आता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत !

मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. पण नेमकं कोण पंतप्रधान व्हावं हे मात्र ठरत नाही. या गोष्टीवर एकमत होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत आपलं कधीच एकमत होऊ शकलं नाही. पक्ष वेगळा असला तरी मराठी माणूस म्हणून एकमत झालंय असं होत नाही.

यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतीत सगळ्यात जास्त लोक एकदिलाने त्यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा बाळगून होते. पण त्यांच्याकाळातही महाराष्ट्रातले नेते त्यांच्याविरोधात होते. त्यांच्याच पक्षातले. कुणी उघड तर कुणी छुपे. महाराष्ट्राला दिल्लीत राज्य करायची संधी खुपदा आली. अगदी पेशव्यांच्या काळात आली. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. मुघलांना तख्तावर बसवून आपण महाराष्ट्रातून कारभार केला.

त्यानंतर ठळक घटना म्हणजे देशातल्या स्वातंत्र्य चळवळीचं आणि एकूणच कॉंग्रेसचं नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होतं. कारभार पुण्यात होता. पण टिळकांच्या मृत्यूनंतर आपण अंत्ययात्रेत कसा पाउस पडला आणि साक्षात आभाळाला रडू आले वगैरे घटना रंगवून सांगत राहिलो. टिळकांच्या तोडीचे नेतृत्व नव्हते. महात्मा गांधींनी अलगद कॉंग्रेस ताब्यात घेतली. नेहरू आणि पटेल पुढे आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात ती ताकद होती. त्यांचं दिल्लीत महत्वही होतं. पंतप्रधान होण्या एवढ्या जागा ते जिंकतील हा मुद्दा नव्हता. पण त्यांना महाराष्ट्रात निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. देशपातळीवर झेप घ्यायच्या प्रयत्नात पंख कापण्याचा प्रकार होता तो. हा नतद्रष्टपणा करणारं राज्य एकमेव असावं.

पुढे यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द. आजवर उपपंतप्रधानपद मिळवणारे ते एकमेव. पण घटनात्मकदृष्ट्या त्या पदाला फार महत्व नसते. यशवंतराव यांच्यानंतर शरद पवार यांचं दिल्लीत चांगलं वजन निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे काही दिलदार राजकारणी पवार पंतप्रधान होणार असतील तर स्वागत करायला, पाठिंबा द्यायला तयार होते. पण पवारांना ते जमलं नाही. त्यांचे निर्णय चुकत गेले. मुख्य म्हणजे आपलीच माणसं विरोधात होती.

नंतर बाळासाहेब ठाकरे हे नाव देशभर पोचलं. कुणी म्हणेल बाळासाहेबांचा काय संबंध? ते राज्यातल्या प्रादेशिक पक्षाचे  नेते होते. पण चंद्राबाबू नायडू, ममता यांची नावं चर्चेत असू शकतात तर बाळसाहेब का नाही? दिल्लीने बाळासाहेबांची प्रतिमा कशी खालावेल यासाठीच प्रयत्न केले. दुर्दैवाने शिवसेनेने दिल्लीत पाठवलेल्या एकाही खासदाराने बाळासाहेबांची प्रतिमा उंचवावी म्हणून प्रयत्न केले नाही. दिल्लीत काय महाराष्ट्रात काय त्यांच्या प्रतिमेसाठी कुणी काम करताना दिसलं नाही. शरद पवार यांनी कलमाडी. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे कितीतरी लोक मोठे केले.

पण त्याबदल्यात पवारांना दिल्लीत काय फायदा झाला? बाळासाहेबांनी प्रीतीश नंदी, धूत यांच्यासारख्या लोकांना दिल्लीत पाठवलं. फायदा काय? नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र भाजपामध्ये अनेकांना उभं केलं. पण त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हावं किंवा दिल्लीत त्यांच्याकडे नेतृत्व यावं यासाठी कुणी आवाज उठवला?

खूप वर्षांनी नितीन गडकरी यांच्या रूपाने मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष एक मराठी माणूस झाला होता. तेंव्हाच गडकरी पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले होते. गडकरी व्यासपीठावर बसलेले आहेत आणी नरेंद्र मोदी खुर्चीमागे उभे राहून त्यांच्या कानात बोलताहेत असं चित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय.

Screenshot 2019 04 11 at 7.25.51 PM

पण हे चित्र बदललं.

नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुढे ते आरोप हवेत विरले. पण त्याचा मुख्य उद्देश सफल झाला. गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाहीत. आणी तिथूनच ते पंतप्रधानपदाच्या रेसमधून मागे पडले. हे कारस्थान होतं. महराष्ट्राचं किंवा गडकरी यांचं दुर्दैव नव्हतं. महराष्ट्राचं दुर्दैव एकमेव होतं. प्रमोद महाजन यांच्या रुपात सगळ्यात सक्षम पंतप्रधान पदाचा उमेदवार होता भाजपमध्ये. आज प्रमोद महाजन नक्की पंतप्रधान असले असते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. महाजन आपल्यात नाहीत.

