गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली ! 

 

“ ह्या दुकानदारांनी आपल्या भागाची पार वाट लावल्या बघ. कुठबी जा ह्यांनाच जागा पाहीजे. अरे तो दत्ताचा माळ सोडला नाय त्यांनी. दिसल तिथ जागा घेत्यात. बिल्डींग बांधत्यात ,भाड्यावर देत्यात. हेच्याकडं काय पोत्यानं पैसा येतोय, गटारातला पैसा रं. मग काय घे की जागा. विटा, खानापूर, आटपाडी, पलूस, तासगाव कुठलच गाव सोडल नाय बघ. पलूस कसलं होतं लगा दहा वर्षांपुर्वी आत्ता मुताय जागा मिळायची नाय तिथ”

मित्र बोलत होता. तस तो कुठं आणि कधी बोलत होता हे विचारायची गरज पण नाही. दूकानदारांचा विषय निघाला की गावातला कुठलापण बिन लग्नाचा पोरगा असच बोलतो. सांगलीच्या वरच्या भागात आणि माणच्या आसपासच्या भागात असा एक पट्टा आहे. तासगावपासून सुरू होणारा हा पट्टा पलूस, विटा, खानापूर, आटपाटी,खटावपर्यंत जातो. या भागातली लोकं संपुर्ण देशात दूकानदार म्हणून ओळखली जातात. दूकानदार म्हणजे काय तर गलई कामगार. 

म्हणजे काय तर, “सोनं शुद्ध करणारी माणसं”. 

हा भाग म्हणजे दुष्काळी पट्टा. मराठवाड्यात असतोय त्यापेक्षा बेक्कार. मग या भागातल्या लोकांनी मुंबईला जावून काम करण्यास सुरवात केली. पुढं सोन्याच्या धंद्यात गुतंली. एकामागून एक करत पुर्ण भारत काबीज करुन झाला. सिंकदरासारखं मग श्रीलंका, नेपाळ असे आजूबाजूचे देश पण जिंकायला सुरवात केली. आत्ता तर दुबईमध्ये पण दुकानदारांनी बस्तान बसवलय. 

या दुकानातून त्यांनी सोन्यासारखा पैसा कमावला. मग ते गावात येवून गुंतवणूक करु लागले. गुतंवणूक होते ती जागेत. दुष्काळी भागात गुंतवणूक करायला दूसरा पर्याय पण नसतोय. पण यांनी पुण्या मुंबईत फ्लॅट घेतले नाहीत तर गावातच जागा घ्यायला सुरवात केली. आज या भागातल्या कुठल्यापण तालुक्याच्या बस स्टॅण्डवर गेलात तर पुढं असणारं कॉम्प्लेक्स सोनाचांदीवाल्याचच असतय. चौकातली जागा पण त्यांचीच असत्या.

मग जे दुकानला गेले नाहीत त्यांचा मुद्दा असतोय तो म्हणजे ह्यांनी सगळं महाग करुन ठेवलं. 

आत्ता महाग केलय का ? तर केलय, यात दुमतं नाही. पण वाट लावली का ? हा खरा प्रश्नाय म्हणूनच म्हणलं ही दूकानदार कोण आणि त्यांनी काय केल हे एकदा सांगावच ! 

एक पोरगं होतं. विट्याजवळच्या वजेगावचं. १८५७ चा उठाव होवून काहीच वर्ष झालेली. जेव्हा सगळा भारत लढाया करण्यात गुंतलेला असायचा तेव्हा पण स्थलांतर होतं. इथली माणसं तेव्हा मुंबईला गोदीत काम करायला जायची. माणसांच्या तब्येती कष्टकऱ्यांच्या, त्यामुळं मुंबईच कष्टाचं काम सगळं इथल्याच लोकांच्या हातात होतं. त्याच वेळी हे पोरगं गोदीत काम करायला मुंबईला गेलं. पोरगं बारीक होतं. कष्टाचं काम झेपलं नाही म्हणून त्यानं भाजी विकायचा धंदा चालू केला. सकाळी भाजी टोपलीत टाकायची आणि घरोघरी जावून विकायची. त्याचा हा धंदा चालायचा तो मुंबईच्या झवेरी बाजारात. तेव्हा झवेरी बाजाराचं सगळ मार्केट इराणी लोकांच्या ताब्यात होतं. अशाच एका क्षणी त्या पोराची आणि इराण्याची गट्टी जमलेली. 

