विसर्जनानंतर गणेश मुर्त्यांची विटंबना टाळण्यासाठी मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वाद, आरोप झाले पण अंतुलेंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुढेच सरकू शकत नाही. फक्त अठरा महिने ते मुख्यमंत्रीपद राहिले. या अठरा महिन्यात अठरा वर्षात होणार नाहीत एवढं कार्य केलं आणि आपली छाप पाडली.

धर्माने ते मुस्लीम होते. लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. पण त्यांनी या १८ महिन्यांच्या कारकिर्दीत मुस्लीम – हिंदू असा धर्म न बघता अनेक आदर्श वाटावी अशी काम केली होती. मग ते कुलाबा जिल्ह्याच रायगड नामांतर करणं असो की छत्रपती शिवरायांची भवानी तलवार ब्रिटनला जावून आणण्यासाठी त्यांनी उभारलेलं व्यापक जनआंदोलन असो.

त्याच पद्धतीने त्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचे मंत्रालयात चित्र लावले. त्यांच्या आधी एकही मुख्यमंत्र्यांच्या मनात असा विचार आला नव्हता.

बॅ. अंतुले यांचा आदर्श वाटावा असा आणखी एक निर्णय म्हणजे गणपतीच्या मुर्त्यांची विटंबना टाळण्यासाठी केलेला एक दंडक.

गणपती विसर्जनाचा सगळ्यात मोठा, भव्य-दिव्य असा सोहळा होतं असेल तर तो मुंबईत. आणि मुंबईकरांच विसर्जनाचं हक्काचं ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटी. अगदी छोट्यातील छोट्या मुर्तीपासून मोठं मोठ्या मुर्तींची वाजत – गाजत मिरवणूक काढणं, खोल समुद्रात जावून विसर्जन करणं हे दरवर्षी दिसणार दृष्य.

पण हेच चित्र आधीच्या काळात काहीस वेगळ होतं. आधी गणपती मुर्तींचे विसर्जन खोल समुद्रात होत नव्हते. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनानंतर मोठ्या गणपतीच्या मूर्त्यां गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर तरंगत असत. या मुर्तींची होत असलेली विटंबना येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना देखील पाहवत नव्हती.

त्यावर्षी अनंत चतुर्दशीला बॅ. अंतुले मुख्यमंत्री होते. दुसऱ्या दिवशी ते मंत्रालयातून निवासस्थानी जाताना हे दृश्य त्यांनी बघितले आणि ते त्यांना बरोबर वाटले नाही. अंतुले यांनी त्यावेळी लागलीच शिवसेनेचे आमदार प्रमोद नवलकर यांना फोन केला. अंतुले आणि नवलकर चांगले मित्र होते. आमदार नवलकरांना सोबत घेऊन त्यांनी रात्रीची मुंबई पाहिली होती.

अंतुले यांनी फोनवरुन नवलकरांना चौपाटीच्या किनाऱ्यावर दिसणारी दृश्य सांगितली आणि पुढच्या वर्षांपासून खोल समुद्रात मोठ्या मूर्तीचे विसर्जन झाले पाहिजे, असे सुचविले.

नवलकर यांनाही ते पटले आणि त्या पुढच्या वर्षांपासून मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी खोल समुद्रात नेल्या जाऊ लागल्या. अशा पद्धतीने एका मुस्लिम म्हणवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांने पुढाकार घेवून गणपती मुर्त्यांची विटंबना टाळण्यासाठी पुढाकार घेतला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.