राज कपूरला शँम्पेनची बाटली उघडायची संधी न देताच मुकेश निघून गेला…
मुकेशचंद माथुर म्हणून त्याला कोणीच ओळखत नाहीत. त्याची ओळख “मुकेश” अशीच. त्याहून ही राज कपूरचा आवाज गायक मुकेश म्हणून तो आपल्या पिढीला माहित असतो. राज कपूरचे आणि त्याचे असे सूर जुळले होते की मुकेश शिवाय राज कपूरच गाण हे त्याच वाटायचंच नाही.
राज कपूरच्या आरके फिल्मचा पहिला चित्रपट “आग” पासून या दोघांची जोडी जुळली ती राज कपूरच्या नोकरी या चित्रपटापर्यंत अखंड चालली. मुकेशचा निरागस सूर त्याच्या अभिनयाशी मेळ खायचा. या दोघांची आवारा हुं, मेरा जुता है जपानी, ऐ भाई जरा देख के चलो, जीना यहा मरना यहा अशी कित्येक गीत आजही आपल्या मोबाईल मध्ये स्टोअर असतात.
याचा अर्थ असा नव्हे की मुकेश ने बाकी कोणासाठी गाणी म्हटली नाहीत. खर तर मेहबूब खानच्या अंदाज नावाच्या फिल्म मध्ये दिलीप कुमारचा आवाज मुकेश आणि राज कपूरचा आवाज मोहम्मद रफी असा उलटा प्रकार पण पाहायला मिळाला होता. मधुमती चित्रपटात दिलीपकुमार साठी सुहाना सफर और ये मौसम हसीं सारख नितांत सुंदर गाण त्यान गायलं होत.पण,
तरी आयुष्यभर मुकेशला राज कपूरचा आवाज हाच शिक्का बसला.
सत्तरच दशक आलं आणि दिलीप कुमार राज कपूर यांचा काळ मागे पडला. सुरवातीला राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ यांनी या दशकावर राज्य केलं. किशोर कुमार नावाच वादळ तेव्हा आलं आणि त्यात बरेच गायक वाहून गेले. तरी राजेश खन्नासाठी “कही दूर जब दिन ढल जाये” मुकेशनं गायलं. अँग्री यंग अमिताभला रेशमी आवाजाच्या मुकेशचा आवाज वापरायच धाडस कोणाच नव्हत पण ते शिवधनुष्य यश चोप्रांनी पेलल. “कभी कभी मेरे दिल में” या गाण्यान इतिहास घडवला.
राज कपूरने सुद्धा या काळात अभिनय मागे ठेवून दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित केलं होत. ऋषी कपूरला घेऊन बनवलेला बॉबी सुपरहिट झाला. राज कपूरला खात्री पटली की आपल्यासाठी अभिनय आता फक्त हौसेपुरता उरला आहे. यामुळे एक मात्र झालं, त्याचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेशच आर.के. बॅनरमधलं काम आपोआप बंद झालं. घरच्या बॅनर मध्ये काम करता येत नाही हि गोष्ट मुकेशच्या मनाला खूप डसत होती.
खास मुकेशसाठी पिक्चरमध्ये जागा बनवण्यात आली.
एकदा त्याने राज कपूरपुढे हा विषय काढला. राज कपूर तेव्हा भाऊ शशी कपूर ला घेऊन सत्यम शिवम सुंदरम बनवत होता. या सुद्धा त्याचा स्वतःचा रोल नसल्यामुळे मुकेशला गाणे नव्हते. पण मुकेश हट्टाला पेटला. खास मुकेशच्या गाण्यासाठी पिक्चर मध्ये एक जागा बनवण्यात आली. “चंचल शीतल निर्मळ” हे ते गाणे.
मुकेशला एखाद्या लहान मुलाला खेळणी मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद झाला. खूप मनापासून त्यानं ते गाण गायलं. रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याने राज कपूरला त्याने एक शँम्पेन ची बॉटल भेट दिली.
राज कपूरने ठरवल की रेकोर्डिंग झाल्यावर दोघे मिळून एकत्र सेलिब्रेशन करू.
इतक्यात मुकेशला एक आकस्मित फोन आला त्यामुळे त्याला जाव लागलं. त्याला लता मंगेशकरच्या शो साठी अमेरिकेला जायचं होत.
पुढची फ्लाईट पकडून तो निघून गेला. मुकेश परत आल्यावर शँम्पेनची उघडू म्हणून राजने ती बाटली तशीच ठेवली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. इकडे राज कपूर वाट पाहात राहिला पण मुकेश कधी परत आलाच नाही. अमेरिकेत हार्ट अटक आल्यामुळे त्याच तिथच निधन झालं. हि बातमी समजल्यावर राज कपूरला धक्का बसला. त्या बाटलीला हात लावायचं त्याच धाडस झालं नाही. राज कपूरला सिनेमा मध्ये कायमचा मुका करून मुकेश निघून गेला होता.
सत्यम शिवम रिलीज झाला, सुपरहिटही झाला. या नंतर राज कपूरचा नोकरी नावाचा एक रखडलेला सिनेमा रिलीज झाला. त्यात मुकेशनं त्याच्यासाठी एक गाण गायलं होत,
“उपर जाके याद आयी नीचे की बातें”.
हे ही वाचा.
- देवानंद, दिलीप कुमार आणि राज कपूरचं पुणे.
- मुस्लिम असल्याने लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्यास नकार दिला होता?
- सुनिल दत्त म्हणाले, कुठल्याही परस्थितीत नर्गिसला मरू देणार नाही !
- फक्त अडीच सिनेमे बनवून चित्रपटसृष्टीत अजरामर झालेला दिग्दर्शक !!!