गडकरींनी श्रीनिवास पाटलांना ऑफर दिलेली, “भाजपकडून लढा, हमखास निवडून याल”

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जायंट किलर. गेल्या वर्षी त्यांनी उदयनराजे भोसलेंच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पाडलं. यापूर्वी देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा कराडमध्ये पराभव केला होता. श्रीनिवास पाटलांनी आजवर कधी पराभव पाहिलाच नाही. आपली खुमासदार भाषणं आणि अभ्यासपूर्ण कारभार यामुळे ते ओळखले जातात. सिक्कीमच्या राज्यपालपदाची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

राजकारणात येण्यापूर्वी ते महाराष्ट्रात सनदी अधिकारी होते. कलेक्टर पदावर राहून गेलेला हा माणूस राजकारणात आला तो शरद पवार यांच्या आग्रहामुळे.

पवारांची आणि त्यांची मैत्री अगदी कॉलजच्या काळापासूनची. दोघेही विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनातून एकत्र आले. ग्रामीण भागाचे बॅकग्राउंड हा समान धागा होता. यशवंतराव चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे शरद पवार युवक काँग्रेसमध्ये मोठ्या पदापर्यंत गेले. इकडे श्रीनिवास पाटलांना देखील राजकारणात थांबायचं होतं पण बाळासाहेब देसाईंच्या सारख्या मोठ्या नेत्याने सल्ला दिला की ग्रामीण भागातील तरुण प्रशासनात नाहीत तुम्ही अधिकारी व्हा.

शरद पवारांनी तेव्हा श्रीनिवास पाटलांकडे वचन घेतलेलं की,

” जेव्हा मी सांगेन तेव्हा नोकरीचा राजीनामा देऊन परत राजकारणात यायचं.”

अशी वेळ आली नव्वदच्या दशकात. तेव्हा युतीच शासन होतं

शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद जाऊन शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी श्रीनिवास पाटील  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणचा अध्यक्ष होते. राज्यात सत्ताबदल झाल्या-झाल्यात्यांची बदली नागपूर महसूल विभागाचा अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली. तेथे जेमतेम सहा महिने होत असतानाच पुन्हा त्याठिकाणाहून बदली होऊन अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, नाशिक येथे नेमणूक झाली. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यात बदलीचे आदेश आले आणि नागपूर येथील नागपूर सुधार प्रन्यास संस्थेच्या अध्यक्षपदी बदली झाली.

वर्षभरातील ही तिसरी बदली होती. मात्र कधीही कुठलीही बदली तात्काळ स्वीकारायची, हे धोरण आयुष्यात स्वीकारले असल्याने श्रीनिवास पाटील तेथेही आठवडाभरात सेवेत रुजू झाले. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री होते नितीन गडकरी.

पदावर रुजू झाल्यानंतर एक-दोन दिवसात श्रीनिवास पाटलांनी नितीन गडकरी यांची भेटीसाठी वेळ मागितली. त्यांनी लगेच चहा घेण्यासाठी पाटलांना आपल्या घरी बोलवले. त्या भेटीदरम्यान अगदी मनमोकळेपणाने ते म्हणाले,

विदर्भामध्ये बदली झाली म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा बाजूला टाकण्यासाठी बदली करण्यात येते असे सर्वसामान्यपणे अधिकाऱ्यांमध्ये मत असते. परंतू तुम्ही असे मानू नये. नागपूर सुधार प्रन्यास स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूरचे नियोजन व विकास करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. ती संस्था सध्या आर्थिक अडचणीत असून डबघाईला आलेली आहे. ही संस्था वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याचा शोध मला होता आणि म्हणून मुद्दामहून मी सूचना देऊन तुम्हाला येथे मागवून घेतले आहे.

