गडकरी जे बोलतात ते खरच शक्य आहे की उगी आपल्या बाजारगप्पा असतात…?
मी जे बोलतो ते करतो, पाण्यातून हायड्रोजन वेगळं करून त्यावर विमान, रेल्वे चालवणार.. काल गडकरींनी अहमदनगरच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. सहज फेरफटका मारावा म्हणून कमेंट बॉक्स चाळला तर भयंकर ट्रोलिंग. काय तर म्हणजे गडकरी उगी आपल्या बाजारगप्पा हाणतायत.. अस कुठं असतय वे…
आत्ता झालं की काही दिवसांपूर्वीच पुणे ते बंगलोर बाय रोड साडेतीन तासात जाता येईल अस गडकरी बोललेले. तेव्हा देखील लोकांनी प्रचंड ट्रोल केलं..त्यापुर्वी गडकरींच्या उडणाऱ्या बसवरून ट्रोलिंग झालेलं..
मग आमच्या मनात नायक पिक्चरमधल्या अनिल कपूरसारखा प्रश्न डोक्यात आला..
आप जो बोल रहें हे वो बहेस के लिए, सुनने के लिए अच्छा हैं.. लैकिन प्रॅक्टिकली नहीं हैं..
पण कसय उगी लगेच एखाद्या माणसावर बोट का दाखवा, त्याच्या आधी विषय तर समजून घेवूया.म्हणून डेटा काढायचं ठरवलं..
नितीन गडकरी काय काय बोल्लेत अन् ते प्रॅक्टिकली शक्य आहे का..
- पहिलं वाक्य कालचच, ते अहमदनगरच्या कार्यक्रमात म्हणाले, येत्या काळात पाण्यातून हायड्रोजन वेगळं करुन त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार..
मागे एकदा टोयोटा मिराई कारमधून नितीन गडकरी संसदेत गेले होते. मिराई कार ही हायड्रोजनवर चालणारी कार. आत्ता ही कार मार्केटमध्ये कधी येणार तर आत्ता फक्त या कारची चाचणी चालू आहे. एका स्पेसिफीक गाडीबद्दल बोलायचं झालं तर या गाडीत पाच किलोची हायड्रोजनची टाकी आहे त्यावर ही गाडी साडे सहाशे किलोमीटर चालते. सध्या एक किलो हायड्रोजनचं उत्पादन मुल्य साधारण चारशे रुपयेच्या घरात जातय. त्यामुळं तुमच्याही डोक्यात आलं असेल अरे उगीच इलेक्ट्रिक कारचा बाजार मांडलाय थेट हायड्रोजनवर शिफ्ट होवूया..
तर थांबा, परत इथं प्रश्न येतो तो किंमतीचा. गाडी बाजारपेठेत आलीच तर याची किंमत ६० ते ७० लाखांच्या घरात जाणार आहे. या गाड्यांना इंजिन नसतं मोटार असते. हाय प्रेशरमध्ये हायड्रोजन साठवला जातो आणि ऑक्सिजनसोबत रिएक्ट होवून मोटर पळते. थोडक्यात काय तर टाकी बदलून खेळ होत नाही तर सगळी सिस्टीम बदलाय लागते. बर ही सिस्टीम फक्त गाडीपुरती मर्यादीत आहे का? तर नाही. हायड्रोजन स्टेशन वगैरे खंडीभर इश्यू आहेत.
पण अशक्य नाही हे पण खरय. सरकारी पातळीवर भारतानं फेब्रुवारी महिन्यातच मिशन हायड्रोजन आखलं आहे. या अंतर्गत ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. पाण्यापासून, सेंद्रिय कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करण्याचं मिशन आखण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशक्य अवघड आणि खोटं वगैरे नाही..
2) आत्ता दोन नंबरची मुद्दा, गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न बदलून भारतीय संगीत असणारे वाद्य बसवणार..
गडकरींच्या या वाक्यावर पण भयंकर ट्रोलिंग झालं. आत्ता चौकाचौकात भजन, किर्तन, शास्त्रीय संगीत ऐकत बसायचं काय? असा प्रश्नही विचारला गेला..
गाड्यांच्या स्वतःचा अनुभव सांगताना गडकरी म्हणालेले,
मी नागपूरमध्ये ११ व्या मजल्यावर राहतो. सकाळी प्राणायम करतो. सकाळी १ तास शांततेत प्राणायम करताना वाहनांच्या हॉर्नमुळे शांती भंग होते. यासंदर्भात मी विचार केल्यावर, हॉर्नचा आवाज भारतीय वाद्यांसारखे असावेत असा विचार आला.
पण परत मुद्दा येतो तो हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? तर उत्तर मिळतं.. शक्य आहे पण अजिबात विचार करु नका..
