महाभारतात धर्मराज अर्धसत्य बोलून गोत्यात आलेले इकडे सिरीयलवाल्या धर्मराजचं पण सेम झालंय…

भिडू आपल्या पैकी महाभारत किती जणांनी वाचलंय ? कौरव पांडव या भावंडांच्यात झालेलं १८ दिवसांचं युद्ध इतकीच या महाग्रंथाची स्टोरी नाही. यात  हजारो कॅरेक्टर्स आहेत, त्यांचा प्लॉट सबप्लॉट आहे. तुमच्या आजच्या गेम ऑफ थ्रोन्स सारख्या सिरियलच्या तोंडात मारेल असा ड्रामा आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे यात भगवत गीता आहे, कर्मण्ये वाधिकारस्तु मा फलेषु कदाचन सारखे जीवनाचं सार सांगणारे वचन आहे. महाभारताचे छोटे छोटे प्रसंग देखील आपल्याला जगण्याच्या गोष्टी शिकवतात.

यातच एक गोष्ट आहे युधिष्ठिराच्या नरो वा कुंजरोवा ची..

महाभारताचं युद्ध पेटलं होतं. स्वतः गुरु द्रोणाचार्य कौरवांचे सेनापतिपद भूषवत होते. पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या अर्जुन भीम यांसारख्या योद्ध्यांना देखील द्रोणाचार्यांचा सामना करणे जड जात होते. हे असच चालू राहिलं तर कौरव युद्ध जिंकतील अशी वेळ आली. अशावेळी श्रीकृष्णाने पांडवांना जिंकवण्या साठी  एक आयडिया लढवली. द्रोणाचार्यांचा अश्वत्थामा नावाचा मुलगा होता. असं म्हणतात कि तो अमर होता. द्रोणाचार्यांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम होते. 

योगायोगाने त्या दिवशी युद्धभूमीवर अवन्तिराजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. त्याला भीमाने मारले.  द्रोणाचार्यांच्या पर्यंत बातमी पोहचवण्यात आली कि अश्वत्थामाला भीमाने मारले. त्यांना अश्वत्थामा मेल्याचं कळलं तेव्हा प्रचंड धक्का बसला. 

अश्वत्थामा मेला यावर त्यांना विश्वास बसत नव्हता. अखेर त्यांनी सत्यवचनी समजल्या जाणाऱ्या युधिष्ठिराला खरे काय ते विचारले. त्याच्यावर द्रोणाचार्याचा विश्वास होता. असं म्हटलं जायचं की आयुष्यात कधीही खोटे न बोलणाऱ्या धर्मराज युधिष्ठिरचा रथ जमिनीपासून चार अंगुळे वर चालतो. असा हा सत्य वचनी युधिष्ठीर या वेळी मात्र असत्य बोलला. द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा नव्हे, तर हत्ती मारला गेला हे न सांगता तो म्हणाला, ‘नरो वा कुंजरो वा’. म्हणजे अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती (कुंजर) ते माहीत नाही. 

युधिष्ठिराचा पहिला शब्द कानात पडताच द्रोणाचार्य अतीव दु:खित होऊन त्यांनी शस्त्रत्याग केला. ही संधी साधून द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न याने द्रोणाचार्याचा वध केला. अशा प्रकारे युद्धाच्या पंधराव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य धारातीर्थी पडले. 

कधी न खोटे बोलणाऱ्या युधीष्ठीराचा जमिनीपासून चार बोटे हवेत चालणारा रथ त्या दिवशी धाडदिशी खाली आदळला. 

तर हे आख्यान तुम्हाला आम्ही का ऐकवले हा प्रश्न पडला असेल. तर विषय आहे आधुनिक युधिष्ठिराचा. म्हणजेच महाभारत सिरीयल मधले धर्मराज बनलेले गजेंद्र सिंह चौहान. तस बघायला गेलं तर महाभारत सिरीयल भारतातली आजवरची सर्वात गाजलेली सिरीयल. आपल्याला महाभारत कळला तो या सिरियलमुळेच. खरे अर्जुन भीम कृष्ण भीष्म दुर्योधन कसे दिसतात असं विचारल्यावर आपल्या डोळ्यासमोर यात भूमिका केलेल्या कलाकारच उभे राहतात. त्यांनी तसचं वागावं अशी आपली अपेक्षा असते.

पण याला अपवाद ठरतात महाभारत मध्ये धर्मराज बनलेले गजेंद्र सिंह चौहान. ते नेहमी उलटसुलट विधाने करून कॉंट्रोव्हर्सी करत असतात. मध्यंतरी सरकारने त्यांची पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या चेअरमनपदी निवड केलेली तेव्हा ते या पदासाठी लायकीचे नाहीत असं म्हणत नेटकऱ्यांनी गोंधळ झाला होता. फक्त भाजप समर्थक म्हणून त्यांची निवड झाली असं म्हटलं गेलं. 

खुद्द अर्णब गोस्वामीने आपल्या कार्यक्रमात गजेंद्रसिंह चौहान यांना चांगला सिनेमा म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता. त्याच उत्तर एफटीआयआयचे चेअरमन बनू पाहणाऱ्या चौहान यांना देता आलं नाही. पुढे सरकारनेच त्यांना काही वर्षात या पदावरून काढलं.

मध्यंतरी गजेंद्रसिंह यांनी एक ट्विट टाकलं कि त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालाय आणि त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतोय. नंतर कळलं कि हा फाळके पुरस्कार शासनाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पूरसाकर नाही तर मुंबईच्या कुठल्या तरी साध्या संस्थेचा पुरस्कार आहे. गजेंद्र सिंह चौहान तेव्हा खोटं बोलल्याबद्दल ट्रोल झाले.

आज पण गजेंद्रसिंह यांनी असच काहीस केलंय. 

झालं काय तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आयपीएलच्या सध्य स्थितीवर एक कमेंट केलं.  

 

म्हणजे त्यांना म्हणायचं होत कि पंजाब मुंबई राजस्थान आणि हैद्राबाद इथे नॉन बीजेपी सरकार असल्यामुळे त्यांना आयपीएलमधून बाहेर पडावं लागलंय. झालं मग नेटकरी पुन्हा खवळवले. एक तर त्यांनी उगाच आपल्या ट्विटमधून आयपीएलमध्ये राजकारण आणलं होतं. शिवाय ते धर्मराज युधिष्ठिराप्रमाणे अर्धसत्य बोलत होते.

हे खरं आहे कि आयपीएलच्या प्ले ऑफ मधून पंजाब, मुंबई, राजस्थान, हैद्राबाद बाहेर पडलेत आणि तिथे नॉन बीजेपी सरकार आहे. पण जे प्ले ऑफ मध्ये गेलेत तिथे तरी कुठे भाजपची सत्ता आहे? प्ले ऑफ मध्ये गेलेल्या बेंगलोरचा अपवाद वगळता दिल्ली, कोलकाता, चेन्नई या तिन्ही ठिकाणी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रमुक या कट्टर भाजप विरोधी पक्षांचं सरकार आहे.

त्यामुळेच गजेंद्र सिंह अर्ध सत्य बोललेत आणि त्याबद्दल प्रचंड ट्रोल होत आहेत.

हे ही वाच भिडू.

 

   

Leave A Reply

Your email address will not be published.