राजेंद्र दर्डा यांची ‘बनवाबनवी’ !!

विलासराव देशमुखांच्या आघाडी सरकारची पहिली टर्म सुरु होती. लोकमतचे संस्थापक व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचे सुपुत्र राजेंद्रजी दर्डा हे त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थ व उर्जा खात्याचे राज्यमंत्री होते. औरंगाबाद येथून विधानसभेवर निवडणून गेलेले राजेंद्र दर्डा हे राजकारणात  नव्यानेच आले होते. तरीही त्यांच्याकडे या महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद देऊन विलासरावांनी मोठीच जबाबदारी सोपवली होती.

त्याकाळी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी चर्चा जोरात चालत. तेव्हाचे विरोधी पक्षदेखील ताकदवान होते. त्यांच्याकडेही अभ्यासपूर्ण वक्त्यांची जंत्री असायची. सरकारला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना भाजपचे नेते तयारी करून प्रश्न विचारायचे. भले भले मंत्री उत्तर देताना जेरीस यायचे.

असाच एक किस्सा विधानसभेत घडला होता.

शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रमोद नवलकर प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले. त्यांचा प्रश्न विजखात्याशी संबंधित होता. याला उत्तर देण्याची जबाबदारी उर्जा राज्यमंत्री म्हणून राजेंद्र दर्डा यांची होती. प्रश्नउत्तराची फैरी सुरु होती. प्रमोद नवलकर हे हे जुने जाणते नेते असल्यामुळे त्यांना प्रश्नासंबंधी खाचाखोचा माहित होत्या. राजेंद्र दर्डा सुद्धा आत्मविश्वासाने उत्तरे देत होते. अखेर प्रमोद नवलकरांनी शेवटचा प्रश्न विचारला,

“अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करायची असेल तर ती कुठे करायची?”

दर्डानी त्यांना मुंबईमधल्या मुख्य कार्यालयात पोस्टबॉक्सवर पत्र पाठवण्यास सांगितले. प्रमोद नवलकरांच्या बंदुकीतून फट्ट करून  पुढचा प्रश्न सुटला.

“त्या पोस्ट बॉक्सचा नंबर काय?”

राजेंद्र दर्डांना या प्रश्नाच उत्तर येणार नाहीत याची त्यांना खात्री होती. पण मंत्रीमहोदयांनीनी तत्काळ उत्तर दिलं,

“४४”

प्रमोद नवलकर यांना धक्काच बसला. आजकालचे तरुण मंत्री चांगली तयारी करून सभागृहात येतात असं म्हणत आश्चर्याने ते खाली बसले. पुढे चर्चा संपल्यावर नवलकर गडबडीत दर्डांच्या दालनात गेले आणि त्यांना म्हणाले,

“राजेंद्रबाबूजी, तुम्ही अचूक माहिती ठेवता हे मान्य पण पोस्ट बॉक्स नंबर देखील माहिती आहे म्हणजे कौतुकचं म्हणलं पाहिजे.”

दर्डानी उत्तर दिलं,

“नवलकर साहेब, खरंतर मला तो पोस्ट बॉक्स नंबर माहित नव्हता. पण लोकमतमध्ये काम करताना मला जो पोस्ट बॉक्स नंबर माहिती होता तोच मी सांगून टाकला. तुम्हालाही माहिती नाही हे मला माहिती होते.”

नवलकर दिलखुलास हसले. दर्डांचं हे प्रसंगावधान, त्यांची ही बनवाबनवी बघून नवलकरांनी त्याचं कौतुकच केलं. हा किस्सा स्वतः राजेंद्र दर्डा यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या स्मृती ग्रंथात लिहून ठेवलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.