शिवसेना संपली अशा चर्चा होत्या तेव्हा घेतलेल्या “हिंदुत्वाच्या” मुद्यामुळे पक्ष सुसाट सुटला..

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो …

२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरेंच्या भाषणांची याच वाक्यानं सुरवात व्हायची. मात्र २३ जानेवारी २०२० मध्ये राज ठाकरेंनी आपल्या सभेची सुरवात वेगळ्या वाक्याने केली. निमित्त होतं मनसेच्या नवीन झेंड्याच्या अनावरणाचं.

जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो…

पक्षाचा बदललेला भगवा झेंडा आणि भाषणाची बदललेली सुरवात यावरून मनसे भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालणार हे फिक्स झालं होतं.

यावर्षीच्या गुडपाडव्याची सभा, त्यांनतर ठाण्यातली उत्तर सभा आणि १ मेची औरंगाबादेतील सभा या तीन सभांमधून राज ठाकरे यांनी मनसे इथून पुढं कट्टर हिंदुत्वाचं राजकारण करेल हे फिक्स केलं. 

मराठीहृदयसम्राट असणारे राज ठाकरे हिंदुजननायक झाले. 

सुरवातीच्या यशानंतर वळचणीला गेलेल्या मनसेत पुन्हा चैतन्य निर्माण झालं. मनसेच्या स्थापनेला ६ मार्चला  १६ वर्षे झाली आहेत त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा पक्षाला नवसंजीवनी देणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत.  

अशीच अवस्था शिवसेनेची सुरवातीच्या वर्षात झाली होती आणि अशाच अवस्थेत शिवसेनेला तारलं होतं ‘हिंदुत्वाच्या’ मुद्याने.

१९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली.

तेव्हापासूनच शिवसेनेनं मराठी अस्मितेच्या आणि भूमिपुत्रांच्या समस्या या मुद्यांवरून महापालिकेसारख्या छोटे मतदारसंघ असलेल्या निवडणुका जिंकल्या होत्या. सुरवातीला शिवसेनेला यात यश देखील मिळालं. मुंबईतल्या मराठी भाषिक प्रभागात शिवसेनेनं चांगलं यश मिळवलं.

१९७० मध्ये शिवसेनेनं परळ मतदारसंघातून आपला पहिला आमदार निवडून देखील आणला होता.

 सुरवातीपासूनच शिवसेनेनं जो कम्युनिस्टांना विरोध केला होता त्याच फळ सेनेला मिळालं होतं.

शिवसेनेचे पहिले आमदार ठरलेल्या वामनराव महाडिक यांच्या विजयाचा वर्णन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हा हिंदुत्वाचा विजय’आहे, असं केलं होतं. 

पुढे गिरगावातून १९७२ साली प्रमोद नवलकर हे शिवसेनेच्या तिकिटावरून निवडून आले. 

मात्र एखादे दुसरे विजय सोडले तर शिवसेनेच्या मुंबई ठाण्यापुरता एक मर्यादित पक्ष बनून राहिला होता. पक्षाचं यश हे मुंबईमधल्या काही पॉकेट्स पुरतंच मर्यदित राहिलं. शहरी भागातला पक्ष अशीच शिवसेनेची प्रतिमा होती. 

तशातच शिवसेननं वेळोवेळी घेतलेली काँग्रेसधार्जिणी भूमिका पक्षाला विजनवासात घेऊन गेली होती.

अगदी १९७०च्या दशकात काँग्रेसनं विशेषतः वसंतराव नाईकांनी मुंबईतल्या डाव्यांना शह देण्यासाठी काढलेला पक्ष अशीच शिवसेनेची ओळख  झाली होती. १९८० मध्ये तर शिवसेनेनं मुंबईत काँग्रेसच्या प्रचाराची पालखीत खांद्यावर घेतली होती. जय महाराष्ट्र-हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकात जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर लिहतात 

”१९७५ ते ८२ या सात वर्षाच्या काळात काँग्रेसनं फेकलेल्या चतकोर-नितकोर तुकड्यांवर ठाकरे आणि त्यांचे सहकारी समाधान मानू लागले होते.”

त्यात शिवसेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा हा मुंबईसारख्या शहरांतच जिथं अमराठी लोकांची संख्या जास्त आहे. तिथंच चालणारा होता.त्यामुळं मराठीच्या मुद्याच्या मर्यादा बाळासाहेबांनी बहुतेक ओळखल्या होत्या. 

त्यातच १९८५ च्या निवडणुकीत शिवसेनेत पुन्हा उत्साह आणणारा निकाल लागला. 

वसंतराव नाईकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडून देणार नाही ही पुढी सोडली आणि याचाच मुद्दा करत शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली.

मात्र बाळसाहेब ठाकरे यांनी यानंतरही हिंदुत्त्वाकडे जाण्याचा विचार फिक्स केला होता. त्यात त्यानं साथ मिळाली १९८५ मध्ये शिवसेनेचे आमदार झालेल्या छगन भुजबळ यांची.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी उपाधी लावायला कधी सुरवात झाली याची नेमकी याची नेमकी घटना किंवा वेळ शोधणं अवघड आहे. 

पण शिवसेना आणि हिंदुत्व असा विषय आला की पहिली घटना डोळ्यसमोर येते ती म्हणजे विलेपार्ले मतदारसंघात १९८७ मध्ये झालेली विधानसभा पोटनिवडणूक. 

या निवडणुकीत शिवसेनेने, आपल्या तोपर्यंतच्या साऱ्या भूमिकांना तिलांजली देउन हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा केला.

बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा निवडण्यामागं टायमिंग देखील बरोबर साधलं होता.

