एका इंग्रजाने तब्बल २० वर्षे गांधींना समजावून घेण्यात घालवली आणि हा सिनेमा बनला

महात्मा गांधी केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी असलेलं पूजनीय व्यक्तिमत्त्व. गांधींना नावं ठेवणारी, त्यांनी घेतलेल्या काही भुमिकांविषयी त्यांच्यावर आगपाखड करणारा एक गट पाहायला मिळतो. परंतु गांधींनी देशासाठी जो लढा उभारला, जो त्याग केला तो आपण कोणीही नाकारू शकत नाही. त्यांनी सर्वांच्या मनात सत्य आणि अहिंसा ही मूल्य रुजवली. आयुष्याबद्दल एक दृष्टिकोन दिला.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अमूल्य असं कार्य करून ठेवलं. अशा महात्मा गांधींची आज १५१ वी जयंती.

महात्मा गांधींच्या आयुष्यावर अनेक सिनेमे, डॉक्युमेंट्री आजवर बनवल्या गेल्या आहेत.

या सर्वांपेक्षा कायम वरचढ असलेला सिनेमा म्हणजे रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला ‘गांधी’.

या सिनेमाच्या प्रत्येक प्रसंगातून एक व्यक्ती म्हणून गांधी नेमके कसे होते, याची जाणीव होते. या सिनेमाच्या निर्मितीची गोष्ट मोठी विलक्षण आहे.

सुरुवातीला ‘गांधी’ सिनेमा विषयी… नथुराम गोडसेने गांधींवर गोळ्या झाडल्या आणि पुढे गांधींचं निधन झालं, इथून या सिनेमाची सुरुवात होते. हा सिनेमा नंतर १८९३ सालात घेऊन जातो. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेशामुळे गांधींना ट्रेनमधून अपमानास्पद रित्या बाहेर काढण्यात येतं.

गांधींच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

पुढच्याच प्रसंगात अमरीश पुरी एका भूमिकेत दिसतात. आणि हा सिनेमा आणखी जवळचा वाटतो. गांधींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात केलेला लढा नेमका कसा होता हे प्रत्येक प्रसंगातून उलगडत जातं. हा लढा यशस्वी होतो. आणि गांधीजी कुटुंबासोबत भारतात येतात. इथे आल्यावर सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांची ओळख होते.

गांधींना भारत देश तसा माहित नसतो. मग गांधीजी रेल्वेचा प्रवास करून भारताच्या खेड्यापाड्यांमध्ये फिरतात. हा देश, इथल्या लोकांबद्दल जाणून घेतात. आणि हळूहळू देशकार्याच्या सेवेत स्वतःला झोकून देतात. असा हा ‘गांधी’ सिनेमा.

‘गांधी’ सिनेमाचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जवळपास १८ वर्ष लागली.

इतकी वर्ष घेतलेली मेहनत, केलेल्या प्रयत्नांना पुढे अमाप यश मिळालं आणि ‘गांधी’ सिनेमाने ऑस्कर पुरस्कारांवर स्वतःची मोहर उमटवली.

या सिनेमाच्या निर्मितीची कहाणी अशी होती की, १९६२ साली लंडन येथे उच्च आयोगात काम करणारे भारतीय वंशाचे प्रशासकीय अधिकारी मोतीलाल कोठारी यांनी रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना फोन केला. मोतीलाल कोठारी आणि रिचर्ड अ‍ॅटनबरो यांची भेट झाली.

या भेटीत कोठारी यांनी महात्मा गांधींवर सिनेमा बनवण्यासाठी अ‍ॅटनबरो यांना प्रोत्साहित केले.

अ‍ॅटनबरो यांनी लुईस फिशर यांनी लिहिलेलं महात्मा गांधींचं चरित्र वाचलं. हे चरित्र वाचून अ‍ॅटनबरो महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमा बनवायचा ठरवला. भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांची पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी चांगली ओळख होती.