पण गडकरी यांच्यात तेवढी गुणवत्ता आहे. मोदी सरकारमध्ये सर्वोत्तम मंत्री कोण असं विचारलं तर बहुमताने लोक गडकरी यांचं नाव घेतील. विरोधक सरकारचे शेकडो दोष काढतील पण रस्त्याच्या बाबतीत गडकरींची पाठ थोपटतात. गडकरी यांचं काम ओरडून सांगायची गरज पडत नाही. प्रवास करणाऱ्या माणसाला गडकरींचं काम दिसतं. रस्ते, बंदर, पूल, भुयारी रस्ता अशा सगळ्या क्षेत्रात गडकरी यांची कामगिरी उजवी आहे. संपूर्ण मोदी सरकारमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य असलेले मंत्री म्हणजे गडकरी. फक्त एकच केंद्रीय मंत्री आपल्या मनात आहे ते बोलू शकतो असं वाटतं आणि ते म्हणजे नितीन गडकरी. त्यामुळे स्वाभिमान गहाण न ठेवता दिल्लीत राहणारा हा माणूस जास्त आवडतो.

बाकी मंत्री एकतर शांत बसतात किंवा मोदी जे ट्वीट करतील ते रीट्वीट करतात. किंवा काही उगाच गाय किंवा शबरीमला सारख्या विषयावर आक्रस्ताळेपणा करून अमित शहांच मन जिंकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे गेल्या पाच वर्षात नितीन गडकरी सगळ्यात उजवे ठरले आहेत. 

प्रमोद महाजन यांच्यानंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणखी एक नाव होतं. शेजारच्या गोव्यातले मनोहर पर्रीकर. पण नियतीने त्यांनाही आपल्यातून हिरावून नेलं. सुषमा स्वराज स्पर्धेत नाहीत. सातत्याने मोदींच्याविषयी किंवा मोदींच्या पोस्ट forward करणाऱ्या सुषमा स्वराज बघितल्या की अस्वस्थ व्हायला होतं. एकेकाळी भाजपच्या आक्रमक वक्त्या आणी नेत्या म्हणून त्या प्रसिध्द होत्या. राजनाथसिंह यांनी स्पर्धेत भागच घेतला नाही. अडवाणी यांच्यासोबत मुरली मनोहर जोशी अडगळीत गेले. शौरी, जसवंतसिंह, यशवंतसिन्हा थेट बाहेर गेले. अख्खा पक्ष मोदी आणि शहा यांच्या ताब्यात आला.

लोकशाही राष्ट्रात कॉंग्रेससारख्या घराणेशाहीच्या विळख्यात असलेल्या पक्षाने आधीच या देशात नवीन नेतृत्व आलं नाही. नुकसान झालं. त्यात दुसर्या महत्वाच्या पक्षात पण एकाधिकारशाही असेल तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. गडकरी यांच्यासाठीच नाही तर या देशाच्या सुदृढ लोकशाहीसाठी पर्यायावर विचार व्हायला हवा. मराठी माणूस म्हणून गडकरी पंतप्रधान व्हावेत ही इच्छा आहेच. पण एक अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून सुद्धा आजघडीला गडकरी जास्त चांगला पर्याय आहे असं वाटतं.

नोटबंदीसारख्या धक्कादायक निर्णयानंतर गडकरी यांच्यासारख्या संयमी आणि अर्थखात्याचा अभ्यास असणाऱ्या नेत्याची गरज जाणवते आहे. प्रचाराच्या भडिमाराला बळी पडून आपण आपल्या नेत्याचं नावसुद्धा पुढ करायचं नाही किंवा आपल्या नेत्याचं नाव स्पर्धेत घ्यायला लाजायचं हे दुर्दैवी आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं वाटत असेल तर आधी आपण आपल्या माणसाच्या बाजूने राहण्याची सवय करून घेतली पाहिजे. बरं आपण चंद्रकांत पाटील पंतप्रधान व्हावेत अशी मागणी करत नाही आहोत. आपण गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी मागणी करतोय. जी शंभर टक्के योग्य आहे.

अभ्यास, कार्य, वक्तृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, विकासाभिमुख राजकारण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी. फक्त मनाचा कोतेपणा दूर ठेवून विचार केला पाहिजे. प्रचारतंत्राला बळी न पडता विचार केला पाहिजे. मुख्य म्हणजे मराठी माणसाने आता देशाचं नेतृत्व करायचा विचार केला पाहिजे.  

हे ही वाच भिडू. 

                       

3 Comments
  1. Dnyaneshwar Bhongle says

    Good view for future of Maharashtra

  2. Vijay Gokhale says

    Utter non sense. Backing someone because he is Marathi etc.is height of stupidity. PM candidate requires very high integrity and credibility. A big industrial empire built by a person whose personal financial means are not known makes personal credentials doubtful. Arrogant man cannot become PM. Being a PM is not only admonishing bureaucrats and officials for no valud reasons or constructing roads or giving party tickets on extraneous (??) considerations.

  3. Amol Moon says

    Nitin Gadakai is only the person who must become the Prime Ministers of India. Bcoz he has experience, talent, eligibility and capability.

Leave A Reply

Your email address will not be published.