गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच पूर येतो..मात्र सांगली-कोल्हापूर सारखी याची चर्चा होत नाही..

राज्यातील सत्तानाट्य संपलं आणि महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात  सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु संपूर्ण राज्यात पूर येत असतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मात्र महाराष्ट्रातील एका दुर्लक्षित जिल्ह्याला भेट दिली होती. 

तो दुर्लक्षित जिल्हा म्हणजे गडचिरोली..!!

गडचिरोली आणि नक्षलवाद हे समीकरण इतकं घट्ट झालंय कि दुसऱ्या गोष्टींकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या पुराकडे राज्यातील माध्यमे फारसं लक्ष देत नाहीत अस बोललं जातं.. 

गडचिरोली जिल्ह्यातील पुराला आणि गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याला काय कारणं आहेत हे जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे.. 

गडचिरोली जिल्हा आणि त्याचा भूगोल.. 

महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास महाराष्ट्र हा पूर्व आणि पश्चिम दिशेला पसरलेल्या पट्टीसारखा दिसतो. यात मध्य महाराष्ट्रातील बराचसा भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो त्यामुळे इथे पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागात मात्र भरपूर पाऊस पडतो.

Screenshot 2022 07 15 at 5.44.44 PM

महाराष्ट्राच्या नकाशात सगळ्यात पूर्वेला असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा होय. राज्याच्या पूर्वेला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोकणानंतर सगळ्यात जास्त पाऊस पडतो यामुळे या जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येतो आणि अनेक गावांचा महाराष्ट्राशी संपर्क तुटतो..

गडचिरोली जिल्ह्यात पूर येणाऱ्या नद्या..

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने घनदाट जंगल आणि पावसात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्याही भरपूर आहेत. या नद्यांमध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा आणि बंडीया या मोठ्या नद्या आहेत.

तुम्ही नाना पाटेकरांचा डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात जी नदी दाखवण्यात आलीय ती नदी म्हणजे इंद्रावती नदी होय. याच इंद्रावती नदीमुळेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात दरवर्षी पूर येतो.

इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांचा त्रिवेणी संगम..

इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीनही नद्या डोंगरांमधून वाहत येतात आणि भामरागडला या तिन्ही नद्यांचा संगम होतो. मुळात अवाढव्य आकार असलेली इंद्रावती नदीचा आकार किनाऱ्यावरच्या दोन टेकड्यांमुळे नदीच्या पत्राचा आकार निम्मा होतो. नदीचा आकार छोटा होतो आणि तीन नद्यांचे पाणी एकत्र आल्याने संपूर्ण भामरागड गाव पाण्याखाली जाते. 

Screenshot 2022 07 15 at 5.46.02 PM

नैसर्गिक कारणाने येणाऱ्या या पुरामुळे आणि पामुलगौतम नदीवरील ठेंगण्या पुलामुळे भामरागड तालुक्यातील निम्म्या गावांचा महाराष्ट्राशी संपर्क तुटतो..

परंतु त्याआधी आहे बंडीया नदीवरील ठेंगणा पूल..

गडचिरोलीवरून भामरागडला जात असतांना मार्गात बंडीया नदी वाहते. ही नदी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. पावसाळ्यात या नदीतील पाणी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढते. परंतु पावसाच्या पाण्यापेक्षा या नदीवर असलेल्या ठेंगण्या पुलामुळे जास्त समस्या निर्माण होतात. 

पावसात नदीला जेवढा पाणी असतो त्याच्या तुलनेत नदीवरील पुलाची उंची अर्धीच आहे. त्यामुळे पावसात पुलावर पाणी वाहू लागलं कि सगळी वाहतूक खोळंबते आणि आलापल्ली ते भामरागड बंद होतो. 

नुकत्याच आलेल्या पुरात याच पुलावरून ट्रक वाहून गेला होता आणि यात तीन जणांची मृत्यू झाली होती. 

वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नद्यांच्या काठावर प्रमुख शहरं..

जिल्ह्यातील चार सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी या तीन नद्या आहे. वैनगंगा नदी प्राणहिता नदीला जाऊन मिळते आणि प्राणहिता नदी गोदावरीला जाऊन मिळते. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा आणि प्राणहिता तसेच दक्षिण दिशेला वाहणाऱ्या गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे सहा तालुक्याचे ठिकाण आहेत. 

यामध्ये देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा हे शहर आहेत. सोबतच आष्टी हे प्रमुख व्यापारी शहर सुद्धा याच नदीच्या काठावर आहे. या नद्यांच्या पुरामुळे या सातही शहरांना पुराचा फटका बसला होता. वैनगंगा नदीवरील आष्टीचा ठेंगणा पूल प्रत्येक पावसात बुडतो. 

