सचिन मॅचचा पहिला बॉल का खेळायचा नाही ?
आपल्या लहानपणाची एक आठवण नेहमीच मनात कोरलेली आहे. भारताच्या मॅचवेळी सचिन आणि गांगुलीची ओपनिंग.
त्याकाळात हे दोन्ही बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये होते. डावखुरा गांगुली आणि उजवा सचिन ह्या जोडीला रोखायचं कसं हा प्रतिस्पर्धी बॉलरनां पडलेला प्रश्न असायचा. पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये त्यांनी अनेक भल्या भल्या फास्ट बॉलरसना पाणी पाजलं होत. जगातली आता पर्यंतची सर्वोत्कृष्ट ओपनिंग जोडी म्हणजे सचिन आणि गांगुली. त्यांच्या जोडीने १३६ इनिंगमध्ये एकत्र बनवलेल्या ६६०९ रन्स, २१ शतके हे विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही.
पण गांगुली आणि सचिन या जोडीत पहिला बॉल नेहमी गांगुली खेळायचा. सचिन ने कधीच पहिली स्ट्राईक घेतलेलं आठवत नाही.
आपल्याला सचिन आवडायचा. मला तर वाटायचं गांगुली कॅप्टन असल्यामुळे मराठी माणसावर म्हणजेच सचिनवर अन्याय करतो आणि पहिला बॉल स्वतः खेळतो. ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सुद्धा एक रन काढून स्ट्राईक स्वतः जवळ ठेवतो. तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना तसच वाटत असणार आहे, हो ना? पण खरी गोष्ट तशी नव्हती. दोघे शेवटपर्यंत एकमेकाचे भारी दोस्त होते.
गांगुलीने मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे.
सचिन स्वतःच कधी पहिला बॉल खेळायचा नाही. त्याची त्याबद्दल नेमकी काय अंधश्रद्धा होती ठाऊक नाही पण सौरवने कित्येकदा विनंती करूनही तो त्याला नाही म्हणायचा. सचिनच म्हणण असायचं की,
“भारताच्या इनिंगच्या पहिल्या बॉलवेळी प्रेक्षकांचा खूप मोठा गोंधळ असतो आणि त्यात जर मी पहिला बॉल खेळलो तर त्या दंग्यात आणखी जास्त वाढ होते. फक्त एका बॉलचा प्रश्न आहे. तू एक धाव घेतल्यावर तिथून पुढे मीच स्ट्राईक वर असेन.”
या लॉजिक पुढे गांगुली काही म्हणू पण शकत नव्हता. एकदा तो बरेच सामने अपयशी होत होता, पाकिस्तानची सिरीज होती. वसीम अक्रम शोएब अख्तर फॉर्म मध्ये होते. त्यामुळे गांगुलीने तेंडुलकरचे हातपाय पकडून विनंती केली की बाबा यावेळी पुरती तरी तू पहिली स्ट्राईक घे. सचिन शेवटपर्यंत नाहीच म्हणत होता.
अखेर गांगुलीने आयडिया केली.
सचिन आणि गांगुली मैदानात उतरले. खचाखच भरलेल्या स्टेडियमच छत उडून जाईल एवढा जल्लोष दोन्ही संघाच्या फॅन्सकडून होत होता. सचिन बेसावध असलेलं बघून गांगुली गडबडीत जाऊन नॉनस्ट्राईकर एंड ला जाऊन उभा राहिला. सचिनची पंचाईत झाली.
तिथं विरोधी टीमच्या समोर गांगुलीला तो काही म्हणू पण शकत नव्हता. आणि म्हटला जरी असता तर बॉलरला वाटलं असत की जगातला सगळ्यात भारी बॅटसमन आपला सामना करायला घाबरला.
सचिनने गुमान जाऊन पहिला बॉल खेळला. दोघांनी सुद्धा चांगला स्कोर केला. मॅच संपल्यावर सचिनने गांगुलीची धुलाई केली का माहित नाही पण परत पुढच्या मॅच पासून गांगुलीच पहिला बॉल खेळू लागला.
अशीच वेळ सचिन आणि सेहवाग सलामीला यायला सुरवात झाल्यावर देखील झाली. गांगुलीच्या खालोखाल तेंडुलकरची पार्टनरशिप सेहवाग बरोबर चांगली जुळली पण सचिन इथे पण ओपनिंगला यायचा नाही.
२००३सालचा विश्वकपचा भारत पाकिस्तान सामना. सेहवाग ला लेफ्ट आर्म फास्ट बॉलींग खेळताना थोडीशी अडचण व्हायची. यामुळे तो सुरवातीपासून सचिनच्या मागे लागला होता की,
“पाजी मुझे अक्रम को फेस नही करना है. आप इनिंग की शुरवात करो.”
शेवटपर्यंत सचिन काही बोलला नाही. सेहवाग पाकिस्तानची इनिंग संपेपर्यंत त्याला रिक्वेस्ट करत होता. जेव्हा दोघे मैदानात उतरले तेव्हा मात्र सचिनने सेहवागच्या ऐवजी स्वतः सुरवात केली आणि अख्तर,अक्रमची आयुष्यातली सर्वात मोठी धुलाई करून इतिहास घडवला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या फायनल सामन्यात सुद्धा सचिन पहिला बॉल खेळण्यासाठी आला पण यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकली नाही.
हे ही वाच भिडू.
- आठवतय, गांगुलीने मारलेल्या सिक्सरने प्रेक्षकाचं कपाळ फुटलं होतं !
- आणि सचिनने वकार युनुसला खुन्नस देत मैदानातच शिवी दिली, “तुज्यायचा घो” !
- २००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.
- शारजा मध्ये अस काय झालं होतं, की तिथे क्रिकेट खेळणं अचानक बंद झालं.