मंडळाच्या पैलवान कार्यकर्त्याला समोर ठेवून या बाप्पाची मूर्ती बनवली गेली आहे…

गणपती म्हणजे विद्येचे दैवत. आणि पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. पण पुणे तिथं काय उणे असं म्हणतात ना ते खरच आहे. इथ तुम्हाला चक्क तालमीतला पहिलवान बाप्पा बघायला मिळेल. हो हो पहिलवान बाप्पा तो पण धोतर आणि कुर्ता घातलेला, पिळदार शरीरयष्टी असलेला आणि हातात चक्क घड्याळ असलेला.

पुण्यात तुम्हाला तुमच्या गाडीचा कुठलाही पार्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला नाना पेठ येथे आल्याशिवाय पर्याय नाही. त्याच नाना पेठच्या चाचा हलवाई चौकात आतमध्ये उजव्या बाजूला आहे साखळीपीर तालीम.

ह्या तालमीचे वैशिष्ट्य म्हणजे ही तालीम १९१९ मध्ये नाना पेठेतील व्यापाऱ्यांनी मिळुन बांधलेली आहे. आणि त्या तालमीजवळ एक पीराचे स्थान आहे. आणि त्याच स्थानाजवळ एक साखळी आहे. जर तुमचं शरीर दुखत असेल आणि ती साखळी जर तुम्ही त्या दुखणार्‍या भागावरून फिरवली की तिथले दुखणं नाहीसे होते. अशी तिथल्या पहिलवानांची श्रद्धा होती. म्हणून त्या तालमीला साखळीपीर तालीम असे नाव देण्यात आले.

या तालमीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे इथे गणपती मंडळ, मारुती मंदीर आणि साखळीपीर बाबांची दर्गा ऐकाच वास्तु मध्ये आहे. आणि अजुन एक खास बाब म्हणजे, जेव्हा गोवा मुक्तीचे नारे लागत होते तेव्हा ह्या मंडळातील कार्यकर्ते गोवामुक्तीच्या आंदोलनास गेले होते. म्हणून ह्या तालमीला राष्ट्रीय तालीम असे नाव पडले.

आणि १९६८ साली तालमीने अजुन एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे पहिलवान प्रतिकृती असलेली बाप्पाची मुर्ती बनवण्याचा.

मूर्तिकार सोपानराव बेलसरकर यांनी तालमीतील पहिलवान बाबूभाई गाडीवाले यांना समोर पोज मध्ये उभे करून त्यांच्यासारखी बाप्पाची मुर्ती तयार केली.

ही मुर्ती साधारण साडे तीन फुटी उंचीची आहे. ह्या गणपतीला कुर्ता व धोतराचा पेहराव केला आहे. ह्या गणपतीच्या एका हातात घड्याळ,आंगठी व खिशाला पेन सुद्धा आहे. मुळ मूर्तीचे नीट जतन व्हावे म्हणुन दुसरी हुबेहुब फायबरची मुर्ती तयार केली गेली आहे.

राष्ट्रीय साखळीपीर तालीम मंडळ हे विविध उपक्रम राबविण्यात सुद्धा अग्रेसर आहे. सर्वधर्म समभाव हा हेतु ठेवून हे मंडळ प्रबोधन करत असते. काही वर्षांपूर्वी या मंडळाने सर्वधर्मियांच्या हस्ते बाप्पाची आरती आयोजित केली होती. त्या आरतीला उपस्थित सर्व धर्मगुरूंनी आपआपल्या धर्मातील पक्वान्न बाप्पासाठी नैवद्य म्हणून दाखविले होते. यामध्ये मुस्लिम बांधवांचा शिरखुर्मा, जैन बांधवांचा बत्तासा, बौद्ध बांधवांची खीर तर ख्रिचन बांधवांचा केक असा सर्व धर्मीय नैवद्य बाप्पाला दाखवण्यात आले होते.

मंडळाचे यंदा १०३ वे वर्षे आहे. पेठ भागातील हे एक महत्वाचे मंडळ आहे. आतापर्यंत या मंडळास अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

– कपिल जाधव

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.