या घटनेनंतर अर्णबने आपल्या पत्रकारितेचा गियर बदलला…

अर्णब गोस्वामी, देशात मागच्या २ ते ३ महिन्यापासून सतत चर्चेत असणारे पत्रकार. आधी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात, नंतर कथित TRP घोटाळ्यात, आणि आता केंद्रीय मंत्र्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचं व्हॉटसअप चॅट बाहेर आल्याच्या प्रकरणात. एकाच वेळी अशा जवळपास ३ प्रकरणात त्यांचं नाव आलं आहे. यामुळे पुढचा आठवडाभर तरी त्यांच्यावरच्या बातम्या कुठे हलणार नाहीत.

जेवढे ते स्वतः वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत तेवढाच त्यांचा शो आणि अँकरींग देखील सतत वादाचा मुद्दा बनत असतो. शो मध्ये ओरडणे, पुर्णपणे उजवीकडे झुकल्याचे आणि एकांगी डिबेट अशा टिका होत असतात. मध्यंतरीच्या काळात राज्यातील नेत्यांचा ऑनकॅमेरा एकेरी उल्लेख करणं, अभिनेत्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे यामुळे देखील त्यांच्यावर समाजमाध्यमातून बरीच टीका झाल्याचं पाहायला मिळालं होत.

त्यामुळे अर्णब यांचा शो बघणारे आणि न बघणारे असे दोन्ही कॅटेगिरीमधले प्रेक्षक त्यांच्या या अँकरींग स्टाईल विषयी प्रश्न विचारतात. ती अशी का असते? आणि कधी पासून आहे? सुरुवातीपासून आहे का?

तर त्याच उत्तर ‘नाही’ असं आहे.

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमधून सोशल एंथ्रॉपॉलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अर्णब यांनी कोलकात्याच्या टेलिग्राफ या वृत्तपत्रामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळचे त्यांचे वरिष्ठ असलेले रुद्रांग्शु मुखर्जी यांनी ‘कैरेवां’ ला दिलेल्या मुलाखतीत अर्णब  सांगितले होते,

टेलिग्राफमध्ये असताना मला आठवत, अर्णब एक उत्सुक आणि उत्साही तरुण होता. पण तेवढीच जास्त विनम्रता देखील होती. दिवसभर आपण भलं आणि आपलं काम भलं. त्याच इंग्लिश मात्र खूप छान होत.

एका वर्षात टेलिग्राफला अलविदा करत अर्णब कोलकत्ता सोडून दिल्लीत एनडीटीव्हीमध्ये डेरेदाखल झाले. पुढील करिअरच्या वाटचालीसाठी त्यांनी आपले सीनियर असलेले राजदीप सरदेसाई यांच्या पावलावर पाऊल टाकायला सुरुवात केली. एनडीटीव्हीमध्ये अर्णब आणि राजदीप यांचा प्राइम टाइम वेळेत न्यूजऑवर शो यायचा. सोबतच न्यूजनाइट नावाची जबाबदारी देखील अर्णब यांच्यावर होती.

दोघांचं इथं चांगला जम बसला होता. राजदीप फिल्डवर रिपोर्टिंग करायचे तर त्याच मुद्द्यावर अर्णब पॅनल डिबेट करायचे. 

जवळपास १ दशक एनडीटीव्हीमध्ये काम केल्यानंतर अर्णब पत्रकारतेच्या क्षेत्रात वरिष्ठ संपादक या पदापर्यंत जाऊन पोहचले होते. या चॅनलने त्यांना ओळख मिळवून दिली. सोबतच त्यांनी देखील चॅनेलच अस्तित्व तयार करण्यात यश मिळवलं होत.

२००६ मध्ये एनडीटीव्हीला रामराम करत अर्णब यांनी टाइम्स नाउला उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली. बेनेट अँड कोलमॅन ग्रुपचे प्रमुख समीर आणि विनीत जैन आपल्या या चॅनलला न्यूज आणि बिजनेस न्यूज चॅनेल असं एक योग्य रूप देवू इच्छित होते. 

जाणकारांच्या मते, टाइम्स नाउचं लक्ष्य सीएनबीसी-टीव्ही 18 यांना आव्हान देणं होत. मात्र यासोबतच अर्णब यांना वरून आदेश होते की, केवळ शुद्ध आणि स्वच्छ बातम्यांचा चॅनेल बनवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक बातमी हि जबाबदारीनेच जायला हवी. यामागे रॉयटर्सची भूमिका महत्वाची होती. कारण अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची टाइम्स नाउ मध्ये एक चतुर्थांश पार्टनरशिप होती.