पुढं इराण्याजवळ तो थांबू लागला. इराण्यानं त्याला गलाई काम शिकवलं. विश्वास बसल्यावर सोबतचे पैसै आणि पोरंबाळ घेवून इराणी हजला गेला. आत्ता हा पोरगा दुकानात सेट झाल्ता. त्यानं तसच काम चालू ठेवलं. सोबत आपल्या भावाला बोलवलं. दोघांनी मिळून दूकान काढलं. 

सोना चांदिवाल्याचं पहिलं दूकान होतं ते “सखाराम हणमंत आणि कंपनी”.

१८८२ साली दुष्काळातल्या एका पोरानं एक वाट पुढच्या पिढ्यांना आखून दिली होती. तेव्हा या दोघांना पण माहित नसेल आपण माळरानवरची दगडं सोन्याची करायला चाललोय ते.

पुढं “सखाराम कंपनी” काही कारणानं बंद पडली, पण त्यांच्या भावानं परशुराम हणमंत आणि कंपनी मात्र जिवंत ठेवली. तेव्हा आटणीच्या कामात वेस्टेजसाठी पैसै दिले जायचे. पण या परशुराम कंपनीनं मजूरी द्यायला सुरवात केली. मुंबईच्या बाजारात ही माहिती समजली. लोकं वाढू लागले. इथल्या लोकांचा भर असायचा तो फक्त प्रामाणिकणावर. त्यांनी प्रामाणिकपणा जपला. दिवसरात्र काम करायला सुरवात केली. हळुहळु गुरव कंपनीचं नाव झालं. त्यांनी गावाकडची लोकं आणि मुंबईच मार्केट सेट होवून गेलं. 

१९ व्या शतकाच्या शेवटाचा आणि २० व्या शतकाच्या सुरवातीचा तो काळ. तेव्हा सोन्याचा दर पण विशेष नव्हता. पण वेगळं काहीतरी म्हणून इथली माणसं एकाच्या नादाला दुसरा म्हणत दुकानासाठी जावू लागली. त्याचवेळी मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येकाला देशभरातनं येणारा माणूस “चला आमच्याकडं” म्हणून घेवून जावू लागला. एका मागं एक करत हे दूकानदार देशभरात पसरू लागली. कोण दक्षिणेत तर कोण उत्तरेत.

तीस चाळीस वर्षात भारताच्या एका तरी राज्यात इथला एक दुकानदार तळ ठोकून उभा राहिला होता. प्रत्येक राज्याचा एक एक गड वयाच्या १२ व्या, १३ व्या वर्षी घरं सोडणाऱ्या पोरांनी काबीज करायला सुरवात केलेली.

१९५० च्या सुमारास असाच एक तरुण पोरगा दुकानदार व्हायला केरळात गेला. १३ वर्षाचा तो पोरगा एक हजार रुपये घेवून केरळात आलेला. त्याला दुकानदार व्हायचं होतं. १००० रुपये तेव्हाच्या काळात अती होते. या पोरांन अल्लपीला आपल्या मित्राबरोबर दूकान काढलं. दुकानं कसलं तर रस्त्यावरची गुंठाभर मोकळी जागा ती पण भाड्याची. आजूबाजूला नारळाच्या झावळ्या रचून खोपटं तयार केलेलं. रात्रीचं देवळात झोपायचं. देवळाच्या बाहेर अंघोळ करायची आणि कामाला लागायचं. अस करत सहा महिने गेले.

हळुहळु तिथल्या लोकांना त्या पोराचा प्रामाणिकपणा कळला. चांगल्या माणसांनी एर्नाकुलमचं मार्केट सांगितलं. हे पोरगं तिथ गेलं. पुढे काय झालं तर “प्रताप साळुंखे”. आज प्रताप साळुंखे हे गलाई व्यवसायातले एक ब्रॅण्ड आहेत. त्यांच्या नावाला, गावाला दूसऱ्या कुठल्या गोष्टी सांगण्याची गरज पण नाही. थोड्याफार फरकानं प्रत्येक राज्यात असाच एकएक जण गाजू लागलेला.