 तुम्ही प्रयत्न करून ही संस्था वाचवली पाहिजे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य व सहकार्य राहिल. तुम्ही पिंपरी-चिंचवड प्राधिकरणामध्ये केलेले काम मी पाहिलेले आहे. त्याच पद्धतीने आपण काम करावे अशी माझी इच्छा आहे.

नितीन गडकरी यांनी प्रांजळपणे बोलून त्यांच्या कामाप्रती असणारा विश्वास व्यक्त केला. पुढे तीन वर्षे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे श्रीनिवास पाटलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत त्यांचे सहकार्य दिले. तर काही काळ नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्षपदासोबतच नागपूर महानगरपालिका आयुक्त पदाचा चार्ज देखील पाटलांकडे सुपूर्द केला होता.

श्रीनिवास पाटील आणि नितीन गडकरी या जोडगोळीने सन १९९६ ते १९९९ या काळात नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली. रस्ते, उद्याने, विविध नागरी सुविधा नव्याने निर्माण केले आणि त्यानंतरही नागपूर सुधार प्रन्यासची आर्थिक स्थिती खूप सुधारली, संस्था भक्कम झाली.

हे सगळं असताना महाराष्ट्राच व देशाचं राजकीय चित्र झपाट्याने बदलत चाललं होतं. सोनिया गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष पदी निवड झाल्यावर त्यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. पवारांना अपेक्षा होती की काँग्रेस मधील अनेक नेते त्यांच्या सोबत पक्षाबाहेर पडतील पण तस घडलं नाही. काही मोजक्याच नेत्यांनी हे धाडस दाखवलं होतं.

१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका होत्या. एकेकाळी पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांवर मोठं आभाळ कोसळलं होतं, त्यांच्यासाठी  एक एक जागा महत्वाची होती. अशावेळी पवारांना आठवण आली आपल्या जिगरी मित्राची.

श्रीनिवास पाटलांना त्यांनी आपल्या वचनाची आठवण करून दिली आणि  राजीनामा देऊन कराड ची लोकसभा लढवण्याचं आवाहन केलं.

तिथून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण खासदार होते. कराडचा मतदारसंघ म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून चव्हाण कुटूंबीयांचा बालेकिल्ला होता. दाजीकाका चव्हाण, प्रेमळ काकी यांनी आपल्या कर्तृत्वावर हा मतदारसंघ बांधला होता. कराडचे असूनही खुद्द यशवंतरावांनी देखील तिथे त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप केला नव्हता. पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा, गांधी घराण्याशी थेट असलेला संपर्क यामुळे त्यांना हरवणे सोपे नव्हते.

पण तरीही श्रीनिवास पाटलांनी आपल्या दोस्तीच्या वचनाखातर  नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या प्रशासकीय सेवेची अजून तीन वर्षे बाकी होती तरीही ते स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत आणि तेही राजकारणासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जाण्यासाठी. अनेकांनी श्रीनिवास पाटलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यात नितीन गडकरी देखील होते.

त्यांनी पाटलांना सांगितलं,

कशाला जाता कराडला? नागपुरातून लढा भाजपचे उमेदवार म्हणून. आम्ही तुम्हाला निवडून आणतो.

नितीन गडकरींनी मतांचा हिशोब देखील घालून दाखवला. कराडची सीट राष्ट्रवादीकडून लढवणे खरंच वेडेपणा होता. पण श्रीनिवास पाटलांनी गडकरींना नम्रपणे नकार कळवळा.

श्रीनिवास पाटील सांगतात,

“त्यानंतरही मा.गडकरी साहेबांनी अतिशय मोठ्या मनाने नागपूर येथील महाल परिसरातील आपल्या घरी बोलवून माझा सहपत्नीक सत्कार केला.”

पाटलांनी आव्हान स्वीकारलं आणि कराडला आले. जोरदार प्रचार केला. कोणताही राजकीय वारसा नसताना पृथ्वीराज चव्हाणांच्या सारख्या तगड्या उमेदवाराला त्यांनी पाडलं आणि शरद पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.