एकाच महिन्यात भामरागड येथे ७ वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. विचार करा त्यांनी काय केलं असेल.

या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवून ठेवला आहे. कोल्हापूर-सांगली हे या पुराचे पहिले बळी ठरले,मोठ्या प्रमाणात लोकांना संकटांना सामोरे जावे लागले. यांच्या मदतीसाठी शासन-प्रशासन धावून आले संपूर्ण महाराष्ट्रातून विविध लोकांकडून मदतीचे हात पुढे यायला लागले. कोल्हापूर- सांगली वासीयांचे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा दिला.

जसा काय या भागातला पूर ओसरायला लागला महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात म्हणजेच गडचिरोलीत ही परिस्थिती निर्माण व्हायला लागली.

या जिल्ह्यातील भामरागड, अहेरी व इतर तालुक्यात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता सुद्धा अनेक गावांमध्ये ही परिस्थिती आहे. भामरागड तालुक्यातुन पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नद्या जातात आणि तालुक्याच्या ठिकाणी या नद्यांचा संगम आहे. मुसळधार पावसाने या नद्यांना पूर आला होता आणि तसेच तालुक्यातील सर्वच लहान मोठे नाले पूर्ण पणे भरलेले होते.

२०० हुन अधिक गावांचा संपर्क तुटलेला होता. अनेक गावे पाण्याखाली होती. अनेक गावांमध्ये जाण्यासाठी पूल, रस्ते नसल्याने तेथील आदिवासी नावे चा वापर करत पण या पुरामुळे त्यांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला होता किंबहुना आता सुद्धा अनेक गावांमध्ये जाणे शक्य होत नाही.

शाळा, शासकीय कार्यालये हे या काळात बंद होते. शिक्षकांनी शासनाच्या भीती पोटी स्वतंत्रता दिनाच्या दिवशी शाळा खोलून झेंडावंदन करून शाळा बंद करून दिल्या तर त्या अजून पर्यन्त सुरूच झाल्या नाही.

तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी जे पोळ्याला आपल्या घरी आले होते ते अजून शाळेत गेलेच नाहीत.भामरागड तालुक्यातील जवळपास सर्वच आदिवासींचे घरे हे मातीचे आहेत या मुसळधार पावसाने अनेकांचे घरे जमीन दोस्त झालीत तर काहींच्या घराच्या मातीच्या भिंतीतील माती या पुराने पोखरून घेऊन गेली.

घरात असलेले कडधान्य, कपडे व इतर सगळं सामान वाहून गेल आता सुद्धा सगळ्या घरात ओलावा आहे ते राहण्याजोगी राहिलेले नाहीत.स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक घरांमध्ये वीज पोहचलेली नाही तरी परंतू ज्या गावांमध्ये वीज पोहचली आहे तिथे मात्र या पावसामुळे एक महिन्याहून अधिक दिवसांपासून ती खंडित झालेली आहे.पुरामुळे गरोदर महिलांचे खूप हाल झालेले आहेत,त्यातील एक घटना म्हणजे,लक्ष्मी नावाच्या एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना व्हयला लागल्या होत्या.

घरी प्रसूती करणे अवघड होते. दवाखान्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून तिला खाटेवर झोपवून नदीच्या काठापर्यंत आणण्यात आलं. पुलावरून मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होत नदी ओलांडून दवाखान्यात जाणे अशक्य झाले होते. अशा परिस्थिती काही उपाय नव्हता लक्ष्मीची वाटेतच प्रसूती झाली आणि तिला तिचा बाळ गमवावा लागला.

एकाच महिन्यात भामरागड येथे ७ वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली विचार करा किती मोठ्या संकटाला लोकांना सामोरे जावे लागले असेल.

परंतू ही पूरपरिस्थिती याच वर्षी आली असे नाही हा पूर अनेक दशकांपासून येत आहे दरवर्षी या पुराने अनेकांचे जनजीवन विस्कळीत होते,पण यंदाचा पूर जरा मोठा होता.दरवर्षी बहुतांश शेकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यावर हे कळले की त्यांच्या शेतीचे गेले २०-३० वर्षांपासून नुकसान होत आहे पण अद्याप एकदाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

भामरागड तालुक्याच्या ठिकाणाहून वाहणाऱ्या पार्लकोटा नदीवरच्या पुलाची उंची खूपच कमी आहे खूप वर्षांपासून या पुलाच्या उंची वाढविण्यासाठी अर्ज केले जातात परंतु आज पर्यंत कुठलीच हालचाल झालेली नाही.

जर या पुलाची उंची वाढली तर भामरागडचा किमान जगाशी संपर्क तुटणार तरी नाही.उंची वाढविण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी प्रस्ताव घेऊन गेल्यावर सरकारचे उत्तर एकच असते की नक्षलवाद्यांमुळे हे शक्य होऊ शकत नाही, पण दुसरीकडे हेच सरकार नक्षलवाद्यांचा विरोध असलेले आणि आदिवासींच्या जीवनाला धोका असलेले उत्खननाचे प्रकल्प पोलीस बंदोबस्तात सुरू करतात.

तर समस्त जनतेचा हाच सवाल आहे की ज्या पद्धतीने उद्योगपत्यांचे पोट भरणारे प्रकल्प पोलीस बंदोसबस्तात सुरू ठेऊ शकता तर तशाच बंदोबस्तात रस्ते, पुलाचे बांधकाम का करू शकत नाही..?

