आणि जगज्जेता गामा पहिलवान कोल्हापूरात हरला !

भारतीय कुस्तीत आजही ज्यांचा उल्लेख आख्यायिकेप्रमाणे केला जातो असे दोन पहिलवान होऊन गेले. गामा पहिलवान आणि गुंगा पहिलवान त्यांचं नाव. कुस्तीचे मापदंड म्हणून ओळखले जाणारे असे हे मल्ल.

गुलाम महम्मद उर्फ गामाचा उल्लेख आजही द ग्रेट गामा असा केला जातो. वर्ल्ड हेविवेट चॅम्पीयन राहिलेल्या गामाला कुस्तीत हरणे काय असते हे ठाऊकच नव्हते. पंजाबच्या अमृतसरला जन्मलेला गामा पतियाळाच्या राजाच्या दरबारी आश्रीत पहिलवान होता. पण अनेक वर्षे शाहू महाराजांनी त्याला खुराक पुरवल्यामुळे कोल्हापूरचा सुद्धा त्याच्यावर हक्क होता. गुंगा पहिलवान सुद्धा त्याच्याच भागातला.

या दोघांच्या घराण्यात कुस्तीमध्ये पिढीजात चुरस होती.

कोल्हापूरला राजाराम महाराजांनी या दोघांच्या कुस्तीचे मैदान भरवले. त्या काळातसुद्धा उत्तरेच्या मल्लांच महाराष्ट्रात खूप अप्रूप असायचं. त्यात जगज्जेता गामा आणि गुंगा पहिलवानची कुस्ती म्हणल्यानंतर लाखो लोक कुस्ती बघायसाठी खासबाग मैदानावर जमा झाले होते. मलमली सदरे आणि रंगबेरंगी पटक्यानी मैदान फुलून गेले होते. संध्याकाळच्या पाचच्या दरम्यान सोनेरी रथातून छत्रपतीची स्वारी मैदानात आली.

वृद्ध पहिलवान रमजान पंजाबी नी पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती साठी गामा पहिलवान आणि गुंगा पहिलवानचे नाव पुकारले.

हलगी आणि ढोलचे सूर टिपेला पोहचले होते. कल्लू पहिलवान सोबत उभा असलेला त्याचा मुलगा गामा वडिलांचे दर्शन घेऊन रनदुधुम्भी करत चित्त्याच्या वेगात आखाड्यात आला. उत्तर दरवाज्यातून गुंगा पहिलवान आकाशातून झेपावत असल्याप्रमाणे दंड थोपटत रिंगणात शिरला. दोन्ही पहिलवानांच दर्शन होताच दर्शकांमधून घोषणा आणि शिट्ट्यांचा एकच हलकल्लोळ झाला.

दोन विशालकाय डोंगर एकमेकांना भिडावेत तसे दोन्ही धिप्पाड पहिलवान एकमेकांना भिडले. सुरवातीची काही मिनिटे एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्यात गेला. गामा सुरवाती पासून आक्रमक होता. त्याच्या हालचाली सुद्धा आत्मविश्वास पूर्ण होत्या. गुंगाला ढाक मारून त्याने हेलपाटले. एकदम झालेल्या या हल्ल्याने गुंगा हादरला त्याने सरळ मैदानाबाहेर पळ काढला.

गामा पहिलवान विरुद्ध लढण्यासाठीचे त्याने उसने आणलेले अवसान आता गळून पडले होते. बालीवान उस्तादने गुंगाच्या वडिलांनी शिव्या हासडत त्याला रिंगणात परत पाठवलं. कुस्तीतून पळ काढणे हा खूप मोठा अपमान होता आणि या कुस्तीत तर खानदानकी इज्जत पणाला लागली होती.

परत थोडावेळ खडाखडी झाली. गामाने गुंगाची बोटे मोडली. गुंगा धडपडत रिंगणाच्या बाहेर आला. आता मात्र बलीवान उस्तादाच्या रागाला सीमा उरली नाही. त्याने सगळ्या प्रेक्षकांच्या समोर गुंगा पहिलवानच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला. दात ओठ खात आपल्या सहकाऱ्याकडून त्याने लांग मागून घेतली. लांग कसत म्हातारा उद्गारला,

“बेवकूफ, अगर तुम नही लढोगे तो खानदान की इज्जत बचाने के लिये मुझे लडना पडेगा”

गुंगाच्या लक्षात आले की आपले सगळे दोर कापले गेले आहेत. मैदानावर जीव देण्याशिवाय काही पर्याय नाही. लाल माती हातात घेत तो परत रिंगणात उतरला. अचानक जादू झाल्याप्रमाणे खेळाचा नूर पालटला. एकेरी पट काढत गामाला गुंगा पहिलवानने खाली खेचले होते. विजेच्या चपळाईने त्याच्या त्याच्या जाडजूड मानेवर आपला घुटणा रोवला. गामाला हालचाल करणे देखील मुश्किल झाले होते. काही सेकंदातच गामा पहिलवान चीतपट झाला.

उस्ताद बालीवानने धावत झून आपल्या पोराला गळ्याशी धरले. त्याने इतिहास घडवला होता.

आता पर्यंत कधीच न पहावयास मिळालेलं चित्र कोल्हापूरच्या लाखो कुस्तीशौकिनांच्या समोर घडलेलं पाहवयास मिळालं होत. राजाराम महाराजांच्या हस्ते चांदीची गदा विजयी गुंगा पहिलवानला देण्यात आली. त्याच्या चाहत्यांचा जल्लोष खाली मान घालून पहात गामा पहिलवान आणि त्याचे वडील कल्लू पहिलवान आखाड्यातून शांतपणे बाहेर पडले. “मेरी जीत खुदा को भी मंजूर नही थी” असं म्हणत गामाने पराभव सुद्धा ग्रेसफुली स्वीकारला होता.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.