२०१४ नंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आणि त्यांचं भलं झालं…

पाच राज्यांचा निकाल लागून आठवडा उलटला तरी आसाममधील मुख्यमंत्रीपदाचा घोळ संपत नव्हता. पण अखेर काल हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आणि आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी असलेल्या हेमंत सरमा यांचं एक प्रकारे भाजपमध्ये येवून भलंच झालं आहे असं म्हणावं लागेल. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली होती.

पण देशात मोदी-शहा जोडीचे राज्य सुरु झाल्यापासून भाजपमध्ये येवून भलं झालेले सरमा पहिले व्यक्ती नाहीत. याआधी देखील अशा अनेकांचं भलं या जोडीनं केलं आहे. यात कोणी आमदार तर कोणी खासदार झाले. तर काही जण काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आमदार असलेले मंत्री झाले आणि मंत्री असलेले थेट मुख्यमंत्री, किंवा केंद्रीय मंत्री झाले.

भाजपमध्ये आल्यावर अशीच काही मोठ्या पदावर पोहोचलेली नावं…

१. हेमंत बिस्वा सरमा :

हेमंत सरमा वर सांगितल्या प्रमाणे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी. २००६ पासून ते सातत्यानं आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. एक वेळ अशी आली कि ते राज्यातील पक्षाचे दोन नंबरचे नेते बनले. पण २०१४ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री गोगोई यांच्याशी त्यांचे वाद झाले. त्यावेळी या वादातूनच त्यांनी भाजपची वाट धरली.

त्यानंतर बिस्वानी मागे वळून बघितलंच नाही. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला विजय मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०१९ मध्ये संपूर्ण नॉर्थ-ईस्टमध्ये बिस्वा यांनी भाजपचं नेतृत्व केलं होतं. त्यात त्यांना चांगलं यश आलं. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक खासदार मिळाले होते.

आताच्या विधानसभेत देखील त्यांनी पक्षाला सत्तेत कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. एक प्रकारे ते रणनीतीकारचं होते. अखेर भाजपकडून बिस्वा यांना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस दिलं आहे.

२. पेमा खांडू :

पेमा खांडू म्हणजे देशातील काही तरुण मुख्यमंत्र्यांच्या यादीतील एक नाव. २०१६ साली त्यांनी जेव्हा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते ३७ वर्षांचे होते. आधी ते काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री बनले होते, पण त्यानंतर अवघ्या २ महिन्यातच पक्षात फोडाफोडीचं राजकारण करून ४३ आमदारांसह त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा आपला स्वतंत्र पक्ष बनवला.

काँग्रेस पक्षाची खानदानी परंपरा असलेले खांडूंनी त्यानंतर ४ महिन्यात आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि त्यानंतर पुन्हा ते मुख्यमंत्री बनले, पुढे २०१९ मध्ये भाजपला ४१ जागांसह पूर्ण बहुमत आल्यावर भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवण्यात आलं. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते अरुणाचल प्रदेशचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

३. एन बिरेन सिंग :

मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एन. बिरेन सिंग हे देखील आधी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये  असताना २००३ पासून २०१२ पर्यंत ते सलग मंत्री होते. मात्र २०१२ मध्ये पुन्हा सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही, तिथूनच त्यांचे काँग्रेससोबत संबंध खराब होण्यास सुरुवात झाली.

अखेरीस २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१७ मध्ये मणिपूरमध्ये सत्ता आल्यावर भाजपकडून त्यांना विधिमंडळाचा नेता निवडत १५ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली. ते अजून ही पदावर आहेत.

४. बिरेंद्र सिंग :

हरियाणाचे एकेकाळचे दिग्गज काँग्रेसी नेते बिरेंद्र सिंग यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी ते काँग्रेसमध्ये असताना ५ वेळा आमदार होते, आणि यात ३ वेळा कॅबिनेट मंत्री. पुढे खासदार देखील झाले. २०१० मध्ये अशी वेळ आली कि ते काँग्रेसमध्ये मोठे नेते बनले होते.

त्यामुळे मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मंत्रिपद देण्याच ठरलं, तसं शपथविधीसाठी त्यांना आमंत्रण देखील पाठवण्यात आलं. मात्र ऐनवेळी त्यांना डावलत चंदीगडचे खासदार पवन बंसल रेल्वे मंत्री झाले.

परिणामी त्यांचे काँग्रेसशी असलेले संबंध बिघडत गेले. अखेरीस २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या कॅबिनेटच्या विस्तारात संधी दिली आणि बिरेंद्र सिंग मंत्री बनले. त्यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज, स्वच्छता आणि पाणीपुरवठा अशी वेगवेगळी मंत्री पद होती.

५. राव इंद्रजीत सिंह :

राव इंद्रजित सिंह हे हरियाणामधील काँग्रेसच अजून एक मोठं नाव. राव बिरेंद्र सिंह या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा. अगदी १९७७ पासून ते हरियाणा विधानसभेत निवडून येत होते. त्यानंतर काही काळ ते राज्यात मंत्री देखील बनले. पुढे १९९८, २००४, २००९ असे तीन वेळा ते खासदार देखील बनले. काँग्रेसकडून अनेकदा केंद्रीय मंत्रिमंडळासाठी त्यांचं नाव देखील चर्चेत होते. मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं नव्हतं.

अखेरीस २०१४ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात मात्र त्यांना संधी देण्यात आली. २०१४ पासून ते सांख्यिकी, रसायनशास्त्र, नियोजन अशा वेगवेगळ्या विभागांचे राज्यमंत्री राहिले आहेत. आज देखील ते सांख्यिकी मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत.

६. रिटा बहुगुणा जोशी :

उत्तर प्रदेश काँग्रेसमधील सर्वात मोठे नाव म्हणजे रिटा बहुगुणा जोशी. त्या काही काळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. जवळपास २४ वर्ष त्या काँग्रेस पक्षात होत्या, मात्र या काळात त्यांना कोणताही मोठं पद देण्यात आलं नव्हत. अगदी राहुल गांधी सोबत जेलमध्ये जाण्याऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.

मात्र २०१६ मध्ये काँग्रेसकडून त्यांना डावलून उत्तरप्रदेशच्या बाहेरच्या नेत्या शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. याचाच राग मनात धरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यात महिला व बालविकास, पर्यटन या पदाचे कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं. 

२०१९ मध्ये त्यांना लोकसभेच तिकीट दिलं आणि त्या निवडून देखील आल्या. सध्या त्या भाजपकडून अलाहाबादच्या खासदार आहेत.

हे झाले सक्सेसफुल मेम्बर. हे सोडून असे देखील भिडू आहेत ज्यांना भाजपमध्ये जाऊन काळ उलटत आला पण अजूनही मुख्यमंत्रीपद हुलकावणी देत आहे. या यादीत ज्योतिरादित्य सिंधिया सगळ्यात आघाडीवर आहेत आणि तस आपल्या महाराष्ट्रातले विखे पाटील, हर्षवर्धन पाटील अशी यादी मोठी आहे. काँग्रेसमध्ये राहून त्यांचा संयम देखील मोठा झालाय. भाजपमध्ये या संयमाचं फळ त्यांना नक्की मिळेल यात शंका नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.