नोटेवर तुमचे फोटो कधी छापले जाणार असं विचारल्यावर गांधीजी म्हणाले, “मी बनिया आहे…. “

मोहनदास करमचंद गांधी. भारताचे राष्ट्रपिता, जनतेचे लाडके बापू, महात्मा अशा वेगवेगळ्या नावांनी आपण त्यांना ओळखतो. इंग्लंडचा तेव्हाचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल त्यांना नंगा फकीर म्हणायचा. जिसकी जैसी सोच वैसा उसका नजरिया असं कोणी तरी म्हणून ठेवलंय.

पण बापू स्वतःला बनिया म्हणवून घ्यायचे.

तस तर गुजरात मधून आलेला प्रत्येक नेता हा राजकारणात चतुर असतोच. पिढीजात व्यावहारिक शहाणपण त्यांच्या कडे चालत असलेलं असत. म्हणूनच गुजराती लोकांचा राजकारणात कोणी हात धरू शकत नाही. मग ते सरदार पटेल असोत, मोरारजी भाई देसाई असोत अथवा आत्ताचे मोदीजी आणि अमित शाह.

पण गांधीजी या सगळ्यात वरचढ होते. ते होते अहिंसावादी, शांत व नम्र स्वभावाचे. पण आपल्या उपोषणांनी आणि अहिंसक आंदोलनांनी ब्रिटिशांना देखील परेशान करून ठेवलं होतं. एक वेळ बंदूक घेऊन आलेले क्रांतिकारी परवडले त्यांना उलट उत्तर तर देता येते पण या खाष्ट म्हाताऱ्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न त्याकाळच्या सरकारला पडत असे.

 अशाच गांधींच्या बनियेपणाचा एक हलका फुलका किस्सा

गुजरात मध्येच बनासकांठा जिल्ह्यात एक गाव आहे पालनपूर. त्याकाळात हे एक संस्थान होते आणि तिथे राज्य करायचे मोहम्मद तल्ले खान. या नवाबाचं राज्य छोटं होतं पण ब्रिटिश सरकारमध्ये त्यांचा दबदबा प्रचंड मोठा होता. रॉयल इंडियन एअरफोर्स तर्फे त्यांनी पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. दुसऱ्या महायुद्धावेळी देखील प्रिन्स ऑफ वेल्सचे युद्धभूमीतील सहायक म्हणून देखील काम केलं होतं.

त्यांना इंग्लंडच्या राजाने मानाची सर ही पदवी दिली होती.

असे हे पालमपुरचे नवाब गांधीजींचे चांगले दोस्त देखील होते. त्यांच्या या मैत्रीचे अनेक किस्से उत्तर गुजरातमध्ये फेमस आहेत. जेव्हा जेव्हा गांधीजी साबरमती ते दिल्ली ये जा करायचे तेव्हा ते पालनपूरच्या नवाब आधीच सांगून ठेवायचे. अहमदाबाद दिल्ली रेल्वेमार्ग त्यांच्या राज्यातूनच जायचा. ज्या दिवशी गांधीजी येणार असतील त्या दिवशी नवाब साहेब अमिरगढ स्टेशनला पोहचायचे, त्यांच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्ब्यात बसून गांधीजींशी गप्पा मारत काही अंतर जायचे. पुढचं स्टेशन आलं की तिथे उतरून आपल्या संस्थानात परत यायचे.

एकदा असच झालं. नवाबसाहेबांना एक तार आली. गांधीजी दिल्ली मेलहून परतत होते.

संध्याकाळी गाडी पालनपूर संस्थानात आली. त्याकाळात हे ट्रेन अमिरगढ स्टेशनला थांबत नसे पण नवाब साहेबानी आपलं वजन वापरून स्टेशनमास्तरांना विनंती केली. अखेर दिल्ली मेल त्या स्टेशनला थांबली. लगबगीने नवाब तल्ले खान गांधीजींना लागणारे बकरीचं दूध फळे वगैरे घेऊन बोगीत चढले.

योगायोगाने त्या दिवशी सोमवार होता. गांधीजींचा तो मौनाचा दिवस असायचा. त्या दिवशी समोर अगदी देव जरी आला तरी गांधीजी आपलं तोंड उघडायचे नाहीत. आपल्या काही बोलायचं असेल तर ते एका पाटीवर लिहून सहकाऱ्यांना सांगायचे.

नवाब साहेब थोडे नाराज झाले. पण तरी त्यांनी गांधीजींना आपण आणलेली फळे दूध वगैरे दिलं आणि त्यांच्या पाटीवर तीन प्रश्न लिहून दिले.

ते प्रश्न होते,

1. आपकी सेहत कैसी है?

2. आप साबरमती में कितने दिन रुकेंगे?

3. बच्चों के खेलने वाले नोटों पर आपकी तस्वीर छपने लगी है. असल नोट पर आपकी तस्वीर कब छपेगी?

पालनपुर स्टेट की टिकिट

पहिले दोन प्रश्न तर साधेच होते पण तिसरा प्रश्न मात्र गुगली होता. हि गोष्ट आहे १९३१ सालची, म्हणजे अजून स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात देखील नव्हतं. पण तरी स्वातंत्र्य मिळालं तर गांधीजींचा फोटो नोटेवर येणार का याची चर्चा तेव्हा पासूनच सुरु झाली होती.

गांधीजींनी नवाबांच्या तीन प्रश्नांना आपल्या पाटीवर क्रमवार उत्तर लिहून दिली,  

1. बेहतर होता आप ट्रेन में मेरे साथ चल रहे आम लोगों का हाल भी पूछ लेते.

2. मैं साबरमती आश्रम में तब तक रहूंगा जब तक अंग्रेज़ रहने देंगे.

एवढं झालं तरी नवाबाच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर गांधीजींनी दिलंच नाही. त्यांनी तो प्रश्न खोडूनच टाकला. नवाब तल्ले खान देखील चिवट होते. त्यांनी हट्टीपणाने तो प्रश्न पुन्हा पुढे केला. पण महा चतुर गांधीजींनी उत्तर लिहिलं,

तुम्ही मला दूध आणि फळे दिली, याचाच अर्थ दोन गोष्टी दिल्या. आणि तुम्ही माझ्या कडून तीन प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा करताय. मैं भी बनिया हूं, आप मुझे बेवकूफ नहीं बना सकते.

आजकाल सोशल मीडिया इतका दमदार झाला आहे की रोज उठून राजकारणी नेत्यांना तोंड घाशी पडावं लागतं. अवघड प्रश्नांची उत्तरे देताना कित्येकांची धांदल उडते. त्यातून काही क्लिप काढून व्हायरल केली जाते. पॉलिटिकली करेक्ट राहणे कित्येकांना जमत नाही. गांधीजींसारखा बनिया माणूसच अशा गुगलीवर सिक्सर मारू शकतोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.