सुधीर फडके आणि गदिमांचं भांडणही गाण्यांमुळेच मिटलं होतं…

प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम १९३७  साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांपैकी एक असा याचा गौरव त्याकाळी झाला होता. या चित्रपटात ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ हा अभंग चित्रपटात संत तुकाराम महाराज (विष्णूपंत पागनीस) यांच्या तोंडी होता.

हा प्रासादिक अभंग संत तुकाराम महाराज यांनीच लिहिला आहे असा गैरसमज भल्याभल्यांचा झाला होता. 

वस्तुतः हा अभंग शांताराम आठवले यांनी लिहिला होता! संत तुकाराम महाराज यांच्या भाषाशैलीशी साधर्म्य दाखवणारा हा अभंग आज देखील बऱ्याच जणांना तुकाराम गाथेतीलच वाटतो!

असाच काहीसा (गैर) समज ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या काही अभंगाच्या बाबतीत झाला होता. ‘सबकुछ पुलं’ असलेल्या ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटातील ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची’ हा पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग तुम्हा सर्वांना माहिती आहेच.

ही रचना गदिमा यांची होती. पण त्या काळात या चित्रपटाची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली त्यावेळी या अभंगाच्या पुढे ‘पारंपरिक रचना’ असलेले होते.

खुद्द पंडित भीमसेन जोशी यांना देखील हा अभंग ग दि माडगूळकर यांनी लिहिला आहे असे माहीत नव्हते!

ग दि माडगूळकर यांच्यावर लहानपणापासून प्रवचन कीर्तनातून संत साहित्याचे संस्कार झाले होते. त्यातूनच त्यांची भाषा घडत गेली. पौराणिक आणि अध्यात्मिक वाङमयाचा माडगूळकरांवर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांच्या अनेक रचना ह्या संतांच्या प्रतिभेशी नाते सांगणाऱ्या वाटतात.

धाव पाव सावळे विठाई, नवल वर्तले गे माये या माडगुळकरांच्या रचना अगदी प्राकृत भाषेतील संत रचनाच  वाटतात! 

माडगूळकरांच्या याच प्रतिभेचा प्रत्यय एका वेगळ्या संदर्भात आला होता. १९६६ नंतर ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणाने वाद झाला होता आणि दोघे परस्परांशी बोलत नव्हते. त्यांनी एकत्र कामे करणे थांबवले होते. दोन प्रतिभावान कलावंतांमधील वादामुळे मराठी चित्रपट सृष्टीला मोठा फटका बसत होता. कारण या दोघांचे मोठे अधिराज्य चित्रपट आणि संगीत क्षेत्रावर होते.

१९६७ साली ‘संत गोरा कुंभार’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्याला (विनायकराव सरस्वते) गदिमांची गाणी हवी होती आणि संगीत सुधीर फडके यांचे हवे होते! पण दोघांमधील अबोल्यामुळे त्यांची पंचायत झाली होती.

त्यांनी आयडिया केली. दोघांनाही अंधारात ठेवले आधी गदिमांकडे जाऊन त्यांनी ‘संत गोरा कुंभार’ चित्रपटासाठी गाणी लिहून घेतली. गदिमांनी त्यांना संगीतकाराबद्दल विचारले असता त्यांनी दुसरेच नाव ठोकून दिले! 

मग ही गाणी घेऊन त्यांनी एका व्यक्तीला मुंबईला सुधीर फडके यांच्याकडे पाठवले. आपल्याला संत गोरा कुंभार यांनी लिहिलेली हि गाणी स्वरबद्ध करायची आहेत असा निरोप दिला. गाणी देताना त्यांनी एकदम सगळी गाणी फडक्यांकडे दिली नाहीत. एक एक गाणे देत राहिले.

सुधीर फडके आणि गदिमा यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले असल्याने सुधीर फडके यांना ही गाणी संत गोरा कुंभार यांची नसून गदिमांचीच आहेत हे  लक्षात यायला वेळ लागला नाही!

त्यांनी गाणी स्वरबद्ध केली. शेवटचे गाणे घेऊन जेव्हा निर्माते सुधीर फडके यांच्याकडे गेले त्यावेळी हे गोरा कुंभार यांचे शेवटचे गाणे असे म्हणून त्यांच्याकडे सुपूर्त केले!

सुधीर फडके यांनी मात्र त्याला मिश्किलपणे सांगितले “मला माहिती आहे, कोणती गाणी गोऱ्या कुंभाराची आहेत की कोणती काळ्या कुंभाराची आहेत!” तर अशी होती मैत्री या दोन दोस्तांची!

हे गाणं होतं ‘उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनास आला!’

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.