कारण काय तर हॉर्नचा मुळ उद्देशचं यातून निघून जातो.
हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं..
त्यांनी पुण्यातील वकील असीम सरोदे, अजित देशपांडे आणि अक्षय देसाई यांच्या मार्फत नोटिस पाठवण्यात आली होती, यात सांगण्यात आलं होतं की,
ऐकण्याची कमी-अधिक क्षमता असणाऱ्या सर्वांनाच आवाज ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरीमध्ये असतो. त्यामुळे त्याची तीव्रतादेखील विशिष्ट पातळीची असणे अपेक्षित आहे.
सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली संगीतमय असेल, तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उद्देश पूर्ण होणार नाही. आपल्या देशातील रस्त्यावरील वाहनांची संख्या, चालणाऱ्या माणसांची संख्या, रस्ता ओलांडताना आणि वाहतूक कोंडीत होणारा हॉर्नचा वापर या सगळ्याचा विचार करता संगीतमय हॉर्न गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकत असल्याची बाब मांडके यांनी दिर्शनास आणली आहे.
थोडक्यात काय घेतला तबला आणि लावला आवाज अस होवू शकत नाही. एखाद्या सिग्नलवर एखादी रुग्णवाहिका आलेली आहे. सिग्नल लागलेला आणि अशा वेळी हॉर्न वाजवून लोक समोरच्याला अलर्ट करतात. इथे संगीत ऐकू यायला लागलं तर..
प्रॅक्टिकली शक्य आहे पण ते चुकीचं आहे..
3) गडकरींच तिसरं वाक्य म्हणजे, उडणारी बस.
उत्तर प्रदेशच्या निवडणूकीवेळी गडकरी उत्तर प्रदेश दौर्यावर गेले होते. त्यावेळी प्रयागराज येथे भाषण करताना त्यांनी एक नवीनच संकल्पना लोकांसमोर मांडली. प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत लोकांना दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरले होते.
‘आता प्रयागराजमध्ये हवेत उडणारी बस चालवली जाईल. ज्याचा डीपीआर तयार केला जात आहे,
असे नितीन गडकरी म्हणाले.
या योजनेबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही कळवले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दिल्लीहून प्रयागराजला सी प्लेनमध्ये बसून त्रिवेणी संगम येथे उतरू, ही आपली इच्छा आहे एका नव्या युगाच्या विकासाची गोष्ट आहे, असे जाहीर सभेत गडकरी म्हणाले.
जे बोलतो ते आपण करून दाखवतो असेही यावेळी गडकरी म्हणाले..
आत्ता हे कितपत खरं आहे, तर आहे..
अशा उडणार्या बसच्या क्षेत्रात म्हणजेच ऐरिअल ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सध्या एक नवीन टेक्नॉलॉजि नावारूपाला येत आहे ती म्हणजे e-VTOL टेक्नॉलॉजी.
इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग म्हणून ओळखली जाणारी ही वाहनं गडकरी म्हणतात तशी खरोखरंच हवेत उडणारी आहेत. या हवेत उडणाऱ्या वाहनांना विमानासारखी धावपट्टी लागत नाही की ते हेलिकॉप्टरसारखा जोरात आवाज करतात. या e-VTOL वाहनांना इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर म्हटलं तरी चालू शकतंय. मॅकिन्से अँड कंपनी या कंपनीच्या अंदाजनुसार २०३० पर्यंत तुमच्या शहरात अशी शेकडो e-VTOL कॅटॅगरीतली वाहनं तुम्हाला उडताना दिसू शकतील.
आत्ता गडकरी बोलले ती नेमकी हिच टेक्नॉलॉजी का? तर ते आपण ठामपणे सांगू शकत नाही. पण प्रॅक्टिकली ते शक्य आहे फक्त या गोष्टी येण्यास देखील उशीर लागेल..
4) त्यांच चौथ वाक्य म्हणजे पुणे ते बेंगलोर अंतर फक्त साडेतीन तासात,
पुणे येथे वसंतदादा शुगर इन्सिट्युट मध्ये एका कार्यक्रमावेळी बोलताना नितिन गडकरी यांनी आता पुणे ते बेंगलोर फक्त साडेतीन तासात प्रवास करता येणार असा महामार्ग बनवण्याच्या विचारात आहे अस वक्तव्य केलेलं.
हे कितपत शक्य आहे, तर पुणे बंगलोरचं अंतर सध्याच्या हायवेवरून भरत ते 839 किलो मीटर. हे अंतर पार करायला गुगल मॅपनुसार स्टॅण्डर्ड टायमिंग आहे 13 तास 14 मिनीट. आणि सध्याच्या हायवेवर चारचाकी गाडीला टोल जातो तो 1 हजार 75 रुपये. आत्ता नवीन हायवे जरी एक्स्पप्रेस वे सारखा केला, अधून-मधून काढला तरी तो 800 किलोमीटरपेक्षा आत येवू शकणार नाही. 800 भागिले 3.5 केलं तर उत्तर येत 228 म्हणजेच ताशी 228 किलोमीटर वेगाने एकसलग गाडी पळवली तर ते शक्य आहे.