माऊंटबॅटन यांनी अ‍ॅटनबरोंची पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून आणली.

या भेटीत पंडित नेहरू यांनी अ‍ॅटनबरोंना या सिनेमासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु दुर्दैवाने १९६४ साली पंडित नेहरूंचं निधन झालं. यामुळे या सिनेमाची निर्मिती प्रक्रिया थांबली.

पुढेही अनेक अडथळे आले, तरीही अ‍ॅटनबरो यांनी चिकाटीने हा सिनेमा पूर्ण केला. आणि ज्या व्यक्तींच्या सुरुवातीच्या प्रोत्साहनामुळे अ‍ॅटनबरोंनी ‘गांधी’ सिनेमाचं स्वप्न पाहिलं, अशा मोतीलाल कोठारी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोन व्यक्तींप्रती सिनेमाच्या सुरुवातीला विनम्र कृतज्ञता दर्शवण्यात आली.

‘गांधी’ सिनेमाच्या विषयानुसार अ‍ॅटनबरोंना सिनेमाचा बराचसा भाग भारतात चित्रित करायचा होता. १९७५ रोजी अ‍ॅटनबरोंनी भारतात येण्याची सर्व तयारी केली.

परंतु याच साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि सिनेमाचं चित्रीकरण थांबलं.

पुढे १९८० साली इंदिरा गांधींच्या सांगण्यावरुन, भारताच्या राष्ट्रीय फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (NFDC) या सिनेमासाठी आर्थिक मदत केली. तसेच भारतात शूटिंग करण्याचा आॅटेनबरोंचा मार्ग मोकळा झाला.

या सिनेमाची एका कारणासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

ते कारण असं, या सिनेमात गांधींच्या अंत्ययात्रेचा एक प्रसंग आहे. या प्रसंगासाठी तब्बल ३ लाख अतिरिक्त माणसं सहभागी होती. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल, तेव्हा तुम्हाला गांधींच्या आसपास सतत माणसांचा गोतावळा दिसेल.

अ‍ॅटनबरोंनी अत्यंत कल्पकतेने जास्तीत जास्त माणसांचा वापर या सिनेमासाठी केला आहे.

बेन किंगस्ले या कलाकाराने महात्मा गांधींची भूमिका ‘गांधी’ सिनेमात साकारली. डोळ्यांमध्ये असलेलं एका वेगळ्या प्रकारचं तेज, चेहऱ्यावर झळकणारी बुद्धिमत्ता, शांत स्वभाव, हसतमुख असणारा चेहरा अशा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू बेन किंगस्ले यांनी आपल्यासमोर जिवंत उभे केले आहेत.

एक गंमतशीर गोष्ट म्हणजे, बेन किंगस्ले यांचं मूळ नाव कृष्णा पंडित भानजी असं आहे. त्यांचे वडील हे गुजराती होते.

गांधी’ हा हॉलीवुडचा पहिला सिनेमा असेल ज्यात अनेक भारतीय कलाकार आणि विशेषत: मराठी कलाकार पाहायला मिळतात.

कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आहेत. तसेच प्रोफेसर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भूमिकेत डॉक्टर श्रीराम लागू. इतर भूमिकांमध्ये अमरीश पुरी, मोहन आगाशे, आलोकनाथ, ओम पुरी, सईद जाफरी असे अनेक कलाकार पाहायला मिळतात.

३० नोव्हेंबर १९८२ रोजी ‘गांधी’ सिनेमा भारतात प्रदर्शित झाला.

अनेक स्तरांमधून हा सिनेमा नावाजला गेला. आजही गांधींच्या जीवनावर बनलेला हा माइलस्टोन सिनेमा मानला जातो. तसं महात्मा गांधींचं आयुष्य ३ तासात दाखवणं ही फार अवघड गोष्ट. परंतु अ‍ॅटनबरो ही अवघड गोष्ट दाखवण्यास निश्चित यशस्वी झाले आहेत.

संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधींना १५१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.