जीभ रंगवणारी पुण्याची ‘गांधी गोळी’ जगभर निर्यात होणारा ब्रँड बनली

लहानपणीच्या आठवणी माणसाला नेहमीच भुरळ घालतात. शाळॆत असताना काही एक क्षण माणसानं मनात जपलेले असतात. ते पुन्हा दरवेळी अनुभवता येत नाहीत. पण काही आठवणी पुन्हा पुन्हा अनुभवता येतात. सुदैवाने पुणेकरांसाठी ती सोय कायमची झालेली आहे.

संत्रा गोळी आणि लिम्लेट ही सगळ्यांची कॉमन आठवण. गांधी गोळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गोळ्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. हा ब्रँड आहे चक्क पुण्याचा. त्याचे नाव आहे “गांधी गोळी”!

काचेच्या बरणीत मिळणाऱ्या कित्येक रंगाच्या गोळ्या अनेकांच्या शालेय जीवनात अविभाज्य भाग होत्या. आपला वाढदिवस असला कि सगळ्या शाळेला वाटायच्या म्ह्णून याच गोळ्या परवडायच्या. ‘आठाण्याला ४ द्या’ मिळणाऱ्या गोळ्या अनेक रंगांमध्ये यायच्या.

या गोळ्या बनवल्या त्या पुण्याच्या शुक्रवार पेठेतील एका परिवाराने… या गोळीच्या मागची सर्व कथा ही गांधी परिवाराची सक्सेस स्टोरी आहे. 

गांधी गोळी नावाच्या फ्लॅगशिप ब्रॅण्डला घेऊन गांधी नावाच्या माणसांनी सुरु केलेल्या कंपनीने. १९५० च्या सुमारास हरिदास गांधी आणि परशुराम गांधी यांनी याची स्थापना केली.

गोळीला विविध स्वरूपात समोर आणायची कल्पना त्यांचीच. त्यांनी नवा गोळ्यांचा देशी ब्रँड बनवण्याचे ठरवले.

भारतात प्रसिद्ध असलेल्या फळांच्या अनुसार त्यांचे आकार बनवायचे. इथल्या लोकांना आपलीशी वाटेल अशी त्याची चव ठेवायची. आणि मुख्य म्हणजे फॉरेनच्या चॉकलेट्स प्रमाणे त्या नाशवंत नकोत. या गोळ्या भारताच्या उष्ण वातावरणातही टिकल्या पाहिजेत.

कोणतीही व्यवस्था नसताना साठवता आल्या पाहिजेत असा ब्रँड त्यांनी तयार करायचे ठरवले.

भारतातील सगळ्यांना परवडेल आणि त्यातही टिकाऊ असूनही आकर्षक असेल अशी निर्मिती करणे जिकिरीचे काम होते. पण या गोष्टी जुळून आल्या की साखर वाटण्याची पद्धत असणाऱ्या देशात ही जागा एखादा ब्रँड घेईल हे नक्की होते.

तेव्हा त्यांनी आपल्या नावावरूनच या गोळ्यांना नाव दिले – ‘गांधी गोळी.’

आज रिटेलच्या दुकानांपासून ते मोठमोठे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये गांधी गोळीची दुकाने असतात. पण त्याचबरोबर लहानशा लहान गावातील एका जुन्या पत्र्याच्या टपरीवरही या गोळ्या मिळतात. हेच या गोळ्यांचे मोठे यश आहे.

गांधी जोडीने सुरुवातीला काढला तो त्यांचा सगळ्यात जास्त फेमस झालेला ब्रँड – तो म्हणजे संत्र्याची गोळी. मेडिकलच्या दुकानापासून ते हॉटेलात सगळीकडे तिचा बोलबाला असतो.

त्याला ऑरेंज स्लायसेस असं नाव गांधींनी दिलं. संत्र्याच्या अर्कापासून याची निर्मिती केली जायची. त्याचे एक्सट्रॅक्टस घेऊन बनवल्यामुळे खाणाऱ्याच्या जिभेवर संत्र्याचा गोडवा आपोआप येत असे.

तरुण आणि म्हाताऱ्या लोकांना ही गोळी सारखीच पसंत होती. गांधीनी बनवलेल्या पहिल्या प्रोडक्टचाच मार्केटमध्ये बोलबाला झाला. देशभरात या गोळीने धूम उठवली. देशभरातून या गोळीची मागणी येऊ लागली. इतकी कि या सगळ्या मागण्या वेळेत पुरवणे एका दुकानासाठी अवघड होऊन बसले.

त्यामुळे अनेक लोकांनी याची कॉपीही करण्यास सुरुवात केली. अनेकांनी संत्रा गोळीचे वेगवेगळे ब्रॅण्ड्स बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यात गांधी गोळीची बरोबरी कुणालाच करता आली नाही.

गांधी गोळी सुरुवातीपासून गुणवत्तेचं प्रतीक ठरली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ६४ गोळ्या बनवण्याचे काम गांधी गोळी हि कंपनी करते. हार्ड कँडी या प्रकारात सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध करून देणारी कंपनी हा रेकॉर्डही गांधी गोळीच्या नावे आहे.

ऑरेंज स्लाइस कँडी, पान मसाला, कच्ची कैरी, मिक्स फ्रूट आणि विविध फ़्लेवर्स देणाऱ्या या गोळ्या मुलांमध्ये प्रसिद्ध आहेत.

दर गोळीने जिभेला येणारा वेगळा रंग हि सुद्धा या ब्रॅण्डची खासियत आहे.

सध्या याचे मॅनेजिंग पार्टनर असलेले रोहन या उद्योगाचे नियंत्रण करत असतात. १९५६ पासून गांधी समूहाने या उद्योगात नवनवीन गोष्टींची भर टाकली आहे. या गोळ्यांची आता निर्यातही केली जाते. त्यामुळे फक्त पुण्यातच आंही तर अनेक ठिकाणी गांधी गोळी चवीने चघळली जात आहे.

बदलत्या काळाशी सामना करण्यासाठी गांधी गोळीच्या एका ब्रॅण्डने नवीन प्रॉडक्ट रेंज सुरु केली आहे. याद्वारे आकर्षक गोळ्या आणि गिफ्ट स्वरूपात पॅकिंग असणाऱ्या वस्तू मिळतात.

या समूहाला त्यांनी ‘कँडीलॅन्ड’ असे नाव दिले आहे.

आज आपल्या देशांत असणारी ही गोळ्यांची मार्केट्स विदेशी कंपन्यांनी बळकावली आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर सारखी भारतीय दिसणारी नावं बनवून या विदेशी कंपन्या इथल्या मूळ भारतीय ब्रॅण्ड्सना मागे टाकत आहेत.

म्हणून आज पुण्यात खूप कमी ठिकाणी अस्सल गांधी गोळी मिळते.  

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.