‘गदर’ पिक्चरचे ओरिजनल हिरो बुटासिंग होते

2001 मधील जूनचा महिना. भारतातील जवळपास सगळ्या थेटरमध्ये सनी पाजीच्या ‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ या डायलाॅगवर टाळ्या न् शिट्यांचा अक्षरशः पाऊस होता. विशेष म्हणजे याच दिवशी आमिरचा ‘लगान’ देखील रिलीज झाला होता.

पण आमिरच्या क्रिकेट मॅचपेक्षा सनी पाजीचा पाण्याचा पंप उपसायाचा सीन भाव खावून गेला.

‘लगान’चा रिस्पॉन्स नंतर वाढला पण त्यावेळी ‘गदर’ला भारतासोबतच पाकिस्तानमधल्या प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले होते. कमाईच्या बाबतीत देखील गदर उजवा ठरला. बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनच्या भाषेत सांगायचे झाले तर चित्रपटाचा एकूण खर्च हा 18 कोटी रुपये इतका होता आणि रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने त्यावेळी 256 कोटींचा गल्ला कमावला होता.

ते ही तिकिटाचे दर पंचवीस रुपये इतकेच होते.

भारत – पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभुमीवर असलेल्या या चित्रपटामध्ये सनी देओल (तारासिंग) आपल्या पत्नीला म्हणजेच सकिनाला (अमिषा पटेल) आणण्यासाठी पाकिस्तानात जातो. आणि तिथूनच भारतात ‘प्यार को कोई सरहद रोक नही सकती’चा ट्रेंड फॉर्ममध्ये आला.

पण भिडूनों तुम्हाला हे माहिती आहे काय की ‘गदर’ ही नुसती चित्रपटाची कथा नसून एका जवानाच्या वास्तविक जीवनावर आधारित असलेली ओरिजनल स्टोरी आहे.

हि कथा आहे ‘बूटा सिंग’ या भारतीय जवानाची. आजच्या दिवसात बुटा सिंग यांचे नाव फार कमी लोकांना माहित असले तरी एक काळ असा होता की त्यांची प्रेमची कथा प्रत्येकाच्या तोंडपाठ होती.

त्यांनी प्रेमात दिलेली शहादत पाहून त्यांना ‘शहीद-ए-मोहब्बत’ म्हणत होते.

बुटा सिंग कोण होते?

बुटासिंग यांची ही गोष्ट सुरु होते भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी. म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. बुटासिंग भारतीय सैन्यात एक जवान म्हणून कार्यतर होते. आणि दुसऱ्या महायुद्धात ड्युटीवर होते. जवळपास तीन-साडेतीन वर्ष आपले तरुणपण महायुद्धात घालवल्यानंतर बुटा आपल्या देशात परतले.

घरी परत येतानाच इथून पुढचा आता सगळा वेळ आईसाठी द्यायचा असं ठरवून ते सेवानिवृत्ती घेवून येतात. पण आल्यावर बुटांचे आयुष्य बदलले होते. त्यांच्या आईचे निधन झाले होते. आईच जाणे हा त्यांना आल्यानंतरचा त्यांना सगळ्यात मोठा धक्का होता.

बुटा आता पुर्णपणे एकटे पडले होते. ते कधी कधी घराच्या दारात आईच्या आठवणीत एकटेच बसत असत.

रिटायरमेंटमुळे त्यांचा सैन्यात परत जाण्याचा मार्गही बंद झाला होता. गावातील त्यांचे शाळेतले काही दोस्त होते, पण ते ही लग्न करून आप-आपल्या वैयक्तिक आयुष्यात बिझी झाले होते. त्यावेळी त्यांनी बुटांना लग्न करण्याचा सल्ला दिला.

बुटा यांनीही या सल्ल्यावर विचार केला आणि लग्नासाठी पैसे जुळवण्यास करण्यास सुरवात केली.

यावेळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहु लागले होते. फाळणीची प्रक्रिया चालू झाली होती. सगळ्या देशभर स्थलांतरीतांचा गोंधळ उडाला होता. जगाच्या नकाशावर भारतासोबतच पाकिस्तान हे नवे राष्ट्र उदयास आले होते. भारताच्या बऱ्याच भागातील लोक पाकिस्तानमध्ये जात होते.

पण अशातच कोणाला काही कळायच्या आत स्थलांतराच्या या प्रक्रियेने दंगलीचे रूप घेतले. लोक एकमेकांच्या रक्तासाठी तहानली होती.

सगळीकडे मृत्युचे काळे ढग जमा झाले होते.

दरम्यान, बूटासिंग नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या दारापाशी बसले होते. तेव्हा अचानक एक सुंदर मुलगी त्यांच्याकडे मदतीसाठी आली, तिने घाबरत घाबरतच आपल्यामागे दंगलखोर लागल्याचे सांगितले. बुटासिंगने तिला काहीही न प्रश्न न करता स्वतःच्या घरात प्रवेश दिला.

काही क्षणात दंगलखोर तेथे पोहोचले आणि त्यांनी बुटाला त्या मुलीस त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले.

बुटा अडचणीत सापडला होते, काय करावे या विचाराने ते पुरते गोंधळून गेले होते. त्यांना हे ठाऊक होते की या भांडणाचा कोणताही फायदा होणार नाहीये. त्यामुळे त्यांनी आपल्या लग्नासाठी साठवलेले पैसै दंगलखोरांना देवून ते प्रकरण तिथेच निकाली लावले. पैसे मिळताच गुंडही तिथून निघून गेले.

ती मुलगी अजूनही खूप घाबरली होती. बुटा पुढे गेले आणि तिला पाणी आणून दिले आणि आधार देत म्हणाले,

“तुम्ही इथे सुरक्षित आहात. आपले डोळे उघडा आणि पाहा इथे कोणीच नाही”

ती मुलगी मुस्लिम होती. तिचे नाव ज़ेनाब. बाहेर झालेल्या तणावाच्या वातावरणात ज़ेनाबने बुटाच्या घरीच राहणे योग्य समजले.

पण, एक मुलगी बुटाच्या घरात लग्नाशिवाय राहत असल्यामुळे गावच्या पंचायतीला हे अजिबात मान्य नव्हते. त्यांनी बुटासिंगला बोलावून त्यांच्या समोर दोन अटी ठेवल्या. ते म्हणाले की “एकतर मुलीला घरातून बाहेर काढून तिला परत पाठवा किंवा तिच्याशी लग्न करा”. बुटाने तिला परत पाठवणे योग्य समजले आणि त्यांनी ज़ेनाबची लाहोरला जाण्याची व्यवस्था केली.

ज्या दिवशी ज़ेनाब लाहोरला जाणार होती त्याच दिवशी तिने बुटासमोर आपले मन मोकळे केले. ती बुटाला म्हणाली,

“जर तुम्ही माझ्यासाठी दोन वेळच्या जेवणाची जरी व्यवस्था केली तर मी कधीही पाकिस्तानात जाणार नाही. मला माझे संपूर्ण जीवन तुझ्याबरोबर घालवायचे आहे.”

झेनाबचे बोलणे ऐकताच बुटानेही तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. दुसर्‍या दिवशी दोघांनीही लग्न केले. एका वर्षातच दोघांना एक मुलगाही झाला.

बुटाचे आयुष्य आता रुळावर आले होते. ते बायको आणि मुलासह आनंदात होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दंगलीमुळे आपल्या कुटूंबापासून विभक्त झालेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. लगेचच त्यांची यादी तयार करण्यात आली.

या यादीमध्ये ज़ेनाबचेही नाव होते. तिला जाण्याची इच्छा नव्हती, परंतु कुटुंबियांना भेटण्याच्या इच्छेमुळे ती आपल्या मुलासह पाकिस्तानात परतली.

