तीन बेगम और एक प्लेबॉय उर्फ इम्रान खान

नमस्कार भिडू! आज परत तुम्हाला पाकिस्तानची बातमी ऐकायला लागणारे. काय करणार भिडू शेजारी आहे आपला त्यो. त्याच्या घरात काय चाललंय वाकून बघायला लागतंय. नाहीतर मग आपल्या घरावर इफेक्ट पडतोय.

त्याच काय झालंय की, पाकिस्तानच पंतप्रधान पुन्यांदा बरळलय. ते म्हणतंय,

बायकांनी तोकडे कपडे घातल्यानं त्यांच्यावर बलात्कार होतायत.

आता ही काय इम्रान खानची पहिली वेळ नाही की, त्याने असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यापूर्वी पण एकदा त्याने महिलांवर बलात्कार टाळण्यासाठी बुरखा घालण्याचा सल्ला दिला होता.

आता बायकांना सल्ले देणारा हा इम्रान स्वतः प्लेबॉय होता हे सांगेल तर शप्पत..

तर एक नंबरचा चरसी गर्दुला असा हा इम्रान खान प्लेबॉय आहे अशी बातमी एकेकाळी ब्रिटन मध्ये छापून आली होती. त्याच झालं असं होत कि, हा इम्रान खान पाकिस्तानचे सुप्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर इकरमुल्ला खान नियाझी आणि शौकत खानम यांचा एकुलता एक मुलगा होता. घरात दाबून पैसा असल्यानं ह्या पोराला अगदी लहान वयातच ब्रिटनला शिकायला पाठवलं.

त्याच आत्ताच वागणं बघाल तर ब्रिटनमध्ये वाढल्याचा हा सगळा इफेक्ट दिसतो. इंग्लंडमध्ये वास्तव्याच्या वेळी इम्रान खानने रॉकस्टार जीवनशैलीचा पुरेपूर आनंद लुटला. मीडिया रिपोर्टनुसार, इम्रान खानचा बहुतेक वेळ घरात कमी आणि बार, पबमध्ये जास्त जायचा.

इतकच नाही तर त्या काळात त्याची बर्‍याच मुलींशी लफडी होती. त्यामुळं त्याला लंडनचा प्लेबॉय म्हणायचे. त्यावेळी लंडनमधल्या प्रसिद्ध ट्रम्प क्लबचा तो सदस्य होता.

इम्रान अनेकदा लंडनमधल्या त्या ट्रम्प क्लबला जायचा. असं म्हटल जातं की क्लबमध्ये इम्रान बर्‍याचदा मुलींच्या घोळक्यातच असायचा. दारू प्यायचा,ड्रग्ज घ्यायचा. ट्रम्प क्लब हे त्याच लिव्हिंग रूमच बनलं  होतं. लंडनच्या वर्तमानपत्रांत गॉसिप कॉलम लिहिणाऱ्या मेरी हेल्विन म्हणाल्या होत्या की,

इम्रानच व्यक्तिमत्त्वच असं होतं की मुली आपोआपच त्याच्याकडे आकर्षित होतात.

परंतु स्वत: इम्रान हे आरोप नाकारतो.

इम्रानच्या क्रिकेटमधल्या यशामुळं तर त्याची लोकप्रियता आणखीणच वाढली. त्याची अनेक लफडी चर्चेत आली. या प्रकरणातील सर्वात मोठे नाव होतं पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच. त्यांच्या व्यतिरिक्त भारतीय अभिनेत्री झीनत अमान, क्रिस्टीन बॅकर, सुझनाह कॉन्स्टँटाईन, एम्मा सार्जंट आणि अब्जाधीश व्यावसायिकाची मुलगी सीता व्हाइट ह्या त्याच्या मैत्रिणी होत्या.

असही म्हटलं जातं की सीता व्हाईटशी लग्न न करता त्या दोघांची एक मुलगी आहे, जिचं नाव ताइरियन आहे. १९८७-९१ दरम्यान त्याची सीताशी जवळीक वाढली. त्यानंतर १९९२ मध्ये सीताने एका मुलीला जन्म दिला, परंतु इम्रान हे पण नाकारतोय. पण जगभरात इम्रान खानची प्रतिमा आजपण प्लेबॉयचीच आहे.

तीन बेगम एक प्लेबॉय

त्याच्या लफड्यांची चर्चा पाकिस्तानातच नव्हे तर परदेशी वर्तमानपत्रे आणि टीव्हीमध्येही प्रसिद्ध झाली आहे. तीन विवाह केलेले इम्रान खानच्या या लफड्यांची यादी लांबच लांब आहे.

एकेकाळी त्याचे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याशीही संबंध होते. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इम्रान आणि बेनझीर भुट्टो ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकत होते. त्यावेळी बेनझीर भुट्टो २१ वर्षांची होती.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना इम्रान आणि बेनझीर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण काही कारणामुळे त्यांचे नाते विवाहात बदलू शकले नाही. नंतर, राजकीय आणि कौटुंबिक दबावामुळे बेनझीर भुट्टो यांनी इम्रानपासून दूर राहणेच पसंत केले.

इम्रान खानने आजअखेर तीनदा लग्न गाठ बांधली. पण त्याचे दोन विवाह फार काळ टिकू शकले नाहीत. इम्रानचे पहिले लग्न जेमिमा गोल्डस्मिथशी होते. त्यावेळी इम्रान खान ४२ वर्षांचा आणि जेमिमा २१ वर्षांची होती. लग्नानंतर नऊ वर्षानंतर २००४ मध्ये हे जोडपे विभक्त झालं.

यानंतर इम्रानने वर्ष २०१५ मध्ये बीबीसीच्या माजी अँकर रेहम खानशी लग्न केले. पण १०  महिन्यातच इम्रान खानने आपली दुसरी पत्नी रेहम खानशी ही घटस्फोट घेतला. या लग्नादरम्यान इम्रान खान ६२ आणि रेहम ४१ वर्षांची होती.

रेहम खानने आपल्या पुस्तकात इम्रान आणि त्याच्या अवैध संबंधांपासून जन्मलेल्या मुलांचा दावा केला आहे. यामुळेच इम्रान खान एका मुलाखतीत म्हंटला की त्याने त्याच्या आयुष्यात काही चुका केल्या असतील त्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे दुसरं लग्न.

रेहमने आरोप केला आहे की इम्रानला पाच बेकायदेशीर मुल आहेत आणि तो आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी ही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवतो. हे कमी की काय म्हणून इमरानचे पुरुष आणि ट्रान्सजेंडर्सशीही संबंध आहेत असं पण ती म्हणते.

ऑगस्ट २०१७ मध्ये त्याच्या पक्षाच्या नेत्या आयशा गुलालाई यांनी इम्रानवर आरोप करत म्हंटल कि, हा कार्यकर्त्या महिला नेत्यांना अश्लील संदेश पाठवितो. आयशा यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. असा आरोप करून आयशा यांनी पक्षाच्या सदस्यासह राष्ट्रीय असेम्ब्लीचा राजीनामा दिला.

इम्रान खान सध्या त्याच्या तिसरी पत्नी बुश्रासोबत राहतो. अस म्हणतात की इम्रानने हे लग्न राजकीय फायद्यासाठी, पाकिस्तानच्या कट्टरपंथीय लोकांशी संबंध सुधारण्यासाठी केले. त्यानंतर इम्रानने कबूल केले की लग्नाआधी त्याने बुश्राचा चेहरा ही पाहिला नव्हता.

त्यामुळं करुन करुन भागला आणि आता देवपूजेला लागला ह्यो इम्रान..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.