गांधीजी सुद्धा प्रेमात पडलेले, लग्न मोडायची वेळ आली होती.

ये प्यार होता है क्या अजून पण कोणाला समजलेलं नाही. पिक्चरमध्ये तर  म्हणतात की प्रेम कधी तुमची जात,धर्म, रंग, रूप वगैरे वगैरे बघून होत नाही. हाच नियम लावायचा म्हटलं तर ते तुम्ही कमिटेड आहे कि सिंगल आहे यावर पण ठरायला नको.

उफ ये समाज और उसके उसूल यांनी लई जणांची पंचाईत करून ठेवली आहे.  

जया सारखी बायको असताना रेखा कडे तिरके डोळे करून बघणाऱ्या बच्चन पासून ते फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये घुसून जेवला का विचारणाऱ्या गुळपाड्या दादा पर्यंत अनके जण या प्रश्नाचा रोज (मनातल्या मनात ) सामना करत असतात.

हाच प्रश्न जगातल्या सर्वात महान आत्म्याला देखील पडला होता. महात्मा मोहनदास करमचंद गांधी

बापू म्हणजे एकदम डेरिंग बाज माणूस. त्यांनी आयुष्यात काय काय कांड केलं ते सगळं सत्याचे प्रयोग लिहून ठेवलं. जे केलं ते खुल्ला सांगायला दम लागतो भिडू. आता पाय कोणाचा घसरत नाही, महात्मा जरी झाला तरी शेवटी माणूस प्राणीच ना तो. पण ते प्रेमात पडले यात विशेष असं काय ?

जेष्ठ इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी याबद्दल आपल्या ‘गांधी- द इयर दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ या पुस्तकात सविस्तर उहापोह केलेला आहे.

बापू प्रेमात पडलेले ती महिला होती सरलादेवी चौधरानी.

गांधीजींना महात्मा ही पदवी दणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांच्या भाची होत्या. बंगालचे भद्र कुटुंबात वाढलेली. संगीत, कला,नृत्य या कलांचे जन्मजात संस्कार झालेले. दिसायला सुंदर होत्या, बुद्धीमत्तेची तर घराण्याला दैवी देणगी मिळालीच होती. सरलादेवी टागोरांच्या प्रमाणे त्या सुंदर कविता देखील करायच्या. गायच्या देखील.

सरला देवीचा आवाज खूप गोड होता. स्वातंत्र्यलढ्याच्या सभांमध्ये, काँग्रेसकच्या अधिवेशनामध्ये अनेकदा गाणी गायच्या. गांधीजींची आणि त्यांची ओळख  पहिल्यांदा १९०३ साली झाली. तेव्हा बापू वयाच्या तिशीत पोहचले होते. सरलादेवी यांचं देखील वय जवळपास तीस होतं. बापूंचं लग्न झालेलं पण सरला देवी तेव्हा अजून सिंगल होत्या.

टागोरांचे घर म्हणजे खुल्या विचारांचे. त्यात सरलादेवी स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यामुळे त्यांना कधी घरच्यांनी वय झालं आता लग्न करा म्हणून फोर्स केला नाही.

पण पहिल्यांदा जेव्हा त्या गांधीजींना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा तेव्हा फक्त ओळखच झाली. बाकी विशेष असं काही नव्हतं. बापू तेव्हा दक्षिण आफ्रिकेत राहायचे. तिथल्या भारतीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून सत्याग्रह वगैरे चाललेलं.

सरलादेवीचं १९०५ साली लग्न झालं. त्यांचे पती रामभुज दत्त चौधरी हे एक वकील,पत्रकार होते. आर्य समाजाचे फॉलोवर होते. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. दोघांना एक मुलगा देखील होता.    

पुढे १९१५ साली गांधीजी भारतात आले. इथल्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले. अगदी दोन तीन वर्षात त्यांची पॉप्यूलॅरिटी संपूर्ण देशात पसरली. एकदा ते आंदोलनाच्या निमित्ताने लाहोरला गेले होते. तेव्हा ते सरला देवींच्या घरी उतरले. त्यावेळी पंडित रामभुज चौधरी जेल मध्ये होते.

या काळात सरलादेवी आणि गांधीजी एकमेकांच्यात चांगली मैत्री झाली. त्यांचे विचार जुळले, गप्पा झाल्या. पुढे गांधीजी गुजरातला परतले तेव्हा सरला देवी यांचा मुलगा दीपक यालादेखील साबरमतीच्या आश्रमशाळेत पाठवून देण्यात आले होते. त्याच्या चौकशीसाठी आलेल्या पत्रामधून दोघांची जवळीक वाढू लागली.

गांधीजी सरला देवी यांना रोज पत्र पाठवायचे आणि त्यांनी देखील रोजच्या रोज पत्रे पाठवावीत म्हणून आग्रह करायचे. एका पत्रात ते म्हणतात,

तुम मेरे अंदर पूरी शिद्दत से हो, तुमने अपने महान समर्पण के पुरस्कार के बारे में पूछा है, ये तो अपने आप खुद पुरस्कार है.

