काही सिनेमे असे आहेत की जे मी केले याचा मला फार अभिमान आहे, ‘गजर’ हा त्यापैकींच एक
आज आषाढी एकादशी. पांडुरंगाची भक्ती वारक-यांच्या मनात दररोज असते. पण आजच्या दिवशी ते देवाला भेटतात. विठ्ठलाला कडकडून मिठी मारतात. आणि भरल्या मनाने घराकडे परततात. मराठी सिनेसृष्टीत पांडुरंगाच्या भक्तीशी निगडीत अनेक सिनेमे आहेत. या विठ्ठलमय सिनेमाची एक परंपरा मराठी सिनेसृष्टीला आहे.
या परंपरेतला एक आगळावेगळा सिनेमा म्हणजे अजित भैरवकर दिग्दर्शित ‘गजर’.
तरुण पिढीला आणि संपुर्ण महाराष्ट्राला अगदी वेगळ्या दृष्टीकोनातुन वारी दाखवण्याचं श्रेय अजित भैरवकर दिग्दर्शित ‘गजर’ सिनेमाला द्यावं लागेल. वारीच्या अठरा दिवसांसोबत ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांची एक अनोखी ओळख ‘गजर’ ने प्रेक्षकांना करुन दिली. या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकरने प्रमुख भूमिका साकारली होती.
या सिनेमाच्या संपुर्ण प्रवासाबद्दल चिन्मयचा अनुभव त्याच्याच शब्दात…
मराठीतले काही मोजके सिनेमे आहेत जे प्रत्यक्ष वारी सोहळ्यात शुट झाले आहेत. ‘गजर’ हा त्यापैकी एक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मला वारकरी संप्रदाय, वैष्णव धर्म या गोष्टींचा फार जवळुन परिचय घेता आला. सिनेमानंतर अजुनही या गोष्टींशी नातं तसंच कायम आहे.
वारीत ‘गजर’च्या शुटींगला सुरुवात होण्याआधी दीड महिने आम्ही रिहर्सल करत होतो. म्हणजे समजा कोणी एखादं वाक्य विसरला, तर काय करता येईल याचा खुप विचार व्हायचा. कारण वारीत शुट करताना रिटेक्स आम्ही शक्यतो टाळणार होतो. एरवी आपण फार प्रोटेक्टिव्ह वातावरणात शुटींग करतो. कोण काही सेटवर बोलत तर सीन करताना लक्ष विचलित होतं. पण वारीत वारक-यांसोबत जेव्हा आम्ही शूट करत होतो, तेव्हा असं काहीच जाणवलं नाही. कारण ते त्यांचं आयुष्य जगायला तिथे आले होते. आणि आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन शूट करत होतो. कधीकधी सीनसाठी कपडे बदलायच्या वेळेस आम्ही रस्त्याच्या कडेला उभं राहून कपडे बदलायचो.
सिनेमाच्या शूटींगचा संपुर्ण प्रवास सुद्धा वेगळा होता. इतक्या वारक-यांमध्ये शूट करणं एक आव्हानात्मक गोष्ट होती. सिनेमात एक सीन आहे , की जिथे पार्थला मुंबईहून फोन येतो आणि त्याला वारी अर्ध्यावर सोडून परत जायचं असतं. तर मला वारकरी ज्या दिशेने चालतात त्या दिशेने विरुद्ध चालत जायचं होतं. वारकरी वारीत शिस्तबद्ध रांगेत चालत असतात. त्यामुळे त्यांच्यामधुन मी मागे परतत असताना ते चिडायचे. आमचा डीओपी अमोलची फारच तारेवरची कसरत व्हायची. कारण आम्ही शूट करतोय हे कळू द्यायचं नव्हतं. त्यामुळे या सीनसाठी वारक-यांची आमच्याविषयी होणारी चिडचीड सहन केलीय.
खुपदा सिनेमांमधुन किंवा अन्य माध्यमातुन शेतक-याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झाली असते. ‘गजर’च्या निमित्ताने वारीत चालताना महाराष्ट्रातला जनसामान्य माणुस आणि शेतकरी खरा कसा असतो, हे जाणुन घेता आलं. या वारक-यांची एनर्जी थक्क करणारी असते. दिवेघाटातली अवघड वाट पार पडणं असो, धावा असो.. अशा प्रत्येक ठिकाणी वारक-यांमध्ये असलेल्या एनर्जीचा अनुभव घ्यायला मिळाला.
