त्या एका घटनेनंतर तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांना एकही निवडणूक जिंकता आलेली नाही…

दक्षिण भारतातल्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणारं तामिळनाडू राज्य. सध्या इथं निवडणूका होवू घातलेत. देशात आणि देशाच्या विविध भागात भले भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व असेल, मात्र तामिळनाडूच्या राजकारणावर मागच्या ५४ वर्षात द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या प्रादेशिक पक्षांचा दबदबा कायम आहे.

त्यामुळेच २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाट असताना देखील भाजप तामिळनाडूमध्ये कमळं फुलवू शकलं नव्हतं. 

स्वातंत्र्यानंतर १९६७ सालापर्यंत इतर राज्यांप्रमाणेच तामिळनाडूत देखील काँग्रेसचा बोलबाला होता. सी. राजगोपालचारी, के. कामराज, भक्तवत्स्लम यांच्यासारखे दिग्गज नेते इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री होऊन गेले होते. पण १९६५ च्या त्या एका घटनेनंतर काँग्रेस सत्तेबाहेर गेली ती गेलीच. तेव्हापासून आजपर्यंत इथं एकही राष्ट्रीय पक्षाला पाय रोवता आलेले नाहीत.

आणि त्या घटनेचे मुख्य शिल्पकार होते दिवंगत नेते एम. करुणानिधी. 

करुणानिधी यांनी १९५३ साली तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यांदा पाऊल ठेवलं. सोबतच ते जातीवाद आणि सामाजिक भेदभावाच्या विरोधात संघर्ष करणारे सुधारणावादी नेते पेरियार आणि तामिळनाडूचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री सीएन अन्‍नादुराई यांचे खंदे समर्थक होते. १९५७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि वयाच्या ३३ व्या वर्षी आमदार बनले. त्यावेळी विधानसभेत द्रमुकचे अवघे १५ आमदार निवडून आले होते.

त्याच दरम्यानच्या काळात दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये हिंदी भाषेविरोधातील वातावरण जोर पकडत होतं. करुणानिधींनी देखील मद्रास प्रांतामध्ये हिंदी विरोधाला तामिळ भाषेच्या सन्मानाशी आणि अस्मितेशी जोडलं. तसं बघितलं तर पेरियार यांनी १९३८ मध्येच राज्यात हिंदी विरोधाची हवा तयार करायला सुरुवात केली होती. पण करुणानिधींनी या हवेला आंदोलनाचं स्वरूप दिलं. 

द्रमुक मद्रास प्रांतात सत्तेत येण्यासाठी बराचं जोर लावत होती आणि हिंदी विरोध हे त्यांचं प्रमुख हत्यार बनलं होतं. 

करुणानिधी यांनी आमदार होण्याच्या देखील आधीच दरवर्षी हिंदी विरोधी संमेलनाचं आयोजन सुरु केलं होतं. या संमेलनात लोकं मोठ्या प्रमाणावर सहभागी होतं असतं. पुढे १३ ऑगस्ट १९५७ ला आमदार झाल्याच्या पहिल्याच वर्षी त्यांनी संपूर्ण राज्यात हिंदी विरोधी दिवस साजरा करण्यासाठी द्रमुकला तयार केलं.

त्याच वेळी ६० च्या दशकात द्रमुकला केंद्र सरकारनं आयती संधी देऊ केली. इंग्लिश सोबत हिंदी भाषेला अधिकृत भाषा बनवण्यासाठी ८ व्या परिशिष्टात बदल केले. हे बदल २६ जानेवारी १९६५ पासून लागू होणार होते. नेमकं त्याच दिवशी द्रमुकने करुणानिधींच्या नेतृत्वात हिंदी विरोधी आंदोलनाचं रणशिंग फुंकलं. 

राज्यात सगळीकडे तणावग्रस्त परिस्थिती बनवली. सरकारी कार्यालयांच कामकाज ठप्प केलं, शाळा-कॉलेज बंद केली गेली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना यात हस्तक्षेप करावा लागला होता. त्यांनी संतप्त नागरिकांना आश्वासन दिलं की, जो पर्यंत बिगर हिंदी भाषिक राज्य तयार होतं नाही तो पर्यंत तिथं हिंदी लागू केली जाणार नाही.

मात्र या आश्वानानंतर देखील द्रमुकनं आपलं आंदोलन चालूच ठेवलं, अशातच १९६७ साली तामिळनाडूची निवडणूक जाहीर झाली. द्रमुकने हि संपूर्ण निवडणूक केवळ आणि केवळ भाषीक अस्मिता आणि वाढलेले तांदळाचे दर या दोनच मुद्द्यांवर लढवली. काँग्रेसचे जेष्ठ नेते कामराज आणि तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सलम जनतेला या दोन्ही मुद्द्यांच स्पष्टीकरण द्यायला कमी पडत होते.

द्रमुकमधून पेरियार, सीएन अन्‍नादुरई, करुणानिधी, एम.जी.रामचंद्रन यांनी हिंदी विरोधाच वातावरण तयार केलं आणि याच वातावरणात काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. काँग्रेसच्या तब्बल ८८ जागा घटल्या, मुख्यमंत्री भक्तवत्स्लम स्वतः श्रीपेरूमंबुदुरमधून पराभूत झाले. तर तिकडे द्रमुकनं मागच्या निवडणुकीच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक १७९ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. 

याच पराभवानंतर आजतागायत ना काँग्रेसला पुन्हा सत्तेत येता आलं ना भाजपला इथं सत्ता मिळवता आली. 

सत्तेत आल्यानंतर द्रमुकने पहिल्यांदा तामिळनाडूच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदी शिकवण बंद केलं. रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यालय, बँक अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी हिंदीच्या वापरला पूर्णपणे बंदी घातली. या हिंदी विरोधी आंदोलनानं करुणानिधींना खूप कमी वयात राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळवून दिली. १९६९ मध्ये मुख्यमंत्री सीएन अन्‍नादुरई यांच्या निधनानंतर करुणानिधीच राज्याचे मुख्यमंत्री बनले.

पुढे १९८६ मध्ये जेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशभरात नवोदय विद्यालयाची घोषणा केली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा करुणानिधी यांचा हिंदी विरोध तीव्र झाला, त्यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांना अटक देखील झाली होती. त्यात त्यांना जवळपास १० महिने तुरुंगात काढावे लागेल होते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.