मास्तर शिक्षक म्हणून ग्रेट होतेच पण राजकारणी म्हणून देखील त्यांनी मोठा आदर्श निर्माण केलाय
सलग १८ वर्षे आमदार म्हणून निवडून आलेले प्रधान मास्तर’ मात्र तरीही सत्तेच्या राजकारणात न रमणारे अगदी साधे व्यक्तिमत्व. सलग अठरा वर्षे आमदार म्हणून वावव्रले मात्र त्यांचं हे वावरणे काही बडेजावात नसायचे कायमचे साधेपणाने राहायचे. समतेच्या लढ्यासाठी लढणारा आमदार ! चळवळीत असले तरीही त्यांच्यातला ‘राजकारणी’ कायम जागा असायचा.
आमदारकी राबवत असताना त्यांच्यातला राजकारणी ही तेवढाच पारदर्शक आणि प्रामाणिक होता.
पैसा कमी होण्यापेक्षा समाजातील सुधारणा करण्यावरती खरोखरच त्यांचा विश्वास होता. आणि तेच त्यांनी त्यांच्या आयुष्यभर पसंत केले. प्रधान मास्तर असे एकमेव असे राजकारणी होते जे त्यांच्यातील साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, जीवन ही वेगवेगळी ठेवायचे.
पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सोळा वर्षांची प्राध्यापक ची नोकरीही व्यवसायाने जरी नोकरी असती तरी ते मुळातून प्राध्यापक होते म्हणजेच शिकवण यातील रसाळता, सखोलता यांचा अभ्यास त्यांनी वेळोवेळी विधान परिषदेतील कामकाजातूनही दाखवून दिली आहे, आणि ती इतर राजकारण्यांनी देखील अनुभवली आहे.
मास्तर चळवळीतही होते, राजकारणातही होते परंतु हे सगळं करताना त्यांचा संयम मात्र कधीही संपू दिला नाही आणि त्यामुळे त्यांची १६ वर्षांची आमदारकी स्वच्छ आणि पारदर्शी दिसते.
दिवस निघाला की हा माणूस बाजारात जाऊन दुधाची पिशवी आणि एका हातात भाजी घेऊन येताना कित्येकांनी पाहिलाय.
एकदा एक संयोजक मास्तरांना निमंत्रण देण्यासाठी औरंगाबादहुन त्यांच्याकडे भेटायला आले होते, आणि त्यांना आमदार साहेब एका हातात दूधाची पिशवी आणि भाजी घेतलेले दिसले आणि त्यांना त्या अवस्थेत पाहिल्यावर धक्काच बसला. हो सहाजिकच आहे. एवढा मोठा आमदार दुधाची पिशवी बाजारात आणायला जातो?
कारण आमदार म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर मोठा बंगला, बंगल्यासमोर दोन-चार चारचाकी हमखास उभ्या असताना दिसतात. पण हे सगळं चित्र कुठं आणि प्रधान मास्तर कुठं? समाज जीवनात वावरताना महात्मा गांधींनी सांगितलेल्या साधेपणाचा विचार घेऊन जगणारी माणसं सध्याच्या काळात खूपच कमी आहेत. त्यातलेच मास्तर !
याची प्रचिती देणारा एक किस्सा आहे.
प्रधान मास्तर राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरचा एक प्रसंग. हा प्रसंगच सांगून जातो की, मास्तर किती साधे होते.
एका पुस्तक प्रकाशनासाठी औरंगाबादला स्वतंत्र मोटार करून या असं या संयोजकांनी सांगितलं होतं. प्रधान मास्तर संयोजकांनी सांगूनही बसनेच गेले. तिथे गेल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सांगितलं आम्ही खर्च देणारच होतो तुम्ही कसं काय बसने आलात?
तेव्हा प्रधान मास्तर म्हणाले, “एका माणसासाठी कार परवडत नाही. पैसा असा वाया घालवू नय, असं मला वाटतं म्हणून मी बसने निघून आलो.”
आमदार कार्यक्रमाला आले म्हणून संयोजकांनी त्यांची व्यवस्था सरकारी विश्रामधामात करायची ठरवली परंतु मास्तरानी त्यांना उत्तर दिलं, “माझ्याएवढ्या सडपातळ माणसासाठी तुमच्या घरात जागा नाही का? कशाला तिकडचा खर्च आणि एवढा तामझाम?” संयोजक पुन्हा चक्रावले. त्यांच्या लक्षात आले हा माणूस खूप साधा सरळ आहे.
आपल्या कृती -आचार – विचारातून समोरच्या लोकांचा बोलती बंद करण्याचा गुणच मास्तरांमध्ये होता.
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपून मास्तर पुण्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले. संयोजकांनी तेव्हाही काळजी करून प्रवास खर्चाचे पाकीट त्यांना सन्मानपूर्वक दिले. तर त्यांनी तेही परत केले आणि कारण काय सांगितलं तर, “स्वातंत्र्यसैनिक म्हणून माझ्याकडे पास आहे”. आता यावर संयोजक काय म्हणणार…असो अशी विचारांची बांधिलकी सापडते ती अभावानेच !
आणखी एक प्रसंग !
मास्तर पुण्यात पायी फिरतात, रिक्षातून फिरतात, एसटीमधून लांबचा प्रवास करतात ते त्यांच्यासाठी त्रासाचे होईल म्हणून मास्तरांच्या चाहत्यांनी त्यांना कार भेट देण्याचा प्रस्ताव आणला. तर तो त्यांनी फेटाळून लावला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आजही लक्षात राहते,
“तुम्ही मला कार भेट द्याल मग ड्रायव्हरचा पगार, पेट्रोलचा खर्च कोण देणार ?माझी ताकद नाही….असे होते मास्तर.
समाजकार्याच्या बाजारात असे अनेक लोक आहेत जे म्हणतात ज्ञान झोपडीपर्यंत गेलं पाहिजे पण त्यांनी झोपडीच कधी पाहिलेली नसते. जनतेच्या मतांवरच त्यांचा डोळा असतो. राजकारण करण्यासाठी अशा समाजकार्याचा वापर करणारे अनेकजण आपल्याला दिसतात. पण मास्तरांनी वेळोवेळी केलेले तरुणांच्या प्रश्नांचे चिंतन, संघटित- असंघटित कामगारांविषयी केलेलं लेखन उद्याच्या चांगल्या दिवसांसाठी म्हणून स्वीकारलं जावं हेच खूप मोठं यश म्हणावं लागेल.
प्रधान मास्तर शिक्षक म्हणून ग्रेट होतेच पण राजकारणी म्हणून देखील त्यांनी मोठा आदर्श निर्माण करून ठेवलाय हे नक्की.
हे हि वाच भिडू :
- बॉम्ब बनवणारा शाळा मास्तर बीडचा पहिला खासदार बनला.
- यशवंतराव इंदिरा कॉंग्रेसमध्ये परत का गेले याचं उत्तर प्रधान मास्तरांना मिळालं…
- तुम्ही इलेक्शनमध्ये व्यस्त होता तेव्हा झेडपीच्या मास्तरांनी ७ कोटीचा पुरस्कार जिंकला..