एक महिनाभरात टीआरपीच गणित पुढे आलं. त्यात टाइम्स नाऊच गणित बसलं नव्हतं. चॅनल टीआरपी लिस्टमध्ये कुठेच नव्हतं. वरून जखमेवर मीठ चोळल्यासारखं म्हणजे टाइम्स नाउच्या महिनाभर आधी लाँच झालेलं सीएनएन आयबीएन टीआरपीच्या बाबतीत बरचं पुढे होतं. मुख्य म्हणजे चर्चेत होतं.

त्याचा परिणाम म्हणजे जैन बंधूनी अर्णबचा पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यांना नारळ देण्याची तयारी सुरु झाली. असं सांगितलं जातं की, त्यावेळचे बहूचर्चित पत्रकार वीर सांघवी यांना चॅनेलच प्रमुख बनवण्याची ऑफर देखील दिली होती. 

ही गोष्ट अर्णब यांना समजल्यानंतर त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी आपल्या शैलीच बारकाईने निरीक्षण केलं, आणि काही तरी चुकत असून नवीन बदल स्वीकारायला हवेत हे स्वतःला समजावलं.

याच घटनेनंतर अर्णब गोस्वामी यांनी गियर बदलला.

त्यांनी स्वतःमध्ये अशा गोष्टी स्वीकारल्या ज्यामुळे केवळ टाइम्स नाउचं नाही तर पूर्ण भारतीय पत्रकारितेचं स्वरूप बदलणार होतं. त्यांच्या प्रवासाचा पूर्ण रस्ता बदलला होता.

आता पर्यंत टाइम्स नाउ फक्त बातम्या दाखवत होते. आठवड्याच्या शेवटी त्या घटनांवर फिचर शो यायचे.

आता अर्णब यांनी पॅकेजिंगपासून अँकरिंग पर्यंत बातम्यांमध्ये नाटकीपणा देवू लागले. २००७ ची गोष्ट. टाइम्स नाउचे अँकर आता बोलण्याऐवजी ओरडायला लागले होते. पाहुणे देखील एकमेकांवर ओरडायचे. चॅनेलमध्ये त्यावेळी काम केलेले पत्रकार सांगतात की, या सगळ्या गोष्टी आम्हाला सवयीच्या झाल्या होत्या. कधी कधी पाहुणे चर्चा मधूनच सोडून उठून जायचे. 

ते आता समोरच्याला भिडभाड न ठेवता प्रश्न विचारू लागले. 

पण याच्यात राजकारण नव्हतं, त्याची स्वतंत्र शैली म्हणून ती विकसित होवू लागली. परवेज मुर्शरफ, नरेंद्र मोदी, इंग्लडचे माजी पंतप्रधना गॉर्डन ब्राऊन, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजई, दलाई लामा अशा प्रत्येकास थेट प्रश्न विचारण्याच धाडस अर्णब यांनी दाखवलं होतं.

यानंतर परिणाम दिसू लागले. चॅनेलचा टीआरपी वाढत होता. पुढच्या काळात अर्णबने टाईम्स नाऊला काय दिले तर देशातला सर्वाधिक टीआरपी असणारा इंग्लिश चॅनेल बनवून दाखवलं.

न्यूजऑवर नावाच्या कार्यक्रमातून त्यांनी सर्वाधिक टीआरपी गोळा केला. अस सांगण्यात येत की तेव्हा चॅनेलच्या टोटल रिव्हेन्यू पैकी ७० टक्के रिव्हेन्यू एकट्या अर्णबच्या शोमधून निघायचा.

टाईम्सनाऊ मध्ये असताना इंग्रजी भाषेच्या पलीकडे जावून अर्णबला ओळख मिळाली.

अर्णबचे त्यावेळचं नक्की काम सांगायचं झालं तर २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सलग २६ तास अँकरिंग केलं आहे. त्यामध्ये त्यांनी २०० हून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. २६/११ च्या घटनेनंतर ६५ तासांच रिपोर्टिंग त्यांनी केली आहे.

पुढे कॉमनवेल्थ घोटाळा, आण्णा आंदोलन यामधून अर्णब आणि टाइम्स नाऊ यांना सर्वोच्च स्थानावर आणून ठेवलं. अखेरीस अर्णबने एनडीटीवी, सीएनबीसी-टीवी १८ ला मागं टाकलाच. २ दशक पत्रकारितेमध्ये काम केलेल्या अर्णब यांचं एक दशक एका रूपात आणि दुसरं दशक वेगळ्याच रूपात गेलं.

२०१६ मध्ये अर्णब यांनी न्यूजरुममधल्या राजकारणाला कंटाळून स्वत:चा रिपब्लिक चॅनेल सुरू केला. पण त्याची सुरुवात पण घोळातूनच झाली होती. (त्यांचा किस्सा तुम्ही इथे वाचू शकता). तिथून पुढचा इतिहास तुम्हला माहीतच आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.