शरद पवार बाळासाहेबांना भेटायला बियर घेवून जात असत तेव्हाची हि गोष्ट…

शरद पवार आणि बाळासाहेब. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन शक्तीपीठं. दोघेही पक्षप्रमुख. दोघांच्या राजकारणाची सुरवात देखील जवळपास सारखीच झाली. शरद पवार १९६७ साली बारामती येथून निवडून आमदार म्हणून निवडून आले तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना १९६६ साली केली.
या दोन माणसांनी महाराष्ट्राच राजकारण एका उंचीवर नेवून ठेवलं याबद्दल कोणीच शंका घेणार नाही. बाळासाहेबांनी शरद पवारांवर टिका केली. शरद पवारांनी बाळासाहेबांवर टिका केली. विरोधाच राजकारण केलं. पण या सर्व गोष्टींमध्ये आपली मैत्री जपली.
राजकारण कस करावं हे दोघांनी शिकवलच. पण राजकारणाच्या मागे आपण माणूस असतो हे देखील त्यांनीच सांगितलं. एकमेकांच्या तोंड न बघण्याऱ्या आजच्या या राजकारणात बाळासाहेब आणि पवारसाहेबांची मैत्री आदर्शच ठरावी.
त्यांच्या अशाच यारानाचे किस्से खास तुमच्यासाठी.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची पहिली भेट.
बाळासाहेबांच्या निधनानंतर शरद पवारांनी लेख लिहला होता. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या पहिल्या भेटीचं वर्णन केलं आहे. शरद पवार म्हणातात बाळासाहेबांना मी पहिल्यांदा भेटलो ते बी.के. देसाईं यांच्यामुळे. बी.के. देसाईं यांनी माझी आणि बाळासाहेबांची ओळख करुन दिली. बाळासाहेबांना भेटण्यापुर्वीच मी त्यांना दादरच्या दसरा मेळाव्यातून ऐकायचो. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि ती आयुष्यभर टिकली.
बाळासाहेबांनी केली होती शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाची भविष्यवाणी.
सन १९८२. गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील वातावरण गरम होतं. अशातच पुलोदचा कार्यक्रम करुन शरद पवारांनी वेगळी चुल मांडली होती. सुरवातीला आणिबाणीला केलेलं समर्थन देखील बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर मागे घेतलं होतं. अंतुले यांची सत्ता गेली आणि बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. बाबासाहेब मुख्यमंत्री देखील होतील अस विधान बाळासाहेबांनीच यापुर्वी केलं होतं पण आत्ता वातावरण वेगळ होतं. १९८२ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब, शरद पवार आणि जार्ज फर्नांडिस एकाच पुष्पहारात गुंतताना महाराष्ट्राने पाहिले. याच काळात ज्याप्रमाणे चंद्रगुप्त मोर्याने सिंकदरला हाकलून लावले तसे कॉंग्रेसची सत्ता हाकलून लावावी असे विधान करत पुढचे मुख्यमंत्री शरद पवारच होतील अस बाळासाहेबांनी सांगितलं.
शरद पवारांची बाळासाहेबांसाठी बियर डिप्लोमसी.
घाशीराम कोतवाल नाटकाच्या विरोधाचा प्रसंग. महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशपातळीवर देखील नाटकाला पाठिंबा आणि विरोध म्हणून दोन उभे गट पडले होते. शरद पवार हे घाशीराम नाटकाच्या बाजूने होते तर बाळासाहेब ठाकरे नाटकाच्या विरोधात होते. शिवसेनेनं नाटक कोणत्याही स्वरुपात परदेशात जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.
याबाबात सतिश आळेकर लिहतात,
“ तेव्हा संध्याकाळ झाली होती आम्ही शरद पवारांच्या घरी जमलो होतो. नाटकाला कोर्टामध्ये दिलेले आव्हानं हा एकंदरीत चर्चेचा विषय होता. त्याच वेळी अचानक शरद पवार आम्हाला घेवून बाहेर पडले. तेव्हा आपण कुठे चाललोय ते माहित नव्हतं. पण अचानक साहेबांनी एका ठिकाणी गाडी थांबवण्यास सांगितली. ड्रायव्हरला हायनीकेन बियरचे कॅन्स घेण्यात सांगण्यात आलं. तेव्हा लक्षात आलं की आपण बाळासाहेबांच्या घरी चाललो आहोत.”