१९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या काँग्रेसच्या लाटेत भाजपचा सुपडा साफ झाला होता. तेव्हा संघपरिवारने अत्यंत आक्रमक पद्धतीने रामजन्मभूमीचे आंदोलन हाती घेतले आणि त्यास प्रतिसाद जोरदार मिळाला. हिंदुत्वाची एक नवी लाट देशात येऊ पाहत होती.

आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर १९८७ ची विलेपार्लेची पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत एका बाजूनं काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे होते, तर दुसरीकडं अपक्ष उमेदवार डॉ. रमेश यशवंत प्रभू होते. प्रभू यांना शिवसेनेचा पाठिंबा होता. बाळासाहेब ठाकरे स्वत: रमेश प्रभू यांचा प्रचार करण्यासाठी जात होते.

“आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाहीये. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार.”

अशी वक्तव्य करत एकदम हार्डकोर हिंदुत्वाच्या मुद्यांवर शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक लढली होती.

‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा याच निवडणुकीत देण्यात आला होता. 

शिवेसनाचा हा मुद्दा चांगलाच चालला. शिवसेनेनं ही निवडणूक जिंकली. मात्र पुढे धर्माच्या नावाने प्रचार केला म्हणून रमेश प्रभू यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंचा १९९५ ते २००१ पर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून देखील घेण्यात आला होता.

मात्र शिवसेनेला आता मतांची पर्वा नव्हती त्यांना निवडणुकीत मतं मिळवून देणारा मुद्दा सापडला होता.

पुढे १९८८ ची औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक सेनेनं हे ‘धर्मयुद्ध’ असं म्हणत पुन्हा हिंदुत्वाला साद घातली.

१९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आणि हाच विजय साजरा करण्यासाठी बाळासाहेबांनी हा मेळावा घेतला होता.याच  १९८८च्या औरंगाबादेतील सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.

१९८६-८७ मध्ये औरंगाबादेतील २१६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक झाल्या. शिवसेना नेतृत्वाने केलेल्या दाव्यानुसार त्यापैकी ४५ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला होता. १९८५-८६नंतर  खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेननं आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली.

१९८० च्या दशकात मराठवाड्यात मुस्लिमांचं प्रतिनिधित्व वाढत होतं. दुसरीकडे काँग्रेसकडून मुस्लिमांचं लांगुनचालन होतंय हे शिवसेना जनतेला पटवून देत होती. त्यामुळे मग सामान्य लोकांच्या मनात चीड होती आणि हे लोक मग बाळासाहेब ठाकरेंकडे वळत होते.
अमरावतीच्या वरुडमध्ये झालेल्या दुर्गाउत्सवाच्या दरम्यान झालेल्या दंग्यावरून भुजबळांनी विधिमंडळ डोक्यावर घेतलं होतं. 

त्यावेळी मुस्लिम समाजासाठी केलेल्या आक्षेपार्य हातवाऱ्यांमुळे भुजबळांचा सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं होतं. 

१९८९ मध्ये बाळासाहेबांनी पूर्ण मराठवाड्यात  माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो… अशी भाषणं करत रान पेटवून दिलं होतं.

पेपरात यावरून शिवसेनेवर जोरदार टीका होत होती. मात्र त्याचवेळी जनमानसात शिवसेनेची हिंदूंचा तारणहार अशी प्रतिमा निर्माण होत होती.  वरुडमार्गे शिवसेनेणं विदर्भात प्रवेश केला. या सर्वांचा फायदा निवडणुकीत शिवसेना मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे शिवसेनेच्या आमदारात झपाट्याने वाढ झाली.

शिवसेना आमदार 2

१९८५ मध्ये अवघा १ आमदार असलेली शिवसेना १९९० च्या निवडणुकीत ५२ जागांवर पोहचली. यात महत्वाचं म्हणजे मुंबई आणि कोकणच्या बाहेर जात शिवसेनेनं मराठवाड्यात ११ आणि विदर्भात ९ जागा जिंकल्या होत्या.

हिंदुत्वाच्या मुद्यामुळं दोन गोष्टी घडल्या होत्या बाळासाहेबांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं मतदानात रूपांतर झालं होतं. सर्वात महत्वाचा म्हणजे मुंबईमधून बाहेर पडून शिवसेना खेड्यापाड्यात पोहचली होती.

शहरी बाबुंचा पक्ष हि शिवसेनेची प्रतिमा पुसली गेली होती.

१९९० ला शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं नाही मात्र युतीने ९४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शहाबानो प्रकरण, बाबरी मस्जिद या घटनांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी अगदी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतली. भाजपचे नेते बाबरी पडल्याच्या घटनेची उघडपणे जबाबदारी घेण्यास तयार नसताना बाळासाहेबांनी मात्र ती शिवसैनिकांनीच पाडली हे कधी नाकारलं नाही.

बाबरीनंतर मुंबईत झालेल्या दंग्यातही शिवसेनेनं उघडपणे हिंदुत्वाच्या बाजूनं असल्याचं म्हटलं.तसेच रस्त्यांवरील नामजाविरोधात आरती सारख्या घोषणांमुळे शिवसेना हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यास यशस्वी झाली होती.  बाळासाहेब ठाकरेंचं हेच कडवं हिंदुत्व शिवसेना भाजप युतीला १९९५ ला महाराष्ट्रात सत्तेत घेऊन आलं.

त्यामुळं अगदी शिवसेनेचाच रस्ता धरणाऱ्या मनसेचाही असाच प्रवास असणार का हे येणाऱ्या काळात बघण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

      

Leave A Reply

Your email address will not be published.