पावसात या नद्या दुथडी भरूनच वाहतातच मात्र गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आलं कि या नदीला पूर येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याच वैनगंगा नदीवरील पुलाला भेट देऊन पुराची पाहणी केली होती.

या पुरामुळे वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले तर गोदावरी नदीवरील मेड्डीगट्टा धरणाचे ८५ पैकी ८१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

वैनगंगा आणि प्राणहिता नदीच्या आठ उपनद्यांमुळे बंद होणारा उत्तर-दक्षिण महामार्ग.. 

जिल्ह्यात वैनगंगा आणि प्राणहिता नदीला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आठ उपनद्या आहेत. यात गाढवी, खोब्रागडी, वैलचोना, कठाणी, शिवानी, पोर, दर्शनी आणि दीना या नद्या आहेत. जिल्ह्यातील उत्तर ते दक्षिण महामार्ग याच नद्यांवरून जातो.

पावसात या नद्यांना सुद्धा पूर तर येतोच सोबतच या नद्यांवरील अनेक पूल ठेंगणे असल्यामुळे उत्तर दक्षिण मार्ग बंद होतो. 

पुर आला मग नुकसान किती..?? 

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भामरागड वगळता कोणतेही ठिकाण थेट नदीला खेटून वसवलेलं नाही. जवळपास सगळेच ठिकाण उंच भागावर आहेत. त्यामुळे अतिवृष्टी वगळता कोणत्याही शहरात पुराचे पाणी शिरत नाही. मात्र १२ जुलैला अतिवृष्टी झाल्यामुळे गडचिरोलीसह अनेक शहरात पाणी शिरलं होतं.

नागरीकरणामुळे नागेपल्ली-आलापल्ली शहराची वाढ होत आहे. शहरातील घरं हत्ती ओढ्याच्या भागात बांधली जात आहेत. त्यामुळे या पुराचा आलापल्ली-नागेपल्ली शहराला काही प्रमाणात फटका बसला आहे. यात काही घरांचे नुकसान झाले आहे.

शहराचे फारसे नुकसान होत नसले तरी पुरामुळे अनेक यहिकांनी रस्ते उखडून जातात. अनेकदा डांबरी रस्ते वाहून जातात. त्यामुळे पूर ओसरल्यावरही वाहतूक सुरळीत होत नाही. 

भाताच्या शेतीचे तुरळक नुकसान..

भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. त्यासोबतच तूर कापूस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. सध्या केवळ भाताचे पऱ्हे भरण्यात आले होते. परंतु भाताची लागवड व्हायची होती. त्यामुळे काही ठिकाणी भाताचे पऱ्हे, कापूस आणि सोयाबीनचे थोडे नुकसान झाले आहे. 

काही ठिकाणी घरांची पडझड झाली, काही तलावांच्या पाळी फुटल्या मात्र यामुळे जीवितहानी झाली नाही. नद्यांना आलेल्या पुरामध्ये सहा ते सात नागरिक वाहून गेले आणि त्यांची मृत्यू झाली. 

दरवर्षी येणाऱ्या पुराचे नियोजन..

जिह्यात दरवर्षी पूर येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत नियोजन करण्यात येते. भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील संपर्क तुटणाऱ्या सर्व गावातील यंत्रणा सतर्क केली जाते. 

पुरात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी  NDRF आणि SRPF च्या तुकड्या बोलावून तात्काळ मदत करण्यात येते.   

या गावांसाठी लागणारा तीन महिन्यांचा अन्नधान्याचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पावसाळा सुरु होताच करून ठेवला जातो. मात्र पुरामुळे आष्टी, जुनगाव, चामोर्शी आणि गडचिरोली मार्गाने होणार वाणसामानाच्या गाड्या थांबतात आणि वाहतूक खोळंबते. 

अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मिळत असल्या तरी गरोदर माता, लहान बालके, गंभीर आजार आणि अपघातग्रस्त रुग्णांना तातडीच्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत.. 

गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे आणि नद्यांवरील ठेंगण्या पुलांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा भात, कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचे नुकसान होते. 

जिल्ह्यातील ठेंगण्या पुलांऐवजी नवीन उंच पुलं आणि मजबूत रस्त्यांची बांधणी करणे आणि भामरागड आणि पुरात बुडणाऱ्या अन्य गावांचे उंच जागेवर पुनर्वसन केल्याने यावर तोडगा निघू शकेल.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.