वारीत असताना खुप वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना भेटता आलं. एका सीनदरम्यान माझ्या पाठीला झटका बसुन जखम झाली होती. त्यावेळी डाॅक्टरांची एक दिंडी होती. दिंडीतल्या एका डाॅक्टरने मला रस्त्याच्या कडेला झोपवुन तिथेच माझ्यावर उपचार केले.
२०१० साली जेव्हा ‘गजर’च्या शूटींगच्या निमित्ताने आम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला होतो. तिथे त्यावेळेस १३ लाख माणसं होती. एका सीनच्या निमित्ताने माऊलींची पालखी मी स्वतः खांद्यावर घेतली. त्या क्षणी मी अक्षरशः विसरलो होतो की मी तिथे शूटींग करायला आलोय, इतका तो अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता.
‘गजर’ मध्ये एरिक नावाची एक फाॅरेन व्यक्तिरेखा आहे. अमेरिकन कलाकार एडवर्ड याने ती भूमिका साकारलीय. एडवर्डला तुम्ही ‘मणिकर्णिका’ सारख्या हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा पाहिलं असेल. आपण शहरातले असतो त्यामुळे आपल्याला तशी आजुबाजूला माणसं असल्याची सवय असते. त्यामुळे सुरुवातीला वाटलं होतं, एडवर्डला त्रास होईल. पण फार कमी दिवसात तो सहज सर्वांमध्ये सामावून गेला. एक कलाकार आणि माणूस म्हणुन तो फार मस्त आहे.
‘गजर’ हिंदीत ‘मोक्ष’ या नावाने रिलीज झाला होता.
त्यावेळी अनोळखी लोकांचे फोन किंवा मॅसेज यायचे की, ‘हमने मोक्ष देखी, हमको बहुत अच्छी लगी’. मध्यंतरी एका शूटींगनिमित्ताने मी राजस्थान येथे जैसलमेरला गेलो होतो. तेव्हा तिकडच्या स्थानिक गृहस्थांनी ‘मोक्ष’चं कौतुक केलं. वारीविषयी सुद्धा त्यांच्या मनात फार कुतूहल होतं. त्यामुळे अशा काही सिनेमांमुळे आपण आपली संस्कृती महाराष्ट्राबाहेर पोहचवू शकतो.
आपलं जग आपल्यापुरतंच आपण आखलेलं असतं. वारीत जेव्हा वाटचाल करत होतो तेव्हा आपल्या महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या लोकांची नव्याने ओळख झाली. अध्यात्मिक दृष्ट्या ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराजांच्या जीवनाशी, त्यांच्या अभंगांशी पहिल्यांदाच गाठ पडली. पुढे ‘तु माझा सांगाती’ हि मालिका केली. पण ‘गजर’ च्या वेळेस पहिल्यांदा, वारी म्हणजे नेमकं काय असतं ? हे कळालं. माझं माझ्यापुरतंच सीमीत असलेलं जग मोकळं झालं. आता मी स्वतःला 100% वारकरी समजतो.
‘गजर’चा शेवटचा जो सीन आहे तो आम्ही अकलूजला एका वेगळ्या विठ्ठल मंदिरात शूट केलाय. पौर्णिमेला माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेल्या जातात. तेव्हा मी पहिल्यांदा पंढरपूरच्या विठ्ठलासमोर उभा होतो. सिनेमात जो शेवटचा सीन आहे तिच भावना मी पुन्हा अनुभवली. मी पांडुरंगासमोर उभा होतो आणि डोळ्यातुन फक्त पाणी वाहत होतं.
यंदा वारी होत नाहीय, याचं वाईट वाटतंय. पण सध्याच्या परिस्थितीला अत्यंत योग्य असा हा निर्णय आहे. माझे काही सिनेमे असे आहेत की जे मी केले याचा मला फार अभिमान आहे. ‘गजर’ हा त्यापैकी एक सिनेमा आहे. त्यामुळे एकुणच ‘गजर’ माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव आहे.
- चिन्मय मांडलेकर
- शब्दांकन : भिडू देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू
- शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनी समृद्ध केलेला मार्गय हा वारीचा..
- देश स्वतंत्र होण्याच्या आधी साने गुरुजींनी विठोबाला जातीपातीच्या बंधनातून स्वतंत्र केलं.
- विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी कोण ठरवतं ? आणि कसं ?