पुण्याचे गांधी दांपत्य मणिपूरच्या एका दुर्गम खेड्यात शेतकऱ्याच्या भल्यासाठी राबत आहेत.

मणिपूर येथील अबेन हे एक दुर्गम गाव. या गावात साध मोबाईलच नेटवर्क देखील येत नाही. या गावात झेमे नागा या जमातीचे लोक इथे राहतात ज्यांचे रोजचे आयुष्य जंगलावर अवलंबून आहे. शेती हाच या लोकांचा पारंपारिक व्यवसाय. त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीला “झूम पद्धत” असे म्हणले जाते.

या पद्धतीत शेत करण्यापूर्वी  जंगलातील झाडे तोडली जातात. त्यानंतर या झाडांना आग लावली जाते. या आगीमुळे झाडांची राख निर्माण होते आणि ती मातीत मिसळते ज्यामुळे मातीत पोटॅशचे प्रमाण वाढते. पण हे असे प्रत्येक वर्षी करणे शक्य नाही ३ वर्षातून एकदाच या पद्धतीने शेती करता येते. या गावातील लोकांना कमविण्याचे दुसरे काहीच साधन देखील नाही त्यामुळे त्यांची प्रगती झालीच नाही,आणि गरिबी त्यांच्या सवयीची झाली.

याबरोबरच या पद्धतीचा वापर झाल्यामुळे मातीचा आणि जंगलाचा ऱ्हास होत होता. त्याच बरोबर वायू प्रदूषण देखील वाढू शकते आणि सगळ्यात घातक म्हणजे यामुळे भूस्खलन होऊन लोकांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते हे अनेक कृषी संशोधकांनी वारंवार सांगितले आहे पण यावर उपाय मात्र कधीच कुणी केला नव्हता.

पुण्याचे डेव्हिड गांधी आणि उषा गांधी या दाम्पत्याने २०१६ साली एका प्रोजेक्ट निमित्त या गावाला भेट दिली.

पुण्याच्या कृषी विद्यापीठातून शिक्षण झालेले डेव्हिड गांधी सुमारे ३० वर्ष शेती संशोधक म्हणून काम करत होते, तर उषा या शिक्षिका होत्या. या गावात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि शेती करण्याची “झूम” ही पद्धत घातक असून त्यामुळे ५० टक्क्यांनी तेथील शेती उत्पादन घटले होते. याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर देखील झाला होता. त्यामुळेच पुण्यासारख्या सर्व सुख सोयी असणाऱ्या शहरात राहणाऱ्या या दाम्पत्याने अबेन इथे राहून तेथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान देण्याचे ठरवले.    

गाव खूपच दुर्गम असल्याने सुरवातीच्या काळात गांधींना एकाही स्वयंसेवी संस्थेने मदत केली नाही. ८ महिने पडणारा पाऊस, खराब रस्ते, यामुळे वर्षातले चारच महिने या गावाचा जवळ असणाऱ्या मुख्य वस्तीच्या टेमेंगलोंग या गावाशी संपर्क होतो. अशा अवस्थेत इथल्या लोकांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे तसे जोखमीचे आणि कठीण काम होते.

२०१७ साली त्यांनी येथील स्थानिकांना सोबतीला घेऊन त्यांना sloping agriculture land technology(SALT)या पद्धतीविषयी शिक्षण देण्यास सुरवात केली.

सुरवातीला आपल्या पारंपारिक झूम शेतीला सोडून या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकरी तयार नव्हते. त्यांची हीच मानसिकता बदलण्यासाठी गांधी यांनी अनेक प्रयोग करून दाखवले. या प्रयोगातूनच त्यांना माहिती पटवून देणे त्यांनी सुरु केले. हळू हळू तेथील लोक देखील आकर्षित होऊ लागले आणि मग सुरवातीच्या टप्यात सुमारे ७५ पैकी ५० कुटुंबांनी पारंपारिक शेतीची पद्धत सोडून नवीन शेतीची पद्धत अवलंबली.

यातून लोकांचे उत्पन्न वाढायला लागले, तसेच अगदी कमी श्रमात शेती होऊ लागली, त्यामुळे शेतकरी अधिक मोठ्या प्रमाणावर गांधी यांच्या सोबत जोडला गेला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि गावतली सगळीच्या सगळी ७५ कुटुंबा या पद्धतीने शेती करू लागली.

नंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि हे जर टिकवायचे असेल तर इथल्या लोकांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते आणि त्यासाठी गरज होती ती किमान बेसिक शिक्षणाची. पण ह्याच शिक्षणाची या गावात अवस्था प्रचंड वाईट होती. त्यामुळे इथली शाळा आधी सुधारित करण्याचा निर्णय  शिक्षिका असणाऱ्या डेव्हिड यांच्या पत्नी उषा गांधी यांनी घेतला.

शाळेची सुरवात आणि शिक्षणाचा पाया

अबेनमधील प्राथमिक शाळेची स्थिती पाहून उषा गांधी सुरवातीला घाबरल्या. पुण्यातून या गावात गेल्यानंतर उषा यांना लक्षात आले कि या गावातील शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थे सोबतच तिथे शिकवायला प्रशिक्षित शिक्षकच नव्हते. उषा गांधी यांनी सुरवातीला गावातीलच थोडे फार शिक्षण असलेल्या तरुणांना,विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यांनी स्वतःच या मुलांसाठी अभ्यासक्रम देखील तयार केला.

झीम ही या भागातली बोली भाषा. मातृभाषा असल्याने या व्यतिरिक्त कुठल्याच भाषेचे ज्ञान तिथल्या मुलांना नव्हते. उषा यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने या मुलांना इंग्लिश बोलायला आणि लिहायला शिकवले. दोन ते अडीच वर्ष या गावात राहून डेव्हिड आणि उषा यांनी या गावाचा चेहरा बदलला.

वयाच्या पन्नाशीत असणारे हे दाम्पत्य तसे पाहता पुण्याच्या आयशोअरामी जगात रमू शकले असते आणि अगदी ऐश्वर्यात ते दिवस ढकलू शकले असते, पण डेव्हिड म्हणतात की,

“ पन्नाशीत इथे आलो ते बर झाल, थोडे अजून वय झाले असते तर हे काम करायची धमक उरली नसती,”

डेव्हिड गांधी कृषी संशोधक म्हणून आणि उषा गांधी शिक्षिका म्हणून या कामात आनंदी आहेत. सध्या ते साधारण २ ते ३  महिने लागवडी दरम्यान तिथे राहतात त्यानंतर परत पुण्यात येऊन एक महिनाभर राहून परत या गावात जातात. स्थानिक लोकांनी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना या दांपत्याने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.