त्या घटनेनंतर शिवसेनेला “वसंतसेना” म्हणून चिडवले जावू लागले

राज ठाकरेंच्या उत्तर सभेच्या भाषणापुर्वी काही निवडक कार्यकर्त्यांची भाषणे झाली, या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टिका करताना शिवसेनेचा प्रवास वसंतसेना ते शरदसेना असा झाला असल्याची टिका केली. पण शिवसेनेला “वसंतसेना” हे नाव कसं पडलं, आणि वसंतसेना असा उल्लेख कोणी केला याचं उत्तर या किस्स्यांतून मिळतं..?

१९६३ सालात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कन्नमवार यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर पी. के. सावंत १३ दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यानंतर पाच डिसेंबर १९६३ रोजी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे.

त्यांच्या मुख्यमंत्री होण्यानं राज्यात ‘वसंत पर्व’ सुरू झाल होत. 

त्यांच्या या पर्वात राज्यात शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव प्रबळ विरोधी पक्ष होता. याच काळात कामगारांचा संप, ‘मुंबई बंद’ची हाक यामधून केवळ गिरणीच नव्हे तर सर्व कामगारांची एकजूट झाल्याने डाव्या पक्षांची ताकद वाढत होती. कामगारविश्वात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचाही दबदबा निर्माण झाला होता. त्याकाळी मुबंई डाव्यांचा गड मानली जायची. कामगार क्षेत्रात डाव्या पक्षांची ताकद वाढत होती. मुंबईतील कामगार देखील डाव्या आणि समाजवादी कामगार संघटनामध्ये सहभागी होवू लागले होते. डाव्या संघटनाच्या वाढत्या प्रभावामुळे सत्ताधारी काँग्रेसपुढील डोकेदुखी होती. 

यावर उतारा होता शिवसेनेचा उदय.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. दाक्षिणात्यांमुळे भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने दाक्षिणात्यांविरोधात उघडलेल्या ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ मोहिमेस पाठिंबा वाढत होता. तर दुसरीकडे शिवसेना डाव्या पक्षांना शह देईल म्हणून काँग्रेसही शिवसेनेला खतपाणी घालत होती. वसंतराव तर उघडपणे शिवसेनेची पाठराखण करीत होते. शिवसेना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरत होती, तर वसंतराव सरकार मवाळ धोरण स्वीकारत होते. 

अशातच एक प्रसंग उद्भवला. वसंतराव नाईकांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सरकारी कर्मचाऱ्यांनी अभूतपूर्व संप पुकारला. मंत्रालय जवळजवळ ओस पडलं होत. आणि कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या दादागिरीपुढे नमतं घ्यायला नाईक सरकारची तयारी नव्हती. सरकारी कर्मचाऱ्यांचा कामगार नेते कर्णिक यांच्या नेतृत्वावर अतूट विश्वास होता. त्यामुळे संप प्रदीर्घकाळ लांबला होता. आणि सरकार हि मोठ्या पेचात पडलं होत. अशा वेळी नाईक यांच्याशी असलेल्या दोस्तीला जागून ठाकरे यांनी संप फोडण्याचा विडा उचलला. बाळासाहेबांचे आणि वसंतराव नाईकांचे चांगले संबंध होते. 

महाराष्ट्राला आदर्श राज्य करुन दाखवू अशी इच्छा बाळगणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत.

अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे वसंतरावांच कौतूक करायचे. हा संप फोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर सभा लावली. ठाकरेंनी वसंतराव नाईकांच आणि ओघानंच तत्कालीन महाराष्ट्र सरकारच वकीलपत्र घेतलं होत. आपल्या भाषणात बाळ ठाकरे म्हंटले, 

संप असाच चालू ठेवलात तर तुमच्या नोकऱ्या गमावण्याची पाळी तुमच्यावर येईल. त्यापेक्षा मंत्रालयाची पायरी स्वाभिमानानं चढा. 

असा आदेशच ठाकरेंनी सभेत कर्मचाऱ्यांना दिला होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी चर्चगेट स्थानकाच्या बाहेर जमायचं आणि मिरवणुकीन मंत्रालयात कामावर जाऊन हजर व्हायचं. असं हि त्याच सभेत ठरवण्यात आलं.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता मोडणार शी मोठी हवा त्यावेळी नाईक आणि ठाकरे या दुकलीन उभी केली होती. पण प्रत्यक्षात चर्चगेट स्थानकाबाहेर शे पन्नास कर्मचारीही जमले नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांनी ठाकरे यांचा आदेश मानला नव्हता. आणि कर्णिक यांचं नेतृत्व अढळ राहील होत. 

कामगारांच्या विरोधात शिवसेना उघडपणे  मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पाठराखण करत होते. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हटलं गेलं. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.