हे ४ कफ सिरप आपल्या बाळांना देऊ नका…कफ सिरप अलर्ट घोषित झालाय प्रकरण समजून घ्या….

आफ्रिकेतील गाम्बिया देशात ६६ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. मृत्यू होण्यामागचं धक्कादायक कारण म्हणजे कफ सिरप. हो सर्दी-खोकला झाला कि आपण जे कफ सिरप घेतो त्याचमुळे या निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील औषध कंपनीने बनवलेल्या ४ कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. हे ४ कफ सिरप सुरक्षित नाहीत त्यामुळे थेट मृत्यूचा धोका आहे असं WHO ने सांगितलं आहे.

भारतातून मोठ्या प्रमणात बाहेरील देशांना मेडिसिन्स पाठवलं जात. यातीलच एका फार्मा कंपनीने बनवलेल्या कफ सिरपमुळे गाम्बियातील मुले दगावली आहेत. त्यामुळे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी भारतातील चार कफ सिरप अलर्ट घोषित केला आहे. 

संपूर्ण देशभरात या बालकांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जातेय, तेच प्रकरण समजून घेऊया नक्की काय झालं?

ही घटना आहे आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या गाम्बिया या देशातील. कफ सिरप पिल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कफ सिरप पिल्याने लहान मुलांच्या किडनीवर परिणाम झाला आहे. याशिवाय डायरिया, ओमेटींग, डोकेदुखी यांसारखी लक्षणं देखील दिसून येत आहेत. 

 

 

त्यामुळं WHO ने ट्वीट करून एक अलर्ट जारी केला आहे. ज्यानुसार भारतातील फार्मा कंपनीने बनवलेल्या कफ सिरप वापरावर बंदी आणलेली आहे.

जुलै महिन्यापासून स्थानिक पातळीवर विकले जाणारे पॅरासिटामॉल सिरप घेतल्यानंतर पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे डझनभर मुलं तीन ते पाच दिवस आजारी पडत होते. यातून त्यांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांना किडनीचे आजार सुरु झाले.

भारतातील मैडेन फार्मा या हरियाणामधील कंपनीतून ४ कफ सिरप बनविले गेले आहेत. हे ४ कफ सिरप म्हणजे प्रोमेथाझीन ओरल सोलुशन, कोफेक्समलीन बेबी कफ सिरप, मेकऑफ बेबी कफ सिरप आणि म्याग्रीप एन कॉल्ड सिरप हे चार कफ सिरप आहेत ज्याच्या वापरामुळे आफ्रिकेतील लहान मुलांच्या किडनीवर परिणाम झाला आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार फार्मा कंपनीने या सिरप च्या सेफ्टी आणि क्वालिटी बद्दल कोणतीच हमी दिलेली नाही.

कफ सिरपमध्ये नक्की प्रोब्लेम काय आहे ?

WHO ने सांगितलं आहे की, या सिरपमध्ये, डायथेलीन ग्लायकॉल आणि इथिलेन ग्लायकॉल हे या सिरप मध्ये आढळून आले आहे. अहवालात नमूद केल्यानुसार डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे कार्बनचे संयुग आहे. त्याला वास नसतो ना रंग. हे चवीला गोड असते. हे फक्त मुलांच्या सिरपमध्ये जोडले जाते, कारण लहान मुलं चवीला गोड असल्यामुळे ते सहज पिऊ शकतील.

या कंपाउंडचा इफेक्ट झाल्यावर कोणते लक्षणं दिसून येतात ?

  • सुरुवातीच्या २ दिवसात उलट्या, जुलाब, पोटदुखी उद्भवते आणि मेंदू सुन्न होऊन मायनर कोमात जातं.
  • ३-४ दिवसात मूत्रपिंड निकामी होऊन लघवी करण्यास समस्या येते.
  • हृदय गतीदेखील अनियमित होते
  • या १० दिवसात अर्धांगवायू होऊ शकतो आणि पेशंट क्रिटिकल कोमात जाऊ शकतो
  • मृत्यूही होऊ शकतो.

याच्या टोक्सिक इफेक्टमुळे डोकेदुखी, ओमेटींग, डायरिया आणि किडनीचा त्रास यांसारखे आजार होतात आणि याच गोष्टी गाम्बिया देशातील मुलांमध्ये दिसून आल्या आहेत.

याचा ओव्हर डोस थेट मृत्यूला कारणीभूत ठरतोय…

हे कंपाउंड जास्तीत जास्त ०.१४ मिलीग्राम प्रति किलोपर्यंत औषधांमध्ये मिसळले जाऊ शकते. प्रति किलो १ ग्रॅमपेक्षा जास्त मिसळल्यास मृत्यू होऊ शकतो. असं असलं तरी अद्याप WHO किंवा या कंपन्यांकडून मृत्यूस कारणीभूत असलेल्या औषधांमध्ये या संयुगांचे प्रमाण किती होतं हे उघड केलेलं नाही. या कफ सिरप मध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकामुळेच WHO ने याच्या वापरावर बंदी आणलेली आहे.

हे सिरप फक्त गाम्बिया पुरतच मर्यादित आहे का ?

याबद्दल बोल भिडूने महाराष्ट्र आयएमए चे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

“गाम्बिया देशात दिल जाणार सिरप अजून तरी माझ्या पाहण्यात आलेलं नाही त्यामुळे ते आपल्या इथं नसण्याची शक्यता आहे. तसच लोक डॉक्टरांना न विचारता अश्या प्रकारची सिरप मेडिकल मधून घेतात. त्यामुळे त्यांना अशा आजारांना सामोर जावं लागत आणि त्यांच्यामुळे इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्याकडे घाबरण्याचे कारण नाही मात्र अशा प्रकारची सिरप घेताना त्यातील कंटेंट चेक करून घेणे योग्य आहे” अशी माहिती भोंडवे यांनी दिली.

तसेच Indian Central Drugs standard control supply ने सांगितलं आहे की, हरियाणा मधील फार्मा कंपनीने बनविलेले हे चारही सिरप फक्त गाम्बिया देशातच पाठवले आहेत. अन्य कोणत्याही ठिकाणी अजून पाठवण्यात आलेले नाहीत.

मात्र WHO च्या म्हणण्यानुसार अनधिकृतपणे या सिरपची विक्री आफ्रिकेतील इतर देशांमध्ये सुद्धा झाली असण्याची शक्यता आहे. तसंच भारतासह अन्य देशातही याचा supply झाला असू शकतो. त्यामुळे हे चार सिरप जर कुठे विकले जात असतील तर त्याबद्दल माहिती देण्यात यावी आणि त्यावर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी आता भयभीत झालेल्या नागरिकांमधून होत आहे.

WHO आणि Indian Drugs Control च्या वतीने या सिरप बद्दल पुढचा तपास सुरु आहे. खर तर २९ सप्टेंबर पासूनच याचा तपास Indian Drugs Control च्या वतीने सुरु असल्याची माहिती मिळतेय. सध्या या सिरपच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी आणलेली आहे.

मागच्या महिन्यापासून गाम्बिया सरकारच्या वतीने लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यू संदर्भात तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये देखील या कफ सिरप मध्ये असलेले घटक कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आलं होतं. अलर्ट जारी झाल्यानंतर संबंधित कंपनीने वेबसाइट बंद केल्याचं बातम्यांद्वारे कळतंय. पुढील तपासात आणखी माहिती समोर येउ शकते.

हे सिरप भारतात आहे की नाही याची माहिती औषध प्रशासनाच्या वतीने दिली जाईलच मात्र आपण देखील कोणतही सिरप घेताना त्यातील कंटेंट तपासून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.