गांधीजींना भिक्षा देण्यासाठी टागोरांनी घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं नाकारलं होतं

मोठी लोकं उगाच मोठी होत नाही. त्यांच्या कर्मावरून त्यांनी तो मान मिळवलेला असतो. कुणालाही काहीही बोलण्याअगोदर आपल्या आचरणात ती गोष्ट आहे का? याकडे तर खूप बारीक लक्ष ठेवतात. कारण ते जाणत असतात की आदर्श बनणं म्हणजे किती मोठी जबाबदारी असते ते! एकदा काही तरी बोलल्यानंतर आपल्या वक्तव्यांवर जसे ते ठाम असतात तसेच एकदा कुणाला वचन दिलं तर त्यावरही ते प्रचंड ठाम असतात.

आजपर्यंत अनेक महान लोकांनी हे सिद्ध केलं आहे. यातीलच एक व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांनी एकदा गांधीजींना भिक्षा देण्याचं वचन दिलं होतं, जे पाळण्यासाठी त्यांनी चक्क घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य करणं नाकारलं होतं.

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची तब्येत खराब होती. बरेच दिवस झाले त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत नव्हती. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र टागोरांना एका ठिकाणी जास्त वेळ स्वस्त बसता येत नव्हतं. काही तरी काम करत राहण्याची सवयच त्यांना लागली होती. त्यांचे सहकारी, मित्र असे सगळे आप्तेष्ट त्यांना आराम करा म्हणून सांगायचे पण टागोर ऐकायचेच नाही.

सातत्य हे थोरांचं लक्षणंच असतं. असच टागोरांसोबत झालेलं. कामातील सातत्य ही त्यांची सवय बनली असल्याने स्वतःला ते थांबवू शकत नव्हते. अशातच योगायोगाने गांधीजी त्यांना भेटायला आले होते. तेव्हा त्यांनाही समजलं की टागोर यांची प्रकृती ठीक नसून ते काम करत असतात, आरोग्यावर लक्ष देत नाही, आराम मुळीच नाही आणि कुणाचं ऐकतही नाही. मग गांधीजींनी स्वतः काही तरी करण्याचं ठरवलं आणि शक्कल लढवली.

गांधीजी टागोरांना भेटायला गेले. गप्पा सुरु झाल्या आणि मग काही वेळाने टागोरांनी भेटण्याचं कारण विचारलं. तसं तर ही सहज भेट होती मात्र गांधीजींनी संधी गाठली आणि टागोरांना म्हणाले, “गुरुवेद मी तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो आहे”. शिवाय तुम्हाला ती द्यावीच लागेल, असा आग्रह देखील केला. त्यांचं हे बोलणं ऐकून टागोर म्हणाले, “जो स्वतः भिक्षुक आहे तो तुम्हाला काय भिक्षा देणार?”

मात्र गांधीजी खूप गंभीरपणे बोलत आहेत हे बघून त्यांनी विचारलं, “काय हवं आहे भिक्षेत?”. गांधीजी लगेच बोलते झाले. ते म्हणाले, “तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर किमान १ तास आराम कराल. त्या दरम्यान कोणतंही काम करणार नाही. हीच माझी भिक्षा आहे.”

टागोर यांना लगेच सर्व प्रकार समजला की का गांधीजी आग्रह करत आहेत. मात्र गांधीजींना वचन दिल्याने ते बांधले गेले होते. तेव्हापासून रोज गुरुवर्य जेवणानंतर आराम करायचे. काहीही झालं त्या दरम्यान तरी त्यांचा नित्यक्रम चुकत नसायचा. आता ही गोष्ट त्यांचं सातत्य बनली होती.

असंच एक दिवस ते जेवण झाल्यावर आराम करायला आपल्या खोलीत गेले होते. अचानक त्या दिवशी त्यांना भेटायला आचार्य क्षितिमोहन सेन येतात.

त्यांच्या येण्याची बातमी गुरुवार्यांना लागते मात्र ही वेळ आराम करायची असते, तेव्हा ते उठून बाहेर जात नाही. पायांचा आवाज ऐकून खोलीतच बसून ते जोरात विचारतात, “ठाकूर दादा आले आहेत का?”. यावर आचार्य म्हणतात, “हो. मात्र तुम्ही असं काय करत आहात खोलीत की, शिष्टाचार विसरलात? पाहुण्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य विसरून गेलात?”

मग टागोर म्हणतात, “अहो, उगीच नाही बसलो आहे. गांधीजींना भिक्षा देत आहे”.

हे ऐकून आचार्य आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्या खोलीत जातात. बघतात तर काय टागोर एकटेच आहेत. गांधीजी तर काही दिसत नाही. तेव्हा टागोर त्यांना सर्व प्रकार सांगतात. जेव्हा आचार्यांना सर्व कळतं तेव्हा ते देखील गांधीजींच्या या उपायांवर प्रभावित होतात आणि टागोरांसोबत हसत गप्पा मारतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.