यासाठी आम्ही एक नजर जगातल्या टॉप हायवेवर मारली तर तिथ सुद्धा स्पीड लिमीट 160 किलोमीटरच्या वर जात नाही. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे गाड्यांच्या स्पीडोमीटर वर देखील 180 च्या वरती अंक नसतात. भारीतल्या गाड्यांचा विचार केला तरी हा आकडा 200-240 पर्यन्त जातो.
साहजिक एकसलग वेगाने 228 किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवणं अशक्य आहे. पण नितीन गडकरीजी काय बोललेत तर मी हायवे बांधणार, जायचं का नाय ते तुम्ही ठरवा. त्यामुळे टॉप स्पीड 228 चं असणारा हायवे ते बांधू शकतील. पण गाडी चालवायला दरवेळी मायकल शुमाकरला बोलवलं पाहीजे एवढं नक्की..
5) आत्ता शेवटचं.. चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्याचा फोटो पाठवा 500 रुपये मिळवा..
दिल्लीतल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी हे वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की,
मी लवकरच असा एक कायदा आणणार आहे, की जर एखाद्याने चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केलेली असेल आणि त्याचा जर कोणी फोटो काढून पाठवला तर त्या फोटो पाठवणार्या व्यक्तिला 500 रुपये मिळतील. चुकीच्या पद्धतीने गाडी लावणार्याला 1000 रुपये दंड आकारला जाईल आणि त्यातले 500 रुपये हे फोटो काढून पाठवणार्याला दिले जातील.
मधल्या मध्ये 500 रुपये कमवण्याची सरकारची ही योजना चांगली असली तरी प्रॅक्टिकली ती चूकीची आहे. बरं ही योजना ऐकून तुम्हाला जूनी एक बोधकथा आठवली असेल. नसेल आठवली तर सांगतो.
एका गावात प्लेगची साथ येते. तिथे खूप उंदीर होतात. मग एकदिवस गावात एक पुंगीवाला येतो. गावकरी म्हणतात, तू उंदराचा बंदोबस्त कर तुला पैसे देतो. पुंगीवाला पुंगी वाजवतो. सगळे उंदीर गोळा होवून त्याच्याभोवती फेर धरतात. नाचत नाचत सगळ्या उंदरांना तो आपल्या मागे घेवून जातो आणि उंच कड्यावरून खाली सोडून देतो. गावकरी काम झाल्यावर पैसे द्यायला नकार देतात. मग तो पुंगीवाला परत पुंगी वाजवतो. यावेळी त्याच्या मागे गावातली लहान मुलं असतात.. तो आपल्या पुंगीच्या आवाजामागे लहान मुलांना घेवून जातो. आत्ता या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात..
तर प्रशासन. प्रत्येक गोष्ट ही ज्याची त्याने करावे. लोकांच्या हातात अधिकार दिले तर व्यक्तिगत आकस बाहेर काढले जातील. त्यात आपल्याकडचे कार्यकर्ते काय लेवलचे आहेत ते वेगळं सांगायला नको. अगदी तुमची गाडी आत्ताही नो पार्किंगमध्ये असली तर पोलीसांसोबत जे खाजगी गाडी टो करणारे कार्यकर्ते असतात ते किती गरम असतात हे वेगळं सांगायला नको.
बर या झालेल्या चर्चेच्या गोष्टी. प्रशासन, कायद्याचं शासन, सरकारची जबाबदारी या मुलभूत चौकटीलाच हरताळ फासण्याचा हा निर्णय ठरू शकतो. कारण उत्तरादायित्व ही मतदान करताना आपली जबाबदारी असते तसे नियमांची अंमलबजावणी करणं हे सरकारची जबाबदारी असते. हा प्रकार जबाबदारी झटकण्याचा ठरू शकतो त्यामुळे प्रॅक्टिकली वर्कआऊट होणारा निर्णय नाही इतकच..
तर हे होते नितीन गडकरींचे पाच वाक्ये आणि त्याच्या प्रॅक्टिकली गोष्टी, गडकरींच्या काही गोष्टी खऱ्या आहेत ज्या वर्कआऊट होवू शकतात. जसं हायड्रोजन कार-बसेस, उडणाऱ्या बसेस पण काही गोष्टी शंभर टक्के चुकीच्या आहेत जस की संगीतमय हॉर्न, हायवे आणि ५०० रुपये नो पार्किंगचे कळवणाऱ्या बक्षीस..