सरला देवी यांच्या मनात देखील गांधीजींच्या बद्द्दल अशीच आपुलकीची भावना निर्माण झाली होती. एकदा गांधीजींनी काही कारणांनी त्यांना पत्र पाठवलं नाही तेव्हा त्या म्हणतात की बाथरूम ही एकच जागा होती जिथे मी जाऊन रडत होते.

एकदा गांधीजींनी १६ दिवसात सरलादेवी यांना २५ पत्रे पाठवली होती.  एका पत्रात त्यांनी आपण सरला यांची स्वप्ने पाहतो आणि त्यांचे पती किती नशीबवान आहेत याचा उल्लेख केलेला आहे. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेतील आपल्या एका मित्राला त्यांनी लिहिलं आहे कि,

‘सरला का सानिध्य बहुत आत्मीय और अच्छा था, उसने मेरा बहुत ख्याल रखा. हमारे रिश्ते आध्यात्मिक शादी की तरह हैं.’

आधीच सांगितल्याप्रमाणे गांधीजी काही लपवाछपवी करण्याच्या भानगडीत पडत नव्हते. ते सरलादेवी याना सांगायचे कि आपली पत्रे तू तुझ्या नवऱ्याला दाखवतेस कि नाही? त्यांना माझी सेक्रेटरी म्हणून साबरमतीला तुला पाठवून देण्याची परवानगी माग. 

सरला देवी यांच्या कविता, त्यांचे लेख गांधीजींच्या यंग इंडिया या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापले जायचे. गांधीजी आपल्या भाषणात त्यांच्या कविता वाचून दाखवायचे. केलनबॅचर याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी सरला देवी यांची आपली पत्नी कस्तुरबा यांच्यासोबत तुलना देखील केली आहे.

एवढं सगळं घडत असताना कस्तुरबा यांची प्रतिक्रिया मात्र तिखट अशीच होती. कस्तूरबा ए सीक्रेट डायरी या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा डालमिया या सांगतात ,

गांधीजीचे सरला देवी यांच्या सोबत वाढत चाललेली जवळीक कस्तुरबांना पसंत नव्हती. दोघांचे संबंध इतके ताणले की यांचं लग्न मोडले कि काय अशी शक्यता बोलून दाखवली गेली. त्यांची मुले देखील यावरून नाराज झाली.

अखेर सी राजगोपालाचारी यांनी गांधीजींना या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुनावलं. याचा परिणाम देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर होत आहे याची जाणीव करून दिली. तेव्हा मात्र गांधीजी सावरले.

 काही गांधीवादी सांगतात की गांधीजी आणि सरला देवी यांचं प्रेम भावाबहिणीच्या मध्ये असत तितकं पवित्र होतं. खुद्द बापूंनी वाराणसी मधल्या सभेमध्ये याचा उल्लेख केला असल्याचं सांगितलं जातं. पण त्या काळात हे नाते बरेच वादग्रस्त बनले होते यात काही शंका नाही.

गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांनी देखील याचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे. ते म्हणतात,

मुझे लगता है कि अगर ईमानदारी से गांधी जी की बॉयोग्राफी लिख रहा हूं तो उनका ये पहलू भी सामने आना चाहिए. बचपन में वो अपने अभिभावकों से लगातार ये बात सुनते थे कि किस तरह अधेड़ उम्र में भी गांधीजी फिसल गए थे.  

त्यानंतर सरला देवी यांचा आणि त्यांचा कधी पत्राची देवाणघेवाण झाली आहे याचा कुठे उल्लेख नाही. दोघांनी एकमेकांत अंतर राखले. १९२३ साली सरला देवी यांच्या पतीचे निधन झाले. त्या मग लाहोरमधून कलकत्त्याला परतल्या. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी संन्यास घेतला होता व हिमालयात गेल्या होत्या.

१९४५ साली त्यांचं निधन झालं. भारतात स्त्रीवादी चळवळीची मुहूर्त मेढ रोवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

त्यांनी स्थापन केलेली भारतीय स्त्री  महामंडळ ही देशातील महिलांची पहिली संस्था आहे असे मानले जाते. लाहोर दिल्ली कलकत्ता अहमदाबाद या शहरांमध्ये सरला देवींनी स्त्रीशिक्षणसाठी भरपूर कार्य करून ठेवलं आहे ज्याचा आजही गौरव केला जातो.

आपल्या उत्तर आयुष्यात सरला देवी यांनी कधी गांधीजींच्या सोबत असलेल्या संबंधाचा उल्लेख केला नाही. फक्त एकदाच आपल्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय कि जेव्हा त्या एका संकटात होत्या तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले होते कि, तुम्हारी हंसी राष्ट्रीय संपत्ति है, हमेशा हंसती रहो.  

पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने दिपकने गांधीजींच्या नातीशी राधाशी लग्न केले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.