अशीच एक गोष्ट बस्तवड्याच्या विलास कोळींची. विलास कोळी सातवी पास झालेले. घरात एकवेळच्या खायची चिंता. नाही म्हणलं तर प्रत्येक गावात एक वेगळी जातीव्यवस्था होती. श्रीमंत आणि गरिबांची. श्रीमंत माणूस गरिबाला दारापुढं पण उभा करत नव्हता. त्या काळात विलास कोळींच्या आईनं त्यांना दूकानाला पाठवलं. साल होतं १९८० चं. देशभरात दुकानदार सेट होतं होते. विलास कोळी पंजाबला दूकान शिकायला म्हणून गेले. इथं शिकायला आलेल्या पोराला पहिला कोळसा फोडायचं काम दिलं जातं. गावात कार्यक्रम असला तर जेवायला मिळेल या आशेवरची ही पिढी होती. माणसांनी त्यांना लग्नात जेवायला पण बोलवलं नव्हतं. ती पोरं पंजाब, केरळ कुठही जायची आणि शिकायची. विलास कोळींनी दुकान शिकलं. पुढच्या तीन वर्षात दिल्लीत दुकान काढलं. आत आणि बाहेर अशा दोन खोल्या. कामगारांची संख्या शुन्य. मग त्यांनी एक आयडिया केलेली. चौकटीवर एक आरसा लावलेला. बाहेर गिऱ्हाईक आलेलं त्या आरश्यात दिसायचं मग हा कामगार मालक म्हणून बाहेर जायचा. गिऱ्हाईक गेलं की स्वत: आत येवून आटणीचा काम करायला सुरवात करायचा. हिच परस्थिती सगळ्याच कामगारांची होती. एकट्याच्या जीवावर अख्या भारतात पणत्या पेटत होत्या. काही वर्षात त्याच्या मशाली होणार होत्याच.

बेणापूरच्या प्रकाश पाटलांनी पहिला चांदी शुद्ध करुन देणारा कारखाना काढला. दिवसाला २०० किलो चांदी शुद्ध करुन देणारा तो कारखाना होता. संजय माने सेलमला गेले, सेलम चांदीसाठी प्रसिद्ध. चांदीची पैंजण करणारा कारखाना त्यांनी काढला. बाहेरच्या राज्यात पहिल्यांदा मराठी माणसांन कारखाना काढला होता.

एका मागणं एक गाव सोडलेली माणसं शेठ होत होती. पण त्यामागं गटाराचा पैसा नव्हता तर कष्ट होतं. वयाच्या ११ व्या १२ व्या वर्षी घर, गाव सोडून भारताच्या वाटेल त्या कोपऱ्यात जावून प्रत्येकानं आपआपलं साम्राज्य तयार केलेल. हि पोरं गेलेली ती भूकेसाठी. यात कुठलीच जातीव्यवस्था नव्हती. असलीच तर फक्त गरिबीची जात होती. जी या पोरांना लहानपणापासून चिकटलेली. मोठ्या जिद्दीनं सोनं धुतल्यासारखं या पोरांनी स्वत:ला सिद्ध केलं. नंतर हे शेठ लोकं गावाकडं आले. त्यांनी हितल्या जागेत गुंतवणूक गेली. मोठमोठ्या बिल्डींग बांधल्या. त्या दूकानात कुणी हॉटेल काढलं, तर कुणी कपड्याची दुकानं. दुष्काळी भागाच एक नवं मार्केट उदयाला आलं. बर त्यांनी गावात पैसा गुंतवायचं कारण पण होतं ते म्हणजे खूप वर्षांपूर्वी त्यांच्यावर गरिबीचा शिक्का होता. आजच्या शेठच्या पाठीमागं कुठेतरी तो उपाशीपोटी पंजाबपासून केरळापर्यंत नशीब शोधायला गेलेला अवखळ पोरगा होताच. त्या पोरानं आजच्या दिवसासाठी त्याचं बालपण मारलेलच की,

असो मशाली एका दिवसात पेटत नाहीत, माळरानं पण सोन्याची करायला हिंम्मत लागते. जी अनेक पिढ्यांच्या कष्टातून येते. हित अनेक पिढ्यांच कष्ट एका पिढ्यांनी केलं. म्हणूनच सांगाव वाटतं, सोनाचांदीवाल्यांनी खरच या भागाची वाट लावली कारण त्यांनी शिकवलं,

पैसा जमीन विकून मिळत नाही, तर तो जमीन विकत घेवूनच मिळत असतो.

 •  सौरभ पाटील. (patilsourabh1313@gmail.com)
7 Comments
 1. धिरज घोडके says

  छान लिखान..
  अप्रतिम

 2. अर्जुन गायकवाड says

  दुकानदारीमुळेच भागाची प्रगति झाली. सरकारी योजनांमुळे फक्त राजकारणी आणि नोकरशाहीच बहरली असती. उपासमारीने नेक्सलवादि पिडीत प्रदेशात याहि भूखंडांचे नाव असते. कदाचित लेखकास हा लेख लिहिण्याची गरजच भासली नसती

 3. सुरेश says

  छान माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.