अशा खूप अडचणी आहेत ज्या बद्दल कुणी ऐकायला तयार नाही.

या पूरपरिस्थितीची जिल्ह्यातील एकही आमदार किंवा खासदारांनी साधी पाहणी सुद्धा केलेली नाही. किंबहुना त्यांनी या पुराचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणण्याचा पर्यन्त सुद्धा केलेला नाही.

ज्या प्रकारे कोल्हापूर-सांगली साठी महाराष्ट्र एकवटला होता तसा गडचिरोलीसाठी एकवटेल का हा साधा प्रश्न गडचिरोलीतील जनतेचा आहे.कुठल्याही प्रकारची शासकीय मदत पुरग्रस्तांपर्यन्त पोहचलेली नव्हती आता सुद्धा पाहिजे त्या प्रकारची मदत पोहचलेली नाही.अश्या वेळी गडचिरोली भागातील व सध्या पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘Helping Hands for Gadchiroli flood Victims’ ही मोहीम राभवून लोकांकडून पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी आवाहन केले.

पुण्यातून व इतर जिल्यातून मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली, काही आर्थिक मदत सुद्धा होती त्या सर्व पैश्यांचे जीवनावश्यक वस्तू खरेदी करून थेट गडचिरोलीला ती मदत घेऊन जाण्यात आली.

पहिली मदत ही चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली या गावात देण्यात आली. ३-४ किलोमीटर जंगलातून रस्ता काढत,२-३ नाले ओलांडून त्या गावापर्यंत पोहचवा लागतं. ५० लोकांची वस्ती असलेलं ते आदिवासी गाव आहे. अचानक पुर आल्याने लोकांना घरातील एकही वस्तू वाचवणे शक्य झाले नाही. त्या गावात एकच घर १३ फूट उंचीच होत त्या घराच्या छतावर संपूर्ण गावाने रात्र काढली होती. त्यांना अन्नधान्य, कपडे, टॉर्च व इतर जीवनावश्यक गोष्टी देऊन मदत करण्यात आली.

नंतरचा पल्ला होता भामरागड. भामरागड तालुक्यात कोठी येथील पोलीस मदत केंद्र हे पूर्ण एक दिवस पाण्याखाली होतं. संपूर्ण संवेदनशील दस्तऐवज, कॉम्पुटर व इतर त्यांच्या सगळ्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पोलिसांसाठी असलेले अन्नधान्यसुद्धा वाहून गेले. अशा परिस्थिती तेथील पोलीस स्टेशनला अन्नधान्य व इतर देऊन मदत करण्यात आली.

कियर, कारमपल्ली या गावांना सुद्धा पुराचा फटका बसला होता, तेथील पुरग्रस्तांना सुद्धा जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली. त्या गावापर्यंत पोहचणे हाच एक मोठा संघर्ष होता.जंगलातून वाटा काढत समानाने भरलेला टेम्पो न्यावा लागला. रस्त्यावर पुरामुळे गाळ साचलेलं होत, गाड्या माधातच त्या चिखलात फसायच्या असा तो प्रवास होता.

या गावांमध्ये मदत पोहचवून येत पर्यन्त पार्लकोटा नदिवरचे पाणी ओसरले होते. सर्व सामान घेऊन भामरागड गावात जाऊन तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या सोबत जाऊन तिथे नुकसान झालेल्या घरांना ताडपत्री व पुराचा फटका बसलेल्या सर्वांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

आमदार,खासदार जरी त्या भागात पोहचले नसतील तरी प्रशासनातील  जिल्हाधिकारी,तहसीलदार, नायब तहसीलदार ही सर्व मंडळी खूप प्रामाणिकपणे आणि जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.ऍड.लालसू नोगोटी व इतर काही मंडळींच्या माध्यमातून सुद्धा अनेक गावांमध्ये मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे.इतर स्वयंसेवी संस्था सुद्धा आता मदतीसाठी धावून आलेल्या आहेत.या सर्व मदतीचा भामरागड येथील आदिवासींना आपलं जीवन नव्याने उभारण्यासाठी मदत होईल.

पण ही भीषण पूरपरिस्थिती दरवर्षी न उद्भवावी या साठी शासन प्रशासनाकडून ज्या चुका होत असतील त्याच्या विरोधात ठोस कायदेशीर पाऊल उचलणे गरजेचे वाटते.

आज पर्यंत या भागात गेलेली मदत ही अपुरी आहे अजून मदतीची मोठी गरज आहे. सर्वांना हीच अपील राहील की आपल्या परीने मदतीचा हात आपण या पुरग्रस्तांसाठी पूढे करावा.

प्रत्येक आदिवासींचा संघर्ष हा त्यांच्या आयुष्यभराचा आहे, त्यांना वर्षातील पूर्ण १२ महिने कुठल्या ना कुठल्या मदतीची आवश्यकता असते. त्यांना नेहमी मदत करत राहा.

त्यांचे प्रश्न एक दोन दिवस मदत देऊन सुटणारा नाहीत तर संविधानाने दिलेल्या मूलभूत गरजांच्या पुर्ततेनेच ते सुटतील या साठी सर्व एकत्र येऊन लढा देतील हीच अपेक्षा.

_बोधी रामटेके

Leave A Reply

Your email address will not be published.