ही होती विधानसभेच्या इलेक्शनमध्ये गाजलेली सर्वात पहिली टॅगलाईन…

आमचं ठरलय. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणात आमच ठरलय ही टॅगलाईन उदयास आली. भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या पक्षांनी दिलेल्या घोषणा, टॅगलाईन वाचल्या की राजकारणाची खरी गंमत कळते.

या ओळी नसत्या तर राजकारण किती बोअर गोष्ट असती अस वाटतं. उदाहरण द्यायचं झालं तर कॉंग्रेसने गरिबी हटाओचा नारा दिलेल्या. त्या पुढे सेनेने फक्त “हाहाहा” हे तीन शब्द लिहून कॉंग्रेसचा बाजार उठवलेला. थांब लक्ष्मी कुंकू लावते शिवसेना मत देवून येते या घोषणेमुळे शिवसेना घराघरात पोहचली हे देखील तितकच सत्य. अशा अनेक घोषणा आहेत. 

पण आजचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात देण्यात आलेली पहिली घोषणा कोणती.

गोष्ट आहे १९५७ सालच्या मुंबई राज्य विधानसभा निवडणुकीची. मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य व्हावे यासाठी आंदोलनाने जोर धरला होतं. संयुक्त महाराष्ट्र समिती चळवळीच्या नेत्यांनी या निवडणुकीत उडी घ्यायचं ठरवलं होतं.

शेतकरी कामगार पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्‌यूल्ड कास्ट फेडरेशन असे अनेक पक्ष काँग्रेस विरुद्ध एकत्र आले होते. याच नेतृत्व करत होते जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. त्यांच्या बरोबरच एसएमजोशी, ना.ग.गोरे, नाना पाटील, सेनापती बापट असे अनेक जाणते नेते रस्त्यावर उतरले होते.

संयुक्त महाराष्ट्र समिती तर्फे आचार्य अत्रेच्या धडाडनाऱ्या तोफेची भाषणे राज्यभर गाजत होती. अत्रे आपल्या स्टाईलने काँग्रेसच्या नेत्यांचा खुमासदार भाषेत समाचार घेत होते. समितीच्या प्रचारात अनेक नेते मोरारजी देसाई, नेहरू अशा नेत्यांवर टीका करताना सभ्यतेची पातळी ओलांडत होते.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीसाठी काँग्रेस बॅकफुटवर आली होती.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसच महाबळेश्वर येथे एक शिबीर भरवण्यात आलं. अनेक जेष्ठ नेते तिथे हजर होते पण प्रचाराची दिशा कशी ठेवायची त्यांना उमगत नव्हते. दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी भाषावार प्रांतरचनेला केलेला विरोध हे आपल्याला जड जाणार हे उघड होते पण पर्याय नव्हता..

नव्या पद्धतीने प्रचार करावा लागणार होता. अत्रेंच्या जहाल टीकेला त्याच भाषेत उत्तर द्यावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. एखादी लावणी अथवा पोवाडा प्रचार गीत म्हणून असावा असे ठरले,

पण ते लिहिणार कोण? 

याच शिबिरामध्ये जेष्ठ कवी ग.दि.माडगुळकरसुद्धा हजर होते. एक कवी सिनेमातील गीतकार असूनही त्यांनी आपली राजकीय बाजू कधी लपवली नव्हती. १९४२ च्या चलेजाव आंदोलनापासून ते राजकारणात सक्रीय होते. काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाणांशी त्यांची खास मैत्री होती. अखेर काँग्रेसचे प्रचारवाक्य तयार करण्याची जबाबदारी कोणी तरी गदीमाना दिली.

शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गदिमांनी तिथेच एका कागदावर दोन ओळी लिहिल्या.

“आता ही पोरगी वाचत नाही तिला डांग्या खोकला झाला ग बाई”

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेवर केलेले हे विडंबन प्रचंड प्रसिद्ध झालं. त्यावरून देखील वाद झाले. निवडणुकीच्या प्रचारात कधी नव्हे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना दिसू लागले. १९५७ ची ती निवडणुक पहिल्यांदाच घोषणायुद्धाने रंगलेली राज्याने पहिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.