शरद पवारांनी चर्चेतून काही प्रश्न सुटतात का याचा विचार करुन बाळासाहेबांशी चर्चा करण्याच ठरवलं. मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेब त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पाईप ओढत बसले होते.
शेजारीच त्यांचा आवडता कुत्रा बसला होता. बाळासाहेबांनी तीन चार वेळा बोलावून देखील तो न आल्यावर शरद पवार म्हणाले, प्रामाणिक दिसत नाही !!!
त्यावेळी बाळासाहेब पोट धरून हसल्याचं सतिश आळेकर लिहतात. पुढे मात्र हि चर्चा फिस्कटली. सेनेने नाटकाचा विरोध कायम ठेवला. चर्चा करुन देखील मार्ग निघत नाही म्हणल्यानंतर शरद पवारांनी देखील आपल्या भूमिकेला ठाम रहायचं ठरवलं. त्यानंतर मोठ्या चातुर्याने हे नाटक परदेशी पाठवण्यात आलं. मात्र मैत्री म्हणून घेतलेली चर्चेची भूमिका आणि दोघांनी आपली जपलेली आपली राजकिय भूमिका खूप काही शिकवण्यासारखी आहे.
मिनाताई ठाकरे, प्रतिभाताई पवार आणि सुप्रियाताई.
मिनाताई या ठाकरे शिवसैनिकांच्या मातोश्री. बाळासाहेबांना कोणत्याही मुद्याबाबत पटवायचं असेल तर त्याची जबाबदारी मिनाताईंकडे असे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई देखील असच व्यक्तिमत्व. दोघींनी आपले नवरे एकमेकांवर टिका करतात म्हणून आपल्या घरगुती संबधात कधी अडथळे येवून दिले नाहीत. त्यामुळेच सुप्रियाताई लहानपणी बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळल्याच्या आठवणी आवर्जुन सांगत असतात. हिंदी सिमेमात दाखवतात तर चलों इस दोस्ताकों रिश्तेदारी मैं बदलतें हे टाईप घडामोडी त्यांच्या दोस्तीत देखील झाल्या.
बाळासाहेब ठाकरेंचे भाचे सदानंद सुळे आणि सुप्रियाताईंच्या नात्याचा अंदाज लागल्यानंतर त्याबद्दल बोलण्याची जबाबदारी बाळासाहेबांकडे आली. बाळासाहेबांनी बोलणी केली आणि पवार साहेबांनी मोठ्या आनंदाने हे लग्न लावून दिलं.
शेवटच्या दिवसातील बाळासाहेबांची लाडकी मैत्रीण.
बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात सुप्रियाताई आणि पवार साहेब बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आज माझी लाडकी मैत्रीण नाही. सुप्रियाताईंना लाडकी मैत्रीण नक्की कोण हे समजलं नाही. इतक्यात पवार साहेबांनी त्यांच्या सिगारचा उल्लेख केला. तेव्हा सुप्रियाताईंना समजल बाळासाहेब आपल्या सिगारला लाडकी मैत्रीण म्हणतात.
अस राजकारण या दोघांनी केलं. अनेकांचे मतभेद असतील, त्यांच्या राजकिय भूमिका अनेकांना आवडत देखील नसतील पण जेव्हा राजकारणाच्या पलीकडची मैत्री म्हणून उदाहरण द्यायचं असेल तेव्हा या दोन्ही व्यक्तीमत्वांच नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
हे हि वाच भिडू.
- या इलेक्शनमुळे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला
- शरद पवारांनी सहा चे चोपन्न आमदार कसे केले..?
- शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसचं विलीनीकरण शिवसेनाच्या उभारीचं कारण ठरलं होतं.
मूर्ख माणसाने लेख लिहिला आहे. ह्याच शरद पवरमुळे बाळासाहेबांना अनेक वर्षे मतदान करता आलं नव्हतं आणि ह्यानेच त्यांना अटक केली होती. मित्राला अटक करतात का?