महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं वलय भारतीय सिनेमात कसं निर्माण झालं?

चौदा विद्या आणि चौंसष्ट कलांचा अधिपती गणराय याचे आज घरोघरी आगमन होत आहे. महाराष्ट्रासाठी हा जनोत्सव आहे. या गणरायाचे प्रतिबिंब भारतीय सिनेमात ठळकपणे पडलेले दिसते. भारतीय सिनेमाची मायानगरी ही मुंबई असल्याने इथल्या गणेशोत्सवाला रूपेरी पडद्यावर सातत्याने स्थान मिळते.

सिनेमातील गणेशाबाबत आपण जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की इतर देवदेवतांच्या चित्रपटासारखे चमत्कार या सिनेमात कधी नसतात. ‘गणेश चित्रपटां’चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये बटबटीतपणा नसतो. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत.

बहुतेक ‘गणेश चित्रपटां’मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान त्यांच्यात उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही. या चित्रपटातले चमत्कार असल्रेच तरी हे हास्यास्पद, अचाट नसतात. बऱ्याचदा देव मृत व्यक्तीला जिवंत करतो, महाप्रचंड रूप घेतो, अचंबित करणारे चमत्कार करतो, असं चित्रपटांत दाखवलं जातं. गणेश चित्रपट मात्र त्याला अपवाद आहेत. त्यात चमत्कार अर्थातच आहेत; पण ते अविश्‍वसनीय वाटत नाहीत. त्यामुळेच गणपती हा युजर्स फ्रेंडली वाटतो.

मराठी चित्रपटातून बाप्पा पूर्वीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

१९७८ साली सचिनने ’अष्टविनायक’ हा चित्रपट बनविला त्याची कथा गणेशाभोवती फिरणारी होती. यात शेवटी १३ मिनिटांचं ’अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गीत त्या काळातील सर्व नामवंत व श्रेष्ठ कलाकारांना घेवून चित्रीत झालं होतं.

गंमत म्हणजे या गाण्याचे गीतकार जगदिश खेबुडकर यांनी तोवर अष्टविनायकाची यात्रा देखील केली नव्हती. पुलंचा पन्नासच्या दशकात ’सबकुछ पुलं’ असा ’गुळाचा गणपती’ हा चित्रपट आला होता. अवधूत गुप्ते यांनी ‘मोरया’ या चित्रपटात गणेश स्तवनाची एक कव्वालीच बनवली होती.

अजय अतुल यानी ’उलाढाल’ या सिनेमातील ’मोरया मोरया’ने तर आधीचे सारे विक्रम मोडीत काढले.

हिंदी सिनेमात अलीकडे गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढू लागली आहे. १९७९ साली आलेल्या ’हम से बढकर कौन’ या सिनेमातील ’देवा हो देवा गणपती देवा’ हे गाणं रफीने गायलं होतं आणि अमजद खान वर चित्रीत झालं होतं.१९८० सालच्या ’टक्कर’ सिनेमात ’मूर्ती गणेश की अंदर दौलत देशकी’ य गाण्यावर संजीवकुमार व जितेंद्र थिरकले खरे पण साउथचा शिक्का या गाण्यावर दिसतो.

मुंबईतला भव्य आणि दिव्य गणेशोत्सवाचे आकर्षण अलम दुनियेला आहे. १९८२ साली आलेल्या ’दर्द का रिश्ता’ या चित्रपटात भव्य विसर्जन मिरवणूक दाखवत एक अत्यंत भावस्पर्शी गाणं चित्रीत केलं होतं.’मेरे मनमंदीर मे तुम भगवान रहे मेरे दुख से तुम कैसे अन्जान रहे’ पंचमच्या संगीतात हे गाणे हरीहरन ने गायले होते.

अमिताभच्या अग्नीपथ (१९९०) मध्ये ’गणपती अपने गांव चले’ या गीतात मिथुनचाही सहभाग होता. इतर काही गाण्यांमध्ये ’मोरया रे’ (डॉन), तेरही जलवा (वॉन्टेड) गा गा गा गणपती (एबीसीडी) सिंदूर लाल चढाओ (वास्तव) श्री गणेशाय धीमही (विरूध्द) देवा श्री गणेशा (अग्नीपथ) गणपती बप्पा अगले बरस तू (आंसू बने अंगारे) गजानना गजानना (बाजीराव मस्तानी) हे गणपती बाप्पा मोरया (पुजारीन)

मराठी भक्तीगीतात गणेशाची अनेक रूप मनाला मोहून टाकतात.

’दगडी चाळ’ मध्ये स्न्कुश चौधरी वर चित्रित ‘मोरया मोरया ‘ भन्नाट होतं. २०१५ साली दिवाळीत आलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘सूर निरागस हो…’ या शंकर महादेवन यांनी गायलेल्या गीतातून गणेशाचे दर्शन घडले.

‘तूच सुखकर्ता तूच दुख हर्ता अवघ्या दिनांच्या नाथा बप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा….’ हे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं कित्येक वर्षापूर्वीचे भक्ती गीत आजही हमखास आठवते. फार पूर्वी आशालता बाबगावकर यांचे मुंबई आकाशवाणीवर ’ तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया’ हे गीत आवर्जुन लागायचे या गीताची खुमारी मात्र अजूनही कमी होत नाही!

मराठी मनाचे गणरायाशी अतूट नाते आहे त्याचे पूर्ण प्रतिबिंब सिनेमात पडायला हवे तसे घडताना दिसत नाही.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.