ज़ेनाबच्या जाण्याने बुटा पुन्हा एकदा एकटे पडले. मात्र ज़ेनाबने बुटाला वचन दिले होते की ती काही दिवसात परत येईल, म्हणून ते दररोज तिच्या येण्याची वाट पाहत होते. हळूहळू दिवस गेले, आठवडे गेले, महिने झाले. पण ज़ेनाब परतली नाही.

त्यावेळी त्याने स्वत: आपल्या पत्नीला घेवून येण्याचे ठरविले. त्यासाठी ते संबंधित कार्यालयात गेले. परंतु भारतीय असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला पाकिस्तानचा व्हिसा दिला नाही. त्यावेळी बुटांनी नाईलाजाने मुसलमान होवून चोरुन पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी आपले केस कापून ते मुस्लिम बनले.

पुढच्या काही दिवसांत ते पाकिस्तानमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्वांच्या नजरेपासून लपत ज़ेनाब राहत असलेले नूरपूर गावं गाठले, परंतु ज़ेनाबच्या घरातील लोकांनी त्यांना आपल्या पत्नीला भेटू दिले नाही.

त्यांना अत्यंत वाईट आणि अपमानास्पद वागणूक देऊन पोलिसांच्या हवाली केले. बुटाविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यांनी पाकिस्तानात येण्याचे खरे कारण सांगितले.

न्यायालयानेही बुटाच्या शब्दांवर विश्वास ठेवत ज़ेनाबला न्यायालयात हजर करण्यास सांगितले.

जेव्हा ज़ेनाबला न्यायाधीशांसमोर उभे केले, तेव्हा तिने घरच्यांच्या दबावासमोर झुकत बुटाला ओळखण्यास साफ नकार दिला. हे ऐकून बुटाच्या पायाखालची जमीनच सरकली. बुटा आतुन हादरुन गेले. न्यायालयाने बुटाला भारतात परत जाण्याचे आदेश दिले.

झाला प्रकार बूटासिंग सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी चालत्या ट्रेनसमोर जीव उडी मारुन आत्महत्या केली.

मृत्युनंतर त्याच्याकडे एक पत्र सापडले होते, ज्यात त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचे दफनविधी ज़ेनाबच्या नूरपूर गावात केले जावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची कबर तिथेच असावी अशी इच्छा होती, ज्यामुळे एक न् एक दिवस ज़ेनाब तिथे येवून त्यांना भेटू शकेल.

बुटाचे हे पत्र वाचून सर्वांचे डोळे ओले झाले. सगळे जग त्यांना सलाम करत होते. बुटा आता जिवंत नव्हते, पण त्यांचे प्रेम अजरामर झाले होते. त्यांच्या प्रेमाची शहादत पाहून त्यांना ‘शहीद-ए-मोहब्बत’ म्हणू लागले होते.

बुटा सिंग हे असे नाव होते ज्यांना प्रेमासाठी सर्व मर्यादा तोकड्या पडल्या.

मात्र ‘गदर’ चित्रपटाचा शेवट काहीसा बदलण्यात आला आहे. खर तर चित्रपटाच्या मुळ कथेमध्ये जो क्लायमॅक्स होता त्यामध्ये सकीना पात्राचा बंदुकीची गोळी लागुन मृत्यू झालेला दाखवले जाणार होते. मात्र हा शेवट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार नाही व चित्रपटात नकारात्मक प्रतिसाद मिळेल म्हणून ऐनवेळेस चित्रपटाचा शेवट बदलला गेला व सकीनाला जिवंत दाखवून हॅपी एंडिंग करण्यात आला. तिचा मुलगा तिच्यासाठी गाणे गातो व ते ऐकून ती उठून बसते हा शेवट ऐनवेळचा बदल होता.

  •  ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.