चारित्र्यवान प्रधान मास्तरांच्या गादीखाली साडी सापडते तेव्हा…
महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते चारित्र्यवान राहिले. भ्रष्टाचार असो कि व्यक्तिगत चरित्र असो राजकारणात सक्रिय असून देखील त्यांच्यावर एखादा खोटा आरोप करण्याच धैर्य देखील विरोधकांना झालं नाही.
अशा काही निवडक नेत्यांमध्ये कधीही कोणताही डाग न लागलेले ग. प्र. प्रधान मास्तर सर्वात वरच्या क्रमांकावर येतात.
२० वर्ष ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते, १८ वर्ष ते आमदार राहिले पैकी २ वर्ष ते विरोधी पक्षनेता म्हणून काम पहात होते. विधान परिषदेचे देखील ते सभापती होते. याचसोबत समाजकारणात देखील सक्रिय होते.
व्यासंगी अभ्यासक, देशभक्त, समाजसेवक, राजकारणी, प्राध्यापक अशा वेगवेगळ्या भूमिकेत जेव्हा ते असत तेव्हा प्रत्येक क्षेत्रात त्यांच्याइतका भारी माणूस कोणीच नव्हता असेच लोक म्हणत असतं.
या सर्व गोष्टींच्या मागे अजून एक गोष्ट होती म्हणजे वैयक्तिक नितीमत्ता. इतक्या काळात त्यांच्या अंगावर कोणताही डाग लागला नाही. अगदी स्वच्छ धुतलेला नेता म्हणून माणसं आजही प्रधान मास्तरांना ओळखतात.
प्रधान मास्तर आमदार होते तेव्हा ते आमदार निवासात रहायला असत. त्यांच मुंबईत स्वतंत्र अस घर नव्हतचं. त्यामुळे मुंबईत विधीमंडळातच्या कामासाठी येताना मुक्काम आमदार निवासातच ठरलेला असायचा.
याची देखील स्वतंत्र अशी चौकट त्यांनी आखली होती. म्हणजे प्रधान मास्तर सोमवार ते शुक्रवार विधीमंडळाच्या कामांसाठी मुंबई असत तेव्हाच ते आमदार निवासातील त्यांच्या खोलीत रहायचे. शुक्रवारी ते पुण्यात यायचे आणि पून्हा सोमवारी ते मुंबईला जायचे अशी त्यांची चौकट ठरलेली होती.
ठरल्याप्रमाणे सोमवारी प्रधान मास्तर आमदार निवासातील त्यांच्या खोलीत जाण्यासाठी आले. काऊंटरवर गेले आणि त्यांच्या खोलीची चावी मागून घेतली. खोली व्यवस्थित करत असताना त्यांना आपल्या गादीखाली साडी दिसली.
साहजिक नैतिकता जपणारे प्रधान या गोष्टीवरून खवळले. आपल्या न कळत आपल्या खोलीचा वापर करण्यात येतो ही गोष्ट प्रधानांना सहन न करण्यासारखीच होती. एका मिनीटात आमदार निवासातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलं.
आमदार निवासाचे व्यवस्थापक प्रधान मास्तरांना शांत होण्याचा सल्ला देऊ लागले, पण पारा चढलेला. माझ्या न कळत इथे कोणती बाई आली होती व माझ्या खोलीचा कसा वापर केला हाच प्रधान मास्तर चिडण्याचा विषय होता.
तासभर गेला, व्यवस्थापक चौैकशी करु लागले इतक्यात काऊंटरवर प्रधान मास्तरांना एक फोन आला. फोनवर अनुताई लिमये बोलत होत्या.
त्या प्रधान मास्तरांना म्हणाल्या,
माझी साडी मी तुमच्या खोलीत विसरली आहे. कामासाठी मुंबईत रहायला लागणार होते. अचानक कुठे रहायचे म्हणून तुमच्या गैरहजरीत मीच चावी घेऊन तुमच्या खोलीवर रहायला गेले होते. तिथे माझी साडी विसरली अस त्या सांगत होत्या.
अनुताई लिमये यांनी ही गोष्ट सांगताच प्रधानांचा चढलेला पारा तात्काळ उतरला, आपल्या खोलीचा कोणत्यातरी चुकीच्या गोष्टीसाठी वापर झाला असावा ही शंका मिटली आणि प्रधानांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हे ही वाच भिडू
- नगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला
- शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून फसवलं ?
- मारामारीचं निमित्त झालं आणि सातारच्या छत्रपती घराण्याची राजकारणात एन्ट्री झाली.