गाडगे बाबांनी हट्ट करून मुख्यमंत्र्याना देहूला येण्यास भाग पाडलं यालाही एक कारण होतं..
पंढरपूरात मराठा धर्मशाळेचं बांधकाम सुरु होतं. तिथं आपल्या मामाच्या घरी सुट्टीला आलेला एक तरुण सहज बांधकाम बघायला आला. तिथं त्याला दिसलं की काही लोकं एका चिंध्या पांघरलेल्या बाबाला नमस्कार करत आहेत. रागारागाने तो त्यांना म्हणाला,
“का हो बुवा हि कसली ढोंग बाजी चालू आहे ?”
तर बुवांनी लगेच त्याची माफी मागितली आणि चूक सुधारून घेऊ असं म्हणाले. त्या तरुणाला म्हाताऱ्या साधूची बरी जिरवली असा आनंद झाला. तो तिथून निघून गेला.
पुढे अनेक वर्षांनी तो तरुण शिकून मोठा झाला. सॉलिसिटर बनला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. काँग्रेसचा नामवंत पुढारी म्हणून त्याला सगळीकडे ओळखलं जाऊ लागलं.
एकदा तो मुंबईत आपल्या फोर्टमधल्या ऑफिसमध्ये काही तरी काम करत होते. पंढरपूरच्या त्या धर्मशाळेची काही माणसे एकदा त्यांच्याकडे आली. त्यात ते बाबा सुद्धा होते. धर्मशाळा बांधून झाली आता ती पंचकमिटी कडे सोपवायचा करार करण्यासाठी ही मंडळी आली होती.
सॉलिसिटरने झटक्यात त्या बाबांना ओळखले. एकेकाळी आपण यांची उणीदुणी काढली याचा त्याला पश्चाताप झाला. बाबांचे पाय धरले, त्यांना आपल्या बंगल्यावर नेलं. तिथंच सगळी कागदपत्रे तयार करून त्यांना सुपूर्द केली. तेव्हापासून त्या बाबांच्या ठायी त्यांची श्रद्धा बसली ती कायमची.
ते बाबा होते थोर आधुनिक संत व समाजसुधारक गाडगे बाबा आणि तो तरुण म्हणजे पहिले मराठी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर.
अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे व एक काठी अशा वेशात बाबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ असे त्यांचे मानववादी व समाजवादी तत्त्वज्ञान होतं. देवळाच्या बाहेर राहून आपल्या पाया पडून न घेता ते भक्तांची सेवा करण्यात धन्यता मानीत. स्वच्छता, प्रामाणिकपणा, भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे.
मंदिराबाहेर ते झाडलोट करीत असत व भक्तांनी दिलेले चांगले अन्न गोरगरिबांना वाटून टाकीत. स्वतः मात्र चटणी-भाकरी मागून आणून खात असत.
पाखंडीपणा, जातीभेद, अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी त्यांचे अनेक प्रयत्न असत. त्यांबाबत आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन ते उपदेश करीत. शिवाशिव हा रिकामटेकट्या माणसांचा खेळ आहे, असे ते म्हणत. ज्यांनी या समाजात विषमतेचे बीज पेरले ते नष्ट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. समाजात निर्माण झालेली घाण गाडगेबाबांनी साफ करून समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांची त्यांच्यावर अपरंपार श्रद्धा होती. गाडगे बाबांचा एकही शब्द ते कधी पडू द्यायचे नाहीत. रयत शिक्षण संस्थेचं त्यांनी रोखून धरलेलं अनुदान गाडगे बाबांच्या शब्दाखातर पुन्हा सुरु झालं होतं.
एकदा असच गाडगे बाबांनी मुख्यमंत्र्याना निरोप पाठवला मी देहूत आहे आणि भेटायला या. बाळासाहेबांना कळेना काय झालं? गाडगे बाबांनी कधी असं त्यांना सांगितलं नव्हतं. काही तरी महत्वाची गोष्ट असावी असं म्हणत मुख्यमंत्री पुण्याजवळ देहूला आले.
ते पावसाळ्याचे दिवस होते. इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती. मुख्यमंत्री आले म्हणून कलेक्टर, पोलिस वगैरे सगळे आले. बाबांनी त्यांना सगळं दाखवलं. प्यायला नीट पाणी नाही. यायला जायला रस्ता नाही. नदीवर धड पूल नाही.
तुकोबांसारख्या जगद्गुरूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे हे हाल झाले होते. लाखो वारकरी गावात येत असूनही इथला विकास जागच्या जागी ठप्प झाला होता.
पावसाळ्यात पूर आला की गावचा संपर्क तुटायचा. आजारी-पाजारी, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचे हाल व्हायचे. धर्मशाळेतही पाणी यायचं. एवढा मोठा वारकरी संप्रदाय या गावात यायचा, पण शासनाने आजवर कुठेही काहीही सुधारणा केली नव्हती. तुकाराम महाराज ज्या भंडारा डोंगरावर भजन करायचे, त्या डोंगरावरही काहीही नव्हतं. अनेक जण दर्शनाला डोंगरावर जायचे पण वर जायला रस्ता नव्हता, दगड बाजूला करून बसायला जागा देखील नव्हती.
बाळासाहेब खेरांनी हि परिस्थिती पाहिली. बाबांनी त्यांना का बोलावलं याच कारण त्यांना उमजलं. लगेच पूल बांधायचे आदेश दिले.
गाडगे बाबांनी देहूमध्ये धर्मशाळा बांधली. झाडू घेऊन अख्ख गाव स्वच्छ केलं. त्यांचं बघून गावातले तरुण मदतीला आले. प्रशासन देखील सज्ज झालं. या सगळ्यांच्या प्रयत्नाने भंडाऱ्याच्या डोंगराच रूप पालटून टाकलं. आज देहू एक पर्यटन स्थळ बनलं आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे भेट देतात. इंद्रायणी माऊलीच्या घाटावर विसावतात. तुकोबांच्या चरणी लिन होतात याच्या श्रेयाचा वाटा गाडगेबाबांना देखील जातो.
बाबांनी कधी कर्मकांड केला नाही, कधी मंदिर बांधलं नाही पण धर्मशाळा बांधल्या, शाळा उभारल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. देव दगडात नाही तर माणसात आहे हे त्यांनी आयुष्यभर लोकांना समजावलं. स्वतः त्यावर चालत राहिले. आज या महान संतांची पुण्यतिथी.
हे ही वाच भिडू.
- गाडगेबाबांना म्हणावं लागलं होतं, पोटावर मारू नका..
- त्या गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसून गाडगेमहाराजांच किर्तन ऐकत होते.
- समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना जवळ करुन डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन उभारलं
- अमरावतीमध्ये एक असा बाप आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा मतिमंद आहेत