गांधीजींच्या घोषणेला शास्त्रीजींनी एका शब्दात बदललं आणि धुरळा उडाला !

८ ऑगस्ट १९४२. मुंबई गवालिया टँक.

हेच ते मैदान जिथे अनेक वर्षापूर्वी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. याच कॉंग्रेस पक्षाने प्रचंड मोठी सभा बोलवली होती. स्वतः महात्मा गांधी जनतेला संबोधित करणार होते. लाखो लोक देशभरातून मुबईला येत होते. अनेक मोठे नेते सभेला हजर होते. या प्रसंगी गांधीजी म्हणाले,

“ये आखरी लढाई है. अब करेंगे या मरेंगे !”

९ ऑगस्ट पासून इंग्रजांना शेवटचा इशारा देणारे भारत छोडो आंदोलन सुरु झाले.

दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. हिटलरच्या जर्मनीने मित्र राष्ट्रांपुढे मोठे आव्हान उभे केले होते. युरोपात जर्मनी आणि आशियात जपान इंग्लंडच्या नाकी दम आणून सोडले होते. भारतीय सैन्याच्या बळावर इंग्लंड हे युद्ध लढत होते. मात्र यापैकी जपान्यांच्या हाती लागलेल्या सैनिकांची आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडून आक्रमण करून येत होती.

अशावेळी भारतात नागरिकांनी केलेलं आंदोलन ब्रिटिशानां परवडणार नव्हत. पण काहीही करून हे आंदोलन दडपुन टाकायचे हे ब्रिटीशांनी ठरवलेलं. त्या दिवशीच सकाळी गांधीजी, नेहरू पटेल यांच्यापासून सर्व कॉंग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली.

नेत्यांना अटक केल्यावर हे आंदोलन आधीच संपुष्टात येईल असा इंग्रजांचा अंदाज होता मात्र ते चुकीच ठरलं.

अभी नही तो कभी नही, करेंगे या मरेंगे अशा नाऱ्यानी सगळा देश एका वेगळ्याच उत्साहाने भारावून गेला होता. गांधीजीनां पुण्याच्या येरवडा येथे हलवण्यात आलं. मात्र त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की,

” नेते नाहीत म्हणून आंदोलन थांबवायचं नाही. आता तुम्ही सगळे नेते आहात. ही शेवटची लढाई तुम्हाला जशी योग्य वाटते तशी लढा पण थांबू नका.”

या संदेशाचा अर्थ प्रत्येकाने आपल्याला हवा तसा घेतला. प्रत्येकजण जमेल तसा स्वातंत्र्यलढ्याला योगदान देत होता. देशभरात जवळपास १० लाख लोकांना अटक झाली. कॉंग्रेस नेत्यांपैकी फक्त लालबहादूर शास्त्री अटकेत नव्हते. ९ ऑगस्टलाच रात्री पोलिसांना गुंगारा देऊन ते उत्तरप्रदेशच्या अलाहबादला पोहचले होते.

शास्त्रीजी मुळचे उत्तरप्रदेशचे. ते कठोर गांधीवादी होते.

अगदी लहानवयापासून ते गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात शामिल झाले होते. अनेकदा तुरुंगवास झाला. चले जाव आंदोलनाच्या आधी देखील एक महिनाभरापूर्वी ते जेल मधून बाहेर आले होते. त्यांचा सच्चा स्वभाव, निर्मळ वृत्ती यामुळे जनतेचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता.

त्याकाळी अलाहबाद हे भारताच्या अनेक राजकीय घडामोडीचं प्रमुख केंद्र होतं. कारण जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, पुरुषोत्तमदास टंडन असे अनेक नेते अलाहबादमध्ये राहात होते. प्रत्येक घराघरात स्वातंत्र्यलढ्याचे कार्यकर्ते होते. यामुळेच अलाहबादला इंग्रज सरकारने विशेष लक्ष्य केलं होतं.

अलाहबादमध्ये चले जाव आंदोलनाने जोर पकडताच इंग्रजांनी लाठीचार्जसारखे उपाय करून आंदोलन दडपण्यास सुरवात केली.

अबालवृद्ध महिला आंदोलकांवर अन्याय होत होता. नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांना देखील अटक झाली. अनेक आंदोलक जखमी झाले, काहींचा मृत्यू देखील झाला. पोलिसांबद्दल जनतेत प्रचंड रोष होता. पण काही करता येत नव्हते. आंदोलनाचा जोर कमी होताना दिसू लागला.

लालबहादूर शास्त्री तेव्हा नेहरूंच्या आनंद भवनात लपले होते. तिथून भारतभरातील चले जाव आंदोलनाची सूत्रे ते हलवत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना चौकशी केली तेव्हा कळाले की पोलीस दडपशाही करत आहेत आणि जर जनतेकडून प्रत्युत्तर दिले गेले तर गांधीजी चौरीचौरा प्रमाणे आंदोलन मागे घेतील म्हणून लोक घाबरले आहेत.

इंग्रजांच्या विरुद्ध स्वसंरक्षणासाठी जनतेने आक्रमक झाले पाहिजे अस शास्त्रीजींना वाटले. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की

“मुंबईत गांधीजीनी दिलेली घोषणा करेंगे या मरेंगे नसून मारेंगे अशी आहे.”

शास्त्रीजींनी शाब्दिक खेळ करत मरो ला मारो बनवले आणि कार्यकर्त्यांच्यात परत उत्साह आला. शास्त्रीजी गांधीवादी होते मात्र त्यांचा गांधीवाद स्वतःवर होणारा अन्याय सहन करणारा नव्हता.

शास्त्रीजींच्या त्या एका निर्णयाने चले जाव आंदोलन टिकले, वाढले आणि इंगज सत्तेला धडकी भरवली.  

काही दिवसातच शास्त्रीजींना देखील अटक झाली. पण आंदोलन थांबले नाही तर उलट त्याचा भडका आणखी उडाला. देशभरात उद्दाम ब्रिटीश सत्तेला त्यांच्या भाषेत उत्तर दिले गेले. तळागाळातील सर्व लोक रस्त्यावर उतरले होते. लष्करातील जवानांनी देखील बंड पुकारले. इंग्रज सरकारला जाणीव झाली की यापुढे भारतात आपली सत्ता राहणे शक्य नाही.

तेव्हाच भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने हालचाल सुरु केली.

हे ही वाच भिडू.