प्लॅटफॉर्मवर १० रुपयांचं बुकलेट दिसलं आणि सचिन टेके यांना एम-इंडिकेटरची आयडिया सुचली
महाराष्ट्राची जान म्हणजे मुंबई आणि या मुंबईच्या ‘दिलों की धडकन’ म्हणजे मुंबईची लोकल. तुम्ही कुठल्याही मुंबईकराला विचारलं कि, तुमच्याकडची स्पेशल गोष्ट कोणती तर ते अभिमानाने सांगतील ‘आमची लोकल’. मग भलेही त्यात खाचखक भरलेली गर्दी असेल, नाहीतर बिघडलेलं टायमिंग, सगळं कसं चालून जातं. कारण ६०३.४ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या मुंबईत स्वस्तात फिरायचं म्हटलं कि, लोकलशिवाय दुसरा कुठला चांगला पर्याय नाहीये.
पण याच मुंबई लोकलचा टायमिंग बऱ्याचदा गंडतो, मग हैराण झालेले मुंबईकर रेल्वेच्या स्टेशनवर लावलेल्या त्या इंडिकेटरकडं आणि टायमिंग सांगणाऱ्या त्या बाईच्या आवाजाकडे चित्त लावून असतात. लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही रोजचीचं डोकेदुखी असते. आता ज्याचं दुखणं त्यालाच ठाऊक असं म्हणतं मुंबईकरांचा हाच प्रॉब्लेम सोडवला एका मुंबईकरांनं आणि आपला लोकल प्रवास सोपा करण्यासाठी एम-इंडिकेटर नावानं बेस्ट उपाय शोधून काढला.
सचिन टेके ज्यांना आपण मुंबईकरांचा मसीहा म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण त्यांनी अख्ख्या मुंबईचा टाईमटेबल एका क्लिकवर आणून ठेवलं .
सचिन टेके यांचं सगळं शालेय शिक्षण दहिसरमधलं तर कॉलेज जीवन माटुंग्यातलं. त्यामुळं रोज दहिसर ते माटुंगा असा लोकल प्रवास. ग्रॅज्युएशन सुरु असतानाच आधी एका मोबाईल सॉफ्टवेअर कंपनीत आणि त्यांनतर नोकियामध्ये जॉब केला. पण प्रत्येकाच्या आयष्यात जसे ट्विस्ट अँड टर्न्स येतात, तसंच सचिन यांच्यासोबत झालं आणि कुठेतरी मोजक्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःच नवीन काही सुरु करायचं अशी आयडिया आली.
आयडिया फक्त होती काय करायचं हे डोक्यात नव्हतं. असचं एकदा हार्बर लाईनमध्ये कुर्ला ते नेरुल असा प्रवास करत असताना सचिन यांचं लक्ष त्या माणसाकडं गेलं जो लोकलचं बुकलेट विकत होता. तसं सचिननं ते आधी सुद्धा पाहिलेलं, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यायला लागले अशातला प्रकार घडला.
१० रुपयांना मिळणार ते बुकलेट लोक घेत होती. तेव्हा सचिनला सुचलं कि, याला तर मार्केटमध्ये डिमांड आहे बॉस… मग काय सचिननं टेक्नॉलॉजी वापर करून मुंबई लोकलचं वेळापत्रक मार्केटमध्ये आणायचं ठरवलं.
आता कुठलीही कंपनी, स्टार्टअप सुरु करताना आधी प्रश्न येतो ते म्हणजे नाव काय ठेवायचं, पण सचिनने नावाआधी आपल्या कामावर सगळ्या डेटावर फोकस करायचं ठरवलं. कारण एवढा मोठा डेटा गोळा करणं जरा अवघड काम होत. त्यासाठी सचिननं अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, मेल पाठवले, दुसरा कुठला आउटसोर्स मिळतोय का हे पाहिलं, पण कुठून पूर्ण माहिती काही मिळेना. म्हणून सचिनने सरळ मार्केटमधून रेल्वेचं बुकलेट घेतलं आणि ते टाईप करायला सुरुवात केली.
रेल्वेचं बुकलेट छोटं थोडीना असणार, यात जवळपास ८४,००० एन्ट्री होत्या. पण संयम पणाला लावून सचिनने ते बुकलेट २५ दिवसात टाईप केलं आणि एक सॉफ्ट कॉपी तयार केली. त्यांनतर सचिननं कंपनीचं नाव मोबोन्ड असं ठेवलं , ज्याच्या अंतर्गत अनेक प्रोडक्ट तयार करायचं ठरवलं.
पण मुंबई लोकलसाठी जे ॲप तयार केलं होत त्याच नाव ठेवण्यावर बरीचशी चर्चा सुरु होती. अनेक नाव सुचवली गेली, पण सचिन यांना एक ब्रँडेड नाव हवं होत, जे लोकांच्या कायम तोंडात राहील. ज्यामुळे वेगळी अशी पब्लिसिटी करायची गरज पडणार नाही. तेव्हा सचिनला सुचलं कि जेव्हा कधी लोक रेल्वे स्टेशनवर येतात तेव्हा पहिलं लक्ष जात ते इंडिकेटरकडं. त्यामुळे या ॲप्लिकेशनसाठी त्यांनी एम- इंडिकेटर हे नाव ठेवलं.
आता हे काम तर फत्ते केल पण प्रश्न होता ते मोबाईलच्या डेटाचा. कारण त्यावेळी छोटे फोन्स जास्त वापरले जायचे. त्यामुळे स्टोरेज प्रश्न मोठा होता. पण सचिन यांनी १६० केबीमध्ये सगळा डेटा टाकून २०१० ला पहिलं ॲप्लिकेशन लॉन्च केलं. आणि इथून एम-इंडिकेटरला सुरुवात झाली.
ॲप्लिकेशन तर लॉन्च केलं, पण आता ते लोकांपर्यंत पोहोचवणं मोठं टास्क होत, मोठंमोठ्या जाहिराती करण्यासाठी सचिन यांच्याकडे एवढे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वतः माऊथ पब्लिसिटी करायची ठरवली. सचिन रेल्वेने प्रवास करताना आपलं ॲप्लिकेशन सुरू करायचे आणि लोकांना त्याबद्दल माहिती द्यायचे. बरेच दिवस सचिनने ॲपच्या पब्लिसिटीसाठी हीच पद्धत वापरली.
पण ६ महिन्यांनंतर फक्त २५,००० लोक हे ॲप्लिकेशन वापरत होती. हे आकडे बघून अर्थात सचिनला टेन्शन आलं कारण या ॲपसाठी त्यानं आपला जॉबसुद्धा जोडला होता. पण त्यांनतर त्याने आपल्या ॲपमध्ये शेअरचं ऑप्शन जोडलं जेणेकरून लोक ते आपल्या जवळच्या लोकांना शेअर करू शकतील. तसंच काही गुंतवणूक करून थोडी मार्केटिंग सुद्धा केली.
या गोष्टींमुळे ॲप फेमस व्हायला लागलं आणि वर्षभरातचं ५ लाख लोकांनी ते वापरायला सुरुवात केली, एवढंच नाही तर रेल्वे अथॉरिटीनंसुद्धा या ॲपची पब्लिसीटी करायला केली.
पुढे सचिनने रेल्वेसोबतच अख्ख्या मुंबईची वाहतूक सेवा म्हणजे बस, एसटी, फेरी, मेट्रो यांच्या टाइमटेबलसोबत रिक्षा, कॅबचं किलोमीटरनुसार भाडं, मुंबईमधली फेमस खायच्या-फिरायच्या गोष्टी, ट्राफिकचा हालहवाला, महत्वाचे इव्हेन्ट, पोलीस आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, हॉटेल्सची माहिती, नोकरीची माहिती, महिलांच्या सेफ्टीसाठी स्पेशल सर्व्हिस, आणि सोबतच मुंबईचा मॅप म्हणजे सगळी मुंबई एका क्लिकवर आणली.
त्यामुळे मुंबईच्या लोकलप्रमाणं एम-इंडिकेटर हे मुंबईकरांच्या जवळचं बनलं. आणि आज १.५ कोटींच्या वर लोक हे ॲप वापरतायेत. महत्वाचं म्हणजे मुंबई सोबतचं मोबोन्डने पुणे, दिल्ली सारख्या शहरांसाठी सुद्धा ही सर्व्हिस सुरु केलीये.
हे ही वाच भिडू :
- मोबाईलचा बादशाह बनून फिरणारा ॲपल खरं तर अँड्रॉइडचे फीचर्स चोरून मोठा झालाय
- चायनीज ॲपच्या माध्यमातून केली जाणारी डेटाचोरी राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे.
- सुल्ली डील्स हे ॲप काढणाऱ्या पोरांचं ब्रेनवॉश हे ट्रॅड ग्रुप करत होते.
Sachin sir thanks for your ideas and public support very good and congratulations for this app and loka parynt phochvlya badal tumche khup khup aabhar Jay Maharashtra 🙏