाईफ सेंटर’ या योगाभ्यास केंद्रात प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले सविरा गुप्ता हे देतात.
डॉ. राजगोपाल यांचा हा धोक्याचा इशारा मोठ्या प्रमाणात असलेल्या योगा इंडस्ट्रीसाठी आव्हान ठरणार आहे. जगभरात या इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. एकट्या अमेरिकेतच प्रतिवर्ष ४ अब्ज डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक योगा आणि तत्संबंधीच्या उपकरणांच्या उत्पादनात करण्यात आलेली आहे. भारतातील बाबा रामदेव यांच्यासारख्या योग-गुरूंनी तर या इंडस्ट्रीत जगभरात आपलं साम्राज्य स्थापन केलंय. रामदेव बाबांचा तर असाही दावा आहे की, योगाच्या प्रॅक्टिस आधारे कॅन्सर आणि एड्ससारखा दुर्धर आजार देखील बरा होऊ शकतो. त्यामुळे एका महत्वाच्या वैद्यकीय तज्ञाच्या इशाऱ्याला ही इंडस्ट्री किती गांभीर्याने घेते आणि कसा प्रतिसाद देते, हे बघणं महत्वाचं.