गावातल्या दलितांना हक्काचं पाणी मिळावं म्हणून बापूंनी मोठी मोहीम सुरू केली

स्वातंत्र्यसंग्रामातील धगधगते यज्ञकुंड आणि जाज्वल्य देशभक्तीचा इतिहास म्हणजे प्रतिसरकारचे पर्व, नकली बाहुबली पाहून टाळ्या आणि शिट्या वाजवणाऱ्या आजच्या पिढीने जर हा इतिहास अभ्यासला तर त्यांना वास्तवातले बाहुबली अनुभवयास मिळतील. या बाहुबलींचे शौर्य, पराक्रम, त्याग आणि बलिदान पाहून नतमस्तक व्हावं वाटतं. स्वातंत्र्यासाठी या पिढीने जे सोसलंय, भोगलंय त्याची कधीच उतराई होऊ शकत नाही.

अश्याच प्रतिसरकारचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील या धुरंधर योद्ध्याकडे होते तर सेनापती होते जी. डी. बापू उर्फ गणपती दादासो लाड. प्रतिसरकारची राजधानी होती सांगली जिल्ह्यातली पलूस गावातली कुंडल. बापूंचे गावही कुंडलच. औंध संस्थानात असलेले हे गाव आणि जी. डी. बापू म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाचा धगधगता इतिहास या माणसांना भाष्यकार लाभले नाहीत.

त्यांचे मोठेपण, महानपण सांगितले गेले नाही. पण ही माणसं असामान्य आणि आभाळाच्या उंचीची होती. बापूंनी प्रतिसरकारच्या कामासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत प्रतिसरकारची उभारणी केली. इंग्रजांची सत्ता खिळखिळी केली. केवळ युनियन जॅक फडकवला नाही तर त्या सत्तेची पाळंमुळं उखडून काढली.

हेच करत असताना त्याकाळात अस्पृश्यता जोरात होती. दलित समाजातल्या लोकांना स्पर्श करत नव्हते. त्यांची सावलीही अंगावर पडू देत नव्हते. जनावरांना घरात प्रवेश होता. कुत्री- मांजरं कौतुकाने सांभाळली जात होती पण माणसासारखा माणूस अस्पृश्य ठरवून त्याला पिळले जात होते. त्याला गावाच्या पाणवठ्यावर पाणी भरता येत नव्हते.

याचा अनुभव  बापू आपल्या आत्मकथनात सांगतात. बापू स्वत:च सामाजिक पिळवणुकीचे बळी ठरले होते. गरिबांघरी जन्मलेल्या बापूना महाराचे पोर समजून एका ब्राह्मणाने डोक्यात सोटा मारला होता. सत्यशोधक विचारावर पोसलेले बापू वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी संघाच्या शाखेवर जात होते. तिथे दांडेकर नावाचे गृहस्थ त्यांचे वर्ग घेत होते. शौर्य सांगत होते. मुस्लिमांविरुद्ध लढायला सांगत होते. मुस्लीम आपले शत्रू आहेत, त्यांच्याविरुद्ध लढले पाहिजे. गावात जे डोले निघतात त्यावर दगड मारले पाहिजेत, असे सांगितले जायचे. 

पण स्वतःचा मेंदू जिवंत असणाऱ्या बापूंना प्रश्न पडत होता की, आपल्यावर इंग्रजांचे राज्य मग मुस्लीम आपले शत्रू कसे? बापूंना लहानपणीच हा प्रश्न पडला होता.

दरम्यान, संघाच्या शाखेवरूनच शालेय पुस्तकासाठी पैसे गोळा केले होते. सहामाही आली तरी पुस्तकं मिळाली नव्हती. सगळे विद्यार्थी पुस्तकांची वाट पाहात होते. बापूंनी त्याबाबत शाखेवर विचारणा केली. त्यावर संघनायक जो गावातलाच ब्राह्मण होता. तो बापूंच्या अंगावर मारायला धावला. तो खवळून बापूंना म्हणाला, 

“तुम्हाला पुस्तकं कशाला हवीत? तुम्ही शिकून काय करणार आहात? आम्ही सांगू तसंच तुम्ही राहायचं. पुस्तकं मिळतील तेव्हा दिली जातील.” अशी तंबी देत ‘असल्या भिकार लोकांनी संघाच्या शाखेवर येऊ नये’ असे सांगत बापूंना हाकलले.

 त्याचदरम्यान आणखी एक घटना घडली होती. त्यांच्या गावात पिठाची चक्की एका ब्राह्मणाचीच होती. ते घरातले दळण घेऊन चक्कीवर गेले होते. त्यांच्या अंगावर मळकट, फाटकी कपडे होती. गरिबीमुळे अवतार गबाळा होता. ते चक्कीच्या भिंतीला टेकून उभे होते. त्या ब्राह्मण चक्कीवाल्याला वाटले ते महाराच्या घरातले आहेत. त्याने तिथलाच एक टणक लाकडी सोटा बापूंच्या डोक्यात हाणला. लहानगे बापू कळवळले. रडत घरी गेले. डोक्यात मोठा टेंगूळ आला होता. पोराला मारलेले पाहून लाड मंडळी संतापली आणि विचारावयास गेली. तेव्हा त्या ब्राह्मणाने माफी मागितली. “मला वाटले ‘महाराचे पोर’ आहे म्हणून मी मारले” असे त्यांना सांगितले.

 या घटनांनी बापूंच्या मनात जातीयवादाविषयी तीव्र संताप निर्माण झाला. दलितांच्यावरील अन्यायाची जाणीव झाली. सामाजिक भेदभावाबाबत संताप निर्माण झाला. आणि यातूनच  ‘एक गाव एक पाणवठा’ मोहिमेला सुरुवात झाली. 

Leave A Reply